कोल्हापूर : बटाटा, लसूण, कांद्याचा प्रवास शेकडो किलोमीटर

देशाच्या कोणत्याही प्रांतात सहजपणे उपलब्ध होणारी भाजी म्हणजे बटाटा.
कांदा, बटाटा, लसण
कांदा, बटाटा, लसणsakal
Updated on

देशाच्या कोणत्याही प्रांतात सहजपणे उपलब्ध होणारी भाजी म्हणजे बटाटा. या भाजीची रुची वाढवण्यासाठी त्यामध्ये कांदा व लसूण घातला जातो. कांदा लसणाची मागणी नेहमीच राहते. कांदा, बटाटा, लसूण कोल्हापूर जिल्ह्यात अगदीच कमी पिकतो. तो घाऊक बाजारपेठेत फारसा विक्रीला येत नाही. चहा, नाष्ट्याच्या स्टॉल्सपासून तारांकित हॉटेलपर्यंत कांदा, बटाटा, लसणाला मागणी आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून बटाटा, कांदा, लसूण कोल्हापुरात येतो आणि जवळपास २५० कोटींची उलाढाल करतो. यातून जवळपास पाच हजारांवर व्यक्तींच्या अर्थकारणाला बळ लाभते...

ज्या शेती मालाला मागणी जास्त त्याचा उठावही पटकन. माल शिल्लक राहिला की नुकसानीची शक्यता वाढते, त्यामुळे शेतकरीही अशाच पिकांना प्राधान्य देऊ लागले आहेत. यामध्ये ज्या भागात हवामान व जमिनीचा पोत शेतीपिकांना साथ देते, अशीच पिके घेतली जातात. त्यामुळे एकाच वेळी बाजारपेठेत अशा शेतीमालाची मोठी आवक होते आणि भाव पडून शेतकऱ्यांचे नुकसान होते.

कोल्हापुरात कांदा, बटाटा, लसणाचा विक्रमी खप बाजारपेठेत होतो. यामागे विश्वासार्ह व्यवहार हेच बलस्थान असल्याचे शेतकरी सांगतात. केवळ विश्वासाच्या बळावर कोल्हापूरच्या बाजारपेठेत हजारो शेतकरी, अडते, व्यापारी व बाजाराशी संबंधित मानवी घटक अर्थकारणाला बळ देतात. शाहू मार्केट यार्डात कांदा, बटाटा, लसणाचा घाऊक बाजार फुललेला असतो.

कांद्याला भाव बरा..

बारामतीचे मच्छींद्र वाघवे व शिवाजी वाघवे हे दोन शेतकरी १०५ पोती कांदा घेऊन पहाटेच शाहू मार्केट यार्डात पोहचले. सकाळी सौदे झाले. १५० रुपये दहा किलो प्रमाणे कांद्याचे सौदे निघाले. माफक समाधान दोघांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘कांद्याचे पीक पाच महिने राबून घेतले आहे. एकरी साठ हजार रुपये उत्पादन खर्च आला. सगळा कांदा काढणी होईल, तसा टप्प्याटप्प्याने बाजारात सौद्याला आणतो. कधी पंधरा, कधी बारा, कधी दहा, तर क्वचितप्रसंगी २० रुपये किलो असा भाव मिळतो. सगळे मिळून एकरी सव्वा ते दीड लाख रुपये मिळतात; मात्र त्यासाठी पाच महिने कुटुंब शेतात राबते. त्यांचा पगार काढायचा झाला तरी एक व्यक्तीला पाच हजार रुपयेही मिळत नाहीत.’’ तुम्ही कोल्हापूरच्या बाजारात नेहमी कांदा आणता का, असे विचारले असता, श्री. शिवाजी म्हणाले, ‘‘कोल्हापुरात खुले सौदे होतात. पैसेही पटकन देतात. येथे अडत्याशी संबंधही चांगले आहेत... एखाद्या वेळीस आम्ही आलो नाही तरीही कांद्याचे बिल आम्हाला मिळते. ही विश्वासाची बाब म्हणून आम्ही कोल्हापूरला कांदा आणतो.’’

