कोल्हापूर: शेती पंपाला दिवसा १० तास वीज देण्याबाबतचा अहवाल घेऊन वीज नियामक आयोगाच्या मान्यतेने तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या आजच्या बैठकीत दिले.
दरम्यान, या बैठकीतील आश्वासनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १४ दिवसांपासून महावितरणच्या दारात सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन उद्या (ता. ८) मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. श्री. शेट्टी यांनी यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.
तोडगा काढण्यासाठी मंत्री राऊत यांच्या दालनात आज बैठक झाली. बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, राजू आवळे, अरुण लाड, ऋतुराज पाटील, महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, प्रकाश पोपळे, संदीप जगताप आदी उपस्थित होते.
राज्य सरकारकडून सध्याच्या विजेचे वेळापत्रक व शेतीपंपास दिवसा वीज दिल्यानंतर महावितरणच्या विद्युत वहन क्षमता व आर्थिक भार याबाबत माहिती दिली. दरम्यान, ऊर्जामंत्री व अधिकाऱ्यांच्या नकारार्थी भूमिकेपुढे बैठकीच्या सुरुवातीलाच संतापलेल्या श्री. शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज हा त्यांचा हक्क आहे. विद्युतभाराच्या विभागणीत सरकारला बळी घ्यायला शेतकरीच दिसू लागला आहे का? असा सवाल केला. महावितरणला शेतीपंपास दिवसा १० तास कशी वीज देता येईल? याबाबत माहिती त्यांनी सादर केली. तसेच शेतकऱ्यांची चुकीचे वीज बिल दुरुस्त करून देण्यासाठी राज्यात दुरुस्ती अभियान राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
श्री. शेट्टी यांनी महावितरणच्या कारभाराविरुद्ध ताशेरे ओढत वीज खरेदी व इतर महावितरणच्या भानगडीवर हल्लाबोल केला. महापूर, कोरोना, दोन टप्प्यातील मिळणारी ‘एफआरपी’ यामुळे शेतकरी अडचणीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपणार आहे. ती वर्षाने वाढवून देण्याची मागणी केली. नेमलेले मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सी व कंपन्याच्या चुकारपणाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून त्या कंपन्याऐवजी महावितरणकडून रीडिंग घेण्याची मागणी त्यांनी केली. दीड तास चाललेल्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दाखवित आंदोलन थांबविण्याची विनंती केली.
अधिकारी निरूत्तर
दिवसा वीज देणे कसे अशक्य आहे, अशी माहिती आकडेवारीची जंत्री अधिकाऱ्यांनी सादर केली. त्यावेळी संतप्त राजू शेट्टी यांनी ‘आम्ही काय नुसत्या खोऱ्या कुदळीबरोबर खेळत नाही, हा घ्या आमचा प्रस्ताव,’ असे म्हणत रात्री ११ ते पहाटे ४ या काळात शेतकऱ्यांना वीज न देता आणि विद्युतभाराच्या समान वाटपाच्या सूत्राला धक्का न लागता दिवसा कशी वीज देता, हे दाखविल्यानंतर अधिकारी निरुत्तर झाले, हे बघून ऊर्जामंत्री यांनी तज्ज्ञांची समिती नेमण्याची आदेश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.