Krishna River Flood : पुराच्या पाण्यात सुहास पाटलांचा मृतदेह हाताला लागला अन् आख्ख अकिवाट गावंच गलबलून गेलं!

Akiwat Shirol : काल महापूर ओसरतानाच महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली अन् गाव सुन्न झाले.
Akiwat Shirol
Akiwat Shirolesakal
Updated on
Summary

पाण्यात उलटल्याने ट्रॅक्टरमधून गावचे तीन हिरे मात्र कृष्णेनं आपल्या कवेत घेतले. त्यातील सुहास पाटील यांचा मृतदेह हाताला लागला अन् गावंच गलबलून गेलं.

कुरुंदवाड : अकिवाट शिरोळ (Akiwat Shirol) तालुक्यातील सधन गाव. तसं ते अर्धांगवायू अर्थात लकव्‍याच्या देशी औषधासाठी प्रसिद्ध. शेती हाच मुख्य व्यवसाय असून अठरापगड जातींचा समूह गावांत अगदी गुण्यागोविंदानं राहतो. तंटा किंवा वाद गावात टोकाला जात नाहीत. त्यामुळे राजकारणापुरतं राजकारण बाकीच्यावेळी गाव एकत्र येते.

काल महापूर ओसरतानाच महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली अन् गाव सुन्न झाले. महापूर असला तरी संथ वाहणाऱ्या कृष्णेनं (Krishna River Flood) कांही रौद्ररुप घेतलं नव्हतं. मात्र, पाण्यात उलटल्याने ट्रॅक्टरमधून गावचे तीन हिरे मात्र कृष्णेनं आपल्या कवेत घेतले. त्यातील सुहास पाटील यांचा मृतदेह हाताला लागला अन् गावंच गलबलून गेलं.

Akiwat Shirol
कृष्णेच्या महापुरात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून आठजण बुडाले; अकिवाटच्या सरपंच पतीचा मृत्यू, 'अशी' झाली दुर्घटना

कुणाला काहीच सुचेना, तर पाठोपाठ बातमी पसरली माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार व माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे हेही सुहाससोबत पाण्यात बुडालेत. मग, मात्र गाव सुन्न झालं. सुहासचा मृतदेह सापडला; मात्र इकबालभाई व अण्णासाहेबांच काय झालं? कुणाला काहीच समजेना. बस्तवाड फाट्यानजीक गाव गोळा झालं. प्रत्येकजण हळहळत होता. प्रत्येकजण आपापल्या परीनं अंदाज लावत होता. दोघानाही चांगलं पोहता येते. ते पोहत नक्कीच किनारा गाठतील. पोहता पोहता एखाद्या झाडाला पकडून राहिले असतील असं म्हणत स्वत:चीच समजूत घालत होता.

सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या घटनेला दुपार होईल, तशी चिंतेची झालर येऊ लागली. एव्हाना एनडीआरएफ, वजीर रेस्क्यू, व्हाईट आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या पथकाने यांत्रिक बोटीतून चार-पाच किलोमीटर अंतरापर्यंत शोधाशोध केली. मात्र, हाताला काहीच लागलं नाही. रिकाम्या हाताने आलेलं पथक पाहून गावकऱ्यांच्या छातीत चर्रर्र होत होतं. गावाच्या मुख्य रस्त्यावर आलेल्या कृष्णेकडं गावकरी टक लावून बघत बसले होते.

Akiwat Shirol
Police Constable : पोलिस कॉन्स्टेबलचा घरात घुसून धिंगाणा; महिलेची थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय घडलं?

शोधमोहिमेतील कार्यकर्ते गोड बातमी आणतील या आशेवर गावकरी होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत काहीच हाती लागलं नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी गावकरी चौकाचौकांत खिन्न होऊन बसले होते. सायंकाळी सुहास पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. तोपर्यंत शोधमोहीम थांबविली असून, उद्या सकाळी पुन्हा ती सुरू होईल, असा संदेश आला अन् आशेची जागा पुन्हा निराशेनं घेतली. मात्र, तरीही धीर न सोडता इकबालभाई व अण्णासाहेब सुखरुप परत येतील, अशी आशा उराशी बाळगून गावकरी निराश मनाने घरी परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.