Kolhapur News : डोंगर पोखरून रस्ता बांधणीने प्रदूषण वाढणार

ऑक्सिजनने परिपूर्ण परिसरावर बुलडोझरची छाया
making roads through the mountains in the Western Ghats kolhapur pollution
making roads through the mountains in the Western Ghats kolhapur pollution Sakal
Updated on

कोल्हापूर : पश्‍चिम घाटामधील डोंगर पोखरून डांबरी रस्ते करण्याचा घाट घातला जात आहे. वाहतूक वाढल्यास तेथे प्रदूषणाचा टक्का वाढणार आहे, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. ऑक्सिजनने परिपूर्ण असलेल्या या परिसरावर बुलडोझर फिरवण्याचे काम केले जात आहे.

चंदगड तालुक्यातील पारगडच्या पायथ्याला लोकांच्या मागणीचे कारण पुढे करून मिरवेल ते मोर्लेपर्यंत घाट रस्ता केला जात आहे. दिवाळीनंतर काम सुरू होईल, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, मोर्लेतून‌ घोटकेवाडी, तिलारी घाटातून तेरवण मेढेच्या कमानीसमोरील रस्त्याने थेट चंदगडला जाता येते. त्यामुळे हा घाट रस्ता बांधण्याचा अट्टहास कोण करीत आहे, हा प्रश्‍न सामान्य नागरिक करीत आहेत.

कोल्हापूर ते चंदगडचा प्रवास करत पारगडच्या दिशेने गेलो. पारगडपासून मिरवेलपर्यंतचा रस्ता अवघड वळणांचा, तेथून खाली एस. टी अथवा ट्रकसारख्या अवजड वाहनाने नागमोडी रस्त्याने गावात जाणे जीवावर बेतणारे. त्याच रस्त्यावरून मिरवेलमध्ये पोहचलो. तेथील गावकऱ्यांचे म्हणणे ऐकत पुढे निघालो. मोठा डोंगर फोडून केलेल्या बिकट वळणांच्या, दगड-धोंड्यांच्या रस्त्यावरून दाट जंगलातून मोर्लेत पोहचलो. तेथे संतोष मौर्य व गवस यांची भेट घेतली.

वनविभागाच्या परवानगीने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नेमलेल्या ठेकेदाराकडून काही वर्षांपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले. आठ किलोमीटरच्या या कामाला दोन कोटींचा निधी मंजूर असून तीन वर्षांत रस्त्याचे काम पूर्ण करायचे होते; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि काम थांबले.

या रस्त्याने मोर्ले, केर,‌ घोटकेवाडीसह‌ अन्य गावे जोडणार असल्याचा सूर कानावर पडला. चंदगडला पोहचण्यासाठी हा मार्ग आवश्यक असून, येथून गोव्याची हद्द अगदीच जवळ आहे. मिरवेलचा घाट वगळता घोटकेवाडी, तिलारी घाटमार्गे तेरवण मेढेच्या कमानीसमोरील रस्त्याने चंदगडला जाता येते, अशीही माहिती मिळाली.

या सात किलोमीटरच्या रस्ता बांधणीसाठी नऊ कोटी रुपये मंजूर झाले.‌ तिलारीतून आम्ही तेरवण मेढे कमानीसमोरील नामखोलला पोहचलो. हा रस्ता चंदगड व पारगडला जोडणारा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी अनामिका जाधव म्हणाल्या, ‘मुदतीत काम पूर्ण न झाल्याने वनविभागाची पुन्हा परवानगी मागितली आहे. काम सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. परवानगी मिळताच दिवाळीनंतर काम सुरू केले जाईल.’’

अशी आहे सद्यःस्थिती

  • दाट जंगलात प्राण्यांचा वावर

  • मुबलक प्रमाणात दुर्मिळ व औषधी वनस्पती

  • पर्यावरणपूरक जीवनासाठी आरोग्यदायी वातावरण

  • नैसर्गिक जंगलामुळे जैवविविधता समृद्ध

  • मोर्ले-केर परिसरात तीन हत्ती, दोन पिल्लांचा वावर

राखीव वनक्षेत्र विकास प्रकल्प

  • संरक्षित जंगल क्षेत्र, व्याघ्र व इतर वन्यप्राणी संरक्षण क्षेत्रांत प्रकल्पांना मंजुरी

  • मंजुरीसाठी येणारे प्रकल्प ४० टक्के जंगलाशी संबंधित

  • पूर्वी प्रकल्प नामंजूर करण्याचे प्रमाण ११.९ टक्के, सध्या एक टक्का

  • पाच वर्षांत ५७ हजार हेक्टर वनक्षेत्रांचा विकास प्रकल्पांसाठी बळी

  • लॉकडाउनमध्ये अनेक प्रकल्प मंजूर

हे आहेत परिणाम

  • वाहतुकीमुळे प्रदूषण वाढणार

  • वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळा

  • परिसरात रिसॉर्ट, फार्म हाउसचे अतिक्रमण होणार

  • चोरट्या शिकारीला आयते कुरण

  • सापांच्या तस्करीचा धोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.