उमेदवार देताना तो शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता असावा, अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देऊ नये, असे साकडे या पदाधिकाऱ्यांनी घातले.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Kolhapur Loksabha Election) जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात शिवसेनेकडून (Shiv Sena) कोणत्याही परिस्थितीत उसना उमेदवार नको, अशी मागणी आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत केली.
दरम्यान, या दोन्ही मतदारसंघात काहीही होऊ द्या, पण कोणत्याही परिस्थितीत भाजपचा (BJP) उमेदवार विजयी होता कामा नये, अशा सुचना श्री. ठाकरे यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या. प्रसंगी स्वबळावर या जागा लढवायचे झाल्यास तशीही तयारी ठेवा, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. या बैठकीला जिल्ह्यातून जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेले असले तरी मतदार मात्र ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा बैठकीत या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळेच उमेदवार देताना तो शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता असावा, अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देऊ नये, असे साकडे या पदाधिकाऱ्यांनी घातले.
ठाकरे म्हणाले,‘आपण राज्यात महाविकास आघाडीत आहोत. देशाच्या पातळीवर ‘ंइंडिया’ आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. कोणत्याही परिस्थितीसाठी पक्षाने तयारी करावी. वेळ आल्यास स्वबळावर लढावे लागले तर तशीही तयारी करा.’
या बैठकीबाबत बोलताना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले,‘दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता उमेदवार असला पाहीजे, ही भूमिका पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर मांडली. शेवटी ठाकरे यांचा जो निर्णय असेल तो मान्य आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.