लसूण सौद्यांत भाव वाढता

विदीशा (मध्यप्रदेश)हून भूमचंद मिश्रा लसूण भरलेला ट्रक घेऊन घेऊन पहाटे आले. अडत्याच्या दुकानात पोती उतरली. पोत्याच्या नोंदी झाल्या. भूमचंदने सकाळी सगळे आवरले आणि सौद्याच्या गर्दीत येऊन उभा राहिला. वास्तविक हा ट्रक चालक, लसणाचा सहा शेतकऱ्यांचा माल तो ९०० किलोमीटरवरून घेऊन आला. त्यांच्या १३० पोती लसणाचा सौदा सकाळी ११ वाजता झाला. अडते किसनलाल यांचा फोन खणखणला दोघांचे हिंदीत संभाषण झाले. काही आकडे सांगितले... दीड लाखाची बोली सांगितली. ४०० रुपये दहा किलोला भाव मिळाला. थोड्याच वेळात लसूण सौद्याचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पडल्याचा संदेश आला. व्यवहार संपला. तासाभराची झोप घेऊन भूमचंद अडत्याच्या पेढीवर आला. पैसे पोहोचल्याची खात्री केली आणि परतीच्या प्रवासाला लागला. एकही शेतकरी न येता...विश्‍वासावर झालेला हा व्यवहार

आग्र्याचा देखणा बटाटा...

रौनक सिंह (आग्रा) येथून बटाटा भरलेला ट्रक घेऊन आले. त्यांच्यासोबत एक शेतमजूर होता. ८ नंबर गाळ्या समोर पोती उतरली. नोंदी झाल्यानंतर ते मार्केट यार्डात फिरत राहिले. रात्र ट्रकमध्येच घालवली...सकाळी सात वाजता सौदे सुरू होण्यापूर्वी आवरून तयार...कमी आवक असल्यामुळे बटाटे सौदे सुरू होण्यास विलंब झाला. दोन-तीन तासानंतर देखण्या बटाट्याच्या दोन चार ढिगाचे सौदे निघाले... चौथ्या ढिगाला बोली सुरू झाली. माल कमी व खरेदीदार जेमतेम वीस पंचवीस होते...त्यांच्या गराड्यात मालाची बोली कमी निघाली. १२० रुपये दहा किलो भावात बटाटा सौदे झाले. आग्र्यातील चार शेतकऱ्यांचा माल येथे एकत्र आला. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेल्याची हमी मिळाली... त्या चार शेतकऱ्यांचा शेकडो किलोमीटरचा प्रवास, वेळ व खर्च वाचला, मालाचा उठावही पटकन झाला.

कोल्हापुरी बाजाराचा देशभरात लौकिक

कोल्हापूरचे शाहू मार्केट यार्ड गुळासाठी देशभरात प्रसिद्ध...मात्र शेती उत्पन्न बाजार समितीने येथे कांदा, बटाटा, लसूण बाजार ३५ वर्षांपूर्वी सुरू केला आणि कोल्हापुरात पिके नसूनही परजिल्ह्यातील...परप्रांतांतील कांदा, बटाटा, लसूण ही पिके येथील बाजारपेठेत येऊ लागली. व्यापारी, अडत्यांनी भाव चांगला देत व्यवहारही चोख ठेवला. त्यामुळे वर्षानुवर्षे येथे शेतकरी माल घेऊन येतात... आवक वाढली की भाव पडतात. हे खरे असले तरीही जेवढा भाव मिळणार त्याचे व्यवहारही विश्वासाने होतात, हेही या बाजाराचे बलस्थान आहे. अशा स्थितीत बाजारपेठेत वर्षाकाठी दोन लाख पोत्यांची आवक होते. त्याची उलाढाल होते. गुजरात, राजस्थान, आग्रा, इंदूर, उत्तरप्रदेश, छत्तीसगड आदी भागातून बटाटा, लसूण येतो. तर लोणंद, फलटण, बारामती, इंदापूर, नगर, बार्शी याभागातून कांदा येथील बाजारपेठेत येतो. यातील अवघा १० ते १५ टक्के माल स्थानिक पातळीवर विकला जातो. उर्वरित माल केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण व मराठवाड्यात पाठवला जातो, असे कांदा-बटाटा असोसिएशनचे किसनचंद पोपटाणी यांनी गप्पांत सांगितले.

रोजगाराला गती

कांदा-बटाटा बाजारपेठेतून बाजार समितीला जवळपास दोन कोटीचा कर मिळतो. ८० अडत्यांकडील पाचशेवर कर्मचाऱ्यांचे वेतन भागते. कमिशन मिळते. तसेच जवळपास दोनशेहून अधिक माल वाहतूकदार व दीडशे माथाडींना मजुरी मिळते. याशिवाय स्थानिक बॅंकांद्वारे येथील पैसा स्थानिक अर्थकारणालाही गती देतो...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.