महाराष्ट्र-कर्नाटकातील जमावात प्रचंड हाणामारी, दुचाकी, चारचाकी वाहनांची पेटवापेटवी, हल्ले करून एकमेकांना जखमी करणे, अशी गंभीर घटना घडली आहे.
जयसिंगपूर : महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर (Maharashtra-Karnataka Border) कृष्णेवरील राजापूर (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) कडक बंदोबस्त ठेवला आहे. बंधाऱ्यातील पाणी कर्नाटककडे पळविण्यावरून याआधी या ठिकाणी दोन्ही राज्यांतील शेकडोंच्या जमावाने एकमेकांवर हल्ले, जीपसह मोटारसायकली पेटविण्याची घटना घडली होती. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सध्या बंधाऱ्यावर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधारा (Rajapur Bandhara) नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिला आहे. बंधाऱ्यातील बॅक वॉटरमुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना याचा लाभ होत आहे. तर हे पाणी आपल्यालाही मिळावे, अशी कर्नाटकातील काही गावांची मागणी आहे. राजापूर बंधाऱ्यातील हे पाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वादाचे कारण बनते.
याआधी देखील महाराष्ट्र-कर्नाटकातील जमावात प्रचंड हाणामारी, दुचाकी, चारचाकी वाहनांची पेटवापेटवी, हल्ले करून एकमेकांना जखमी करणे, अशी गंभीर घटना घडली आहे. शिवाय बंधाऱ्याच्या भक्कमपणाला नख लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती केली आहे.
सांगली पाटबंधारे विभागाचे बंधाऱ्यावर नियंत्रण आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बंधाऱ्यातील बॅकवॉटरचा लाभ शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना होतो. याच पाण्यावर पिण्याबरोबर शेतीचाही प्रश्न मार्गी लागतो. मात्र बंधाऱ्यापुढे आठ-दहा किलोमीटर अंतर वेगळे तर कर्नाटक राज्याची हद्द सुरू होते. त्यामुळे सहाजिकच राजापूर बंधाऱ्यातील पाणी कर्नाटकच्या गावांना मिळावे, अशी मागणी होऊ लागते. मात्र पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही कर्नाटकला गरजेनुसार पाणी सोडले जाते.
परंतु सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर मर्यादा असल्याने कर्नाटकच्या पूर्ण पाण्याचा हट्ट पूर्ण केला जाऊ शकत नाही. यामुळे कर्नाटकातील गावांमध्ये खदखद निर्माण होते आणि याचाच परिपाक म्हणून धरणावर हल्ल्याचे प्रकार घडू लागतात. नेमका हाच प्रकार टाळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कुरुंदवाड पोलिसांशी संपर्क साधून याठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.
राजापूर धरण सुरक्षिततेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात कर्नाटकला पाणी सोडण्यात आले आहे. यानंतर पुन्हा पाणी सोडले नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
-चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.