उत्तूर : एकवेळ माझ्या समोर वाघ आला तर त्याला दोरीनं बांधून घालीन, पण मला मोटारीत बसायला भ्या वाटते. त्यामुळे साऱ्या आयुष्यभर मी चालतच फिरले. हे बोल आहेत महागोंड (ता. आजरा) येथील रंगूबाई आनंदा पाटील (वय 65) यांचे. बैलगाडी, बस, चारचाकी असो वा दुचाकी त्या मोटारीत कधीच बसत नाहीत. त्यांना शासनाची विधवा पेन्शन मिळते. ती न्यायला दर महिन्याला त्या महागोंड ते उत्तूर 20 किमीचा प्रवास चालत करतात.
आयुष्यभर पायी प्रवास करणाऱ्या रंगूबाई आपल्या जीवनाचा प्रवास उलघडताना सांगत होत्या. मला वाहनात बसायची फार भिती वाटते. बैलगाडीपासून एस.टी.बसपर्यंत मी कुठल्याच वाहनात बसले नाही. वाहनात बसायचा विचार जरी मनात आला तरी हात पाय लटपटायला लागतात. चक्कर येवून कोसळते की काय अशी भिती मनात निर्माण होते. यामुळे वाहनात बसायच्या फंदात मी कधी पडले नाही. माझे माहेर वझरे. माजी सरपंच आनंदराव पाटील यांची मी बहीण, पण मी आयुष्यभर 4 किमी असलेल्या माहेरी चालत जाते-चालत येते.
माझ्या मुलीचे सासर 10 किमी अंतरराव भादवण येथे आहे. त्याठिकाणी मी चालतच जाते. कोणत्याही पाहुण्यांकडे मी चालतच जाते. लहानपणी वडीलांच्याबरोबर महागोंड ते गडहिंग्लज असा जाता येता 40 किमीचा प्रवास मी कित्येगता केला. परगावच्या पाहूण्यांचे लग्न असेल, तर मी लग्नाअगोदर एक दिवस चालत जाते, पण लग्नाचा मुहूर्त कधी चुकवला नाही.
तरुणपणी सौंदतीच्या यल्लामा देवीला बऱ्याच वेळा गावकऱ्यांबरोबर गेले. माझ्याबरोबरच्या स्त्रिया चालताना दमायच्या नंतर बैलगाडीत जावून बसायच्या; मी मात्र जातायेता 300 किमीचा प्रवास पायी चालत केला. चालण्याची मला सवयच जडली आहे. मी रोज डोंगरात शेळ्यांना घेवून जाते. या वेळी समजा माझ्यासमोर वाघ आला, तर त्याला दोरीने बांधून घालीन एवढी मी धाडसी आहे. इतर काशाचीच मला भिती वाटत नाही, पण मोटारीच म्हणाल तर मला भिती वाटते. यामुळेच मी वाहनात बसायचा प्रयत्न केला नाही. माझ्या सर्व नातेवाईकांनाही याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनीही कधी तू वाहनात बस म्हणून आग्रह केला नाही.
सकाळी उठून चालायला लागतो...
माझ्या भाच्याचं मेढेवाडीला लग्न होतं. मला हळद घेवून जायची होती. पहिल्या दिवशी चालत जावून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
अगदीच दूर जायचे असेल, तर मध्यंतरी एखाद्या नातेवाईकाकडे मुक्काम करतो आणि सकाळी उठून चालायला लागतो.
- रंगुबाई पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.