राधानगरी धरण पन्नास टक्केपेक्षा जास्त भरले आहे. तर उर्वरित धरणांमध्ये कमी पाणीसाठा झाला आहे. आता मात्र हा साठा वाढण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात (Kolhapur) दोन दिवसापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे (Rain Update) मोठा दिलासा मिळाला आहे. काल रात्रीपासून ते आज दिवसभर जोरदार आणि सर्वदूर पावसाने जिल्हा व्यापला आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत दिलासादायक वाढ होत आहे.
पंचगंगा नदीसह (Panchganga River) इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर रात्री ९ वाजता पाणी पातळी 18. 04 फूट इतकी होती. प्रत्येक तासाला एक-एक इंच पाणी पातळी वाढत आहे. जिल्ह्यात ९ बंधारे पाण्याखाली आहेत.
दरम्यान, आज (ता. १९) जिल्ह्यात ऑरेंज अर्लट आणि गुरुवार (ता. २०) आणि शुक्रवार ( ता. २१) यलो अर्लट जाहीर केला आहे. जिल्ह्यात चोवीस तासात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती आली आहे. अजूनही तब्बल पन्नास टक्के पेरण्या शिल्लक आहेत.
या पेरण्या वेळेत होण्यासाठी चांगल्या आणि दमदार पावसाची गरज होती. दोन दिवसापासून अपेक्षित पाऊस होत आहे. आणखी काही दिवसाने या पावसात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचा ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन पिकाला फायदा होणार आहे.
पावसाळ्यात आडसाल किंवा खोडावा उसाला विविध प्रकारची खते दिली जातात. ही लागवड चांगल्या पद्धतीने लागण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असते, असा पाऊस दोन दिवसापासून होत आहे. याचा फायदा घेत अनेक शेतकरी उसाला खतांचा डोस देत आहे.
हा डोस आणि चांगला पाऊस ऊस वाढीसाठी पोषक आणि उतारा वाढवणारा ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. असाच पाऊस निरंतर राहिला तर शेतात पाणी साचणार नाही आणि पिकांनाही बाधक ठरणार नाही, अशी परिस्थिती आहे.
आंबा ः शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबा, मानोली, विशाळगड या भागात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे.कडवी व शाळी नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. मानोली धरण शंभर टक्के भरले आहे. मानोली व केर्ले येथील गावदरा धबधबा ओव्हरफ्लो झाला आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या भात रोप लावणीला वेग आला आहे. तालुक्यात जून व जुलै महिन्यात आज अखेर ४०९ मीमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
चंदगड : शहर परिसरात आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. जोरदार वाऱ्यासह दिवसभर मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाने घटप्रभा आणि ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आले. वातावरणात गारवा आणि झोडपणारा पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. हा पाऊस माळरानावरील रखडलेल्या भाताच्या रोप लावणीसाठी उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
पिंपळगाव ः भुदरगड तालुक्यातील मुरुक्टे, मानवळे परिसरात खरीप भातरोपलावण कामे गतीमान झाली आहेत. दोन दिवस परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. यावर्षी पावसाने उशीरा सुरुवात केल्यामुळे भात रोप तरवे लहान आहेत. परिणामी रोपलावण हंगाम लांबणीवर पडणार आहे. ग्रामीण भागात औतबैलांची संख्या कमी झाली आहे. शेती औजारांचा चिखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परिसरातील मुरुक्टे ,मानवळे,बारवे, केळेवाडी, भांडेबांबर, पाल, बेगवडे, तोंदलेवाडी, गडबिद्री येथे भातरोपलावण कामे सुरु आहेत.
गगनबावड : आज गगनबावडा तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. या हंगामातील सर्वाधिक पाऊस आज झाला. मुसळधार पावसाने शेतशिवारात पाणीच पाणी झाले. सोमवारपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज गगनबावडा तालुक्यास मुसळधार पावसाने झोडपले. करुळ व भूईबावडा घाटपरिसर, गगनबावडा, लखमापूर, तळये, बोरबेट, मानबेट, गारीवडे, बावेली या पट्ट्यात जोराचा पाऊस पडला.
कुंभी, कोदे, वेसरफ, अणदूर आदी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत कोदे धरण क्षेत्रात ९२ मिलीमीटर पाऊस तर कुंभी धरण क्षेत्रात ५५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. येथील कोदे व वेसरफ लघुप्रकल्प यापूर्वीच भरली आहेत. कोदे लघु प्रकल्पातून ७४३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी पाणी पातळी कमालीची वाढली आहे.
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. याच पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. राधानगरी धरण पन्नास टक्केपेक्षा जास्त भरले आहे. तर उर्वरित धरणांमध्ये कमी पाणीसाठा झाला आहे. आता मात्र हा साठा वाढण्यास मदत होणार आहे.
मान्सून लांबल्याने राधानगरीसह काळम्मावाडी आणि तुळशी धरण क्षेत्रात यंदा गतवर्षीच्या सरासरीपेक्षा पाऊस आणि पाणी साठ्याची टक्केवारी कमी आहे. सद्यस्थितीनुसार राधानगरी धरण ऑगस्ट महिन्यात भरेल. मात्र, काळम्मावाडी आणि तुळशी धरण पाऊसमान कमी राहिल्याने उशिरा भरणार आहेत.
आज पावसाचा जोर वाढला असून, पाणी पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मीतीसाठी आज सातशे क्यूसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु केला आहे. गतवर्षी जुलै महिन्यात सलग पंधरा दिवस या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्यातच पावसाळ्यापूर्वी शिल्लक पाणीसाठा असल्याने धरणे लवकर भरली होती. त्यातून पूरस्थिती निर्माण झाली. यंदा मात्र पूरस्थितीची शक्यता कमी झाली आहे.
धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
राधानगरी ८.३६ ४.६७
तुळशी ३.४७ १.०६
वारणा ३४.३९ १६.२२
दूधगंगा २५.३९ ६.०६
कासारी २.७७ १.३३
कडवी २.५१ १.२४
कुंभी २.७१ १.५३
पाटगाव ३.७१ १. ६३
चिकोत्रा १.५२ ०.४८
चित्री १.८८ ०.५३
जंगमहट्टी १.२२ ०.३९
घटप्रभा १.५६ १.५६
जांबरे ०.८१ ०.६७
आंबेओहोळ १.२४ ०.४२
कोयना धरणातील एकूण १०५ टीएमसी साठ्यापैकी २७.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर, आलमट्टी धरणातील एकूण १२३ टीएमसी पैकी २६.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे हळू हळू पाणीसाठा वाढत आहे.
माजगाव : कासारी धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्यापासून आज अखेर १३११ मी. मी. पाऊस झाला आहे. पावसाअभावी जूनअखेर पाणीसाठा खूपच खालावला होता. परिणामी शेतीसाठी उपसाबंदी लागू करायची वेळ आली होती. मात्र, सध्या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती पन्हाळा पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी सचिन लाड यांनी दिली आहे.
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व यवलूज हे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यावरील वाहूतक पूर्ण बंद ठेवली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. रात्री ९ वाजता भोगावती नदीवरील हळदी बंधारा पाण्याखाली गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.