इचलकरंजी : गान सम्राज्ञी लता दीदींचे इचलकरंजीशी (Ichalkaranji) खास नाते होते. शहराने पाच दशकांपासून लता दीदींशी (Lata Mangeshkar)असणारे ऋणानुबंध त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपुलकीने जपले. संगीत शिक्षक दिलीप शेंडे (Dilip shinde) यांच्या कुटुंबाशी संपूर्ण मंगेशकर कुटुंबाचाच जिव्हाळ्याचा घरोबा होता. तब्बल चारवेळा लता दीदी शहरात आल्या होत्या. फाय फौंडेशनच्या पुरस्काराच्या निमित्ताने शहराशी त्यांचे नाते जोडले गेले. आणि 2018 साली येथील संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टच्यावतीने त्यांना स्वरमाऊली किताब दिला. लता दीदींचा गाणारा श्वास इचलकरंजीने अनुभवला होता. दीदींच्या निधनानंतर अनेक आठवणींना आज उजाळा मिळाला आहे.
फाय फौंडेशनने राष्ट्रभूषण पुरस्कारासाठी लता दीदींची निवड केली. पुरस्कार समितीचे प्रमुख पु. ल. देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार स्विकारण्यासाठी लता दीदी पहिल्यांदा शहरात आल्या. त्या दिवसापासूनच इचलकरंजीशी दीदींचे नाते जोडले गेले. नेहमी मुंबईत मोठ्या थाटामाटात मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा सोहळा व्हायचा. मात्र तो पहिल्यांदाच मुंबईबाहेर मोठ्या दिमाखात इचलकरंजीत राजाराम मैदानावर पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला न भूतो ना भविष्य असा प्रतिसाद मिळाला. मीनाताई, उषाताई, आशाताई, ह्रदनाथ यासह त्यांची नातवंडे असे मंगेशकर कुटुंबीय चार दिवस शहरात वास्तव्यास होते. यानंतर लता दीदींचे शहरातील अस्तित्व अधिक घट्टपणे जोडले गेले.
ग्वाल्हेर घराण्यातील गायक म्हणून ओळख असणारे दिनानाथ मंगेशकर आणि याच घराण्याचे द्यौत्तक असणारे शहरातील बाळकृष्ण बुवा या आठवणी लता दीदींसाठी अप्रूप होत्या. संगीत शिक्षक दिलीप शेंडे यांच्यामुळे लता दीदी आणि इचलकरंजी असे एक नवीन नाते निर्माण झाले. 2003 साली श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना शंकराचार्य, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते भावगंर्धव किताब देण्यात आला. यावेळी लता दीदी आवर्जुन कुटुंबासह उपस्थित होत्या. त्यानंतर इचलकरंजीनजीक ठरलेला दौरा आणि दिलीप शेंडे सरांचे घर हा लता दीदींचा ठरलेला नियोजीत कार्यक्रमच असायचा.
शहरातील संगीत परंपरेतील प्रत्येक घटकाचे लता दीदींशी अतुट नाते जोडतच गेले. लता दीदींना 90 व्या वर्षी शहरानजीकच्या संत गजानन महाराज मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत स्वरमाऊली हा किताब दिला. या किताबाचे नाव ठरवताना घडलेला प्रसंगही अभिमानास्पद आहे. दिलीप शेंडे हे या किताबाच्या नावाबाबत ह्रदयनाथ मंगेशकरांशी चर्चा करत होते. दिनानाथांच्या पुढे ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा होती. त्यामुळे आपल्या पाठीमागेही माऊलीचाच वरदहस्त असावा या भावनेतून या किताबासाठी स्वरमाऊली हे नाव निश्चित केले. चांदीच्या पत्र्यावर कवियित्री शांता शेळके यांच्या काव्याने नटलेल्या मानपत्राने लता दीदींना गौरविण्यात आले. हे मानपत्र 1995 ला त्यावेळचे नगराध्यक्ष अशोक आरगे यांनी नगरपालिकेच्यावतीने दिले होते. शहराला लाभलेली संगीत परंपरा आणि त्यात लता दीदींनी जोडलेले नाते याचा इचलकरंजीच्या संगीत परंपरेला अभिमान राहील.
खास दीदींसाठी देवघर
संगीत शिक्षक शेंडे यांनी आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर खास दीदींसाठी देवघर तयार केले होते. जेव्हा जेव्हा दीदी त्यांच्या घरी यायच्या त्यावेळी दीदी व त्यांचे कुटुंबीय या घरात निवांत राहत असत. झोपाळ्यावर बसून दीदींनी गायिलेल्या पसायदानाच्या दोन ओळी आजही त्यांच्या आठवणी जागे करतात. ज्या टेबल क्लॉथवर दीदी जेवल्या त्या टेबल क्लॉथवर त्यांनी स्वत:च्या हाताने स्वाक्षरी केल्या. तिथेच बसून खाल्लेले खाऊचे दहा विड्यांची आठवण देवघर जागे करते.
इचलकरंजीचे तोंड भरून कौतुक
2018 साली जेव्हा दीदींना स्वरमाऊली पुरस्कार दिला त्यावेळी लता दीदींना नोटांचा बुके देण्यात आला. मंगेशकर कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जन्मतारीख या नव्या नोटांवर होती. हा बुके पाहून चकीत झालेल्या दीदींनी हे सगळं इचलकरंजीकरांनाच जमतं असे सांगत इचलकरंजीचे तोंड भरून कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.