‘ज्यांनी कुणी सोशल मीडियावरून बदनामी केली, त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून कोल्हापूरची ओळख आहे.
कोल्हापूर : आपण छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहोत. त्यामुळे हा विचार अधिक नेटाने पुढे नेताना सर्व धर्मांचा आदर राखणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. या विचारांना तडा जाईल, असे कुठलेही कृत्य आपल्याकडून होता कामा नये.
याबाबतचे प्रबोधन (शुक्रवारी) जिल्ह्यातील दोनशेहून अधिक मशिदीत झाले. मुस्लिम बोर्डिंगमध्ये (Muslim Board) नमाजानंतर सुमारे चाळीस मौलवी, धर्मगुरूंच्या उपस्थितीत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील पासष्टहून अधिक मशिदींत प्रत्यक्ष, तर जिल्ह्यातील इतर सर्व मशिदीत डिजिटल माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात झाला.
दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्या. आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देताना कुठल्याही जातीच्या, धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याची ताकीद त्यांना द्या, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या. येथील मुस्लिम धर्मगुरूंनी यानिमित्ताने पुन्हा एक वेगळा आदर्श दिला असून केवळ कोल्हापूर, महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
कोल्हापूर पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे आणि म्हणूनच येथे सर्व जातीचे, धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात; पण एखाद्या समाजकंटकाकडून सोशल मीडियावरून काहीतरी चुकीची माहिती पसरवली जाते आणि त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात.
या साऱ्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बोर्डिंग, शांतता समिती, जिल्हा बैतुलमाल कमिटी आणि जमियत उलेमा- ए- हिंद या संस्थेच्या माध्यमातून येत्या काळातील खबरदारीचा उपाय म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान, ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही मुस्लिम धर्मगुरू, मौलाना यांची शिखर संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला जातो.
‘ज्यांनी कुणी सोशल मीडियावरून बदनामी केली, त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून कोल्हापूरची ओळख आहे आणि ती कायम राहिलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही सारी मंडळी नेहमीच पुढाकार घेत आलो आहोत.
- मौलाना अजहर सैय्यद, शहराध्यक्ष, जमियत उलेमा- ए- हिंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.