मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.
कोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या झोंबणार यांना आता मिरच्या... सत्ताधाऱ्यांनो सांभाळा आता तुम्ही खुर्च्या ...'' अशा दिलीप सावंत यांच्या खणखणीत शाहिरीसोबत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा चित्ररथ मुंबईकडे रवाना झाला. मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी केला आहे.
हा निर्धार करूनच कोल्हापुरातून हजारो मराठा बांधव त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने रवाना झाले. उभा मारुती चौकातून वाजतगाजत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या रथयात्रेची सुरुवात झाली.
‘प्रशासनाने कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटिशी आम्ही मानत नाही, या नोटिशींची होळी करून जाणार आहे. राज्य शासनाने एक तर ओबीसीमधून आरक्षण द्यावे. अन्यथा, आम्हाला गोळ्या घालाव्यात, हाच निर्धार मराठा कार्यकर्त्यांचा आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘कोल्हापूर ही आरक्षण नगरी आहे. छत्रपती शाहूंच्या आरक्षण नगरीतून हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना होत आहेत. कोल्हापुरातील गावागावांतून हजारो कार्यकर्ते स्वतःचा शिधा घेऊन वाहनातून रवाना झाले आहेत.’ दरम्यान, शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातून शाहीर दिलीप सावंत यांच्या नेतृत्वखाली चित्ररथ मुंबईला रवाना झाला. ‘एक मराठा लाख मराठा’चा जयघोष करत वाजतगाजत कार्यकर्ते मुंबईकडे निघाले.
मुंबईतील आंदोलनात आता कोल्हापूरच्या शाहिरीचा पहाडी आवाज घुमणार आहे. या रथासोबत सावंत व त्यांचे सहकारी भगवान आमले, सुदर्शन ढाले, रत्नाकर कांबळे, मारुती रणदिवे, योगेश गुरव, दत्ता पोवार, अजय कांबळे उद्या, गुरुवारी संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. यावेळी बाबा पार्टे, शैलजा भोसले, अजित खराडे, संयोगीता देसाई, रोहिणी मुळीक, संपत्ती पाटील, महादेव पाटील, अवधूत पाटील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडहिंग्लज : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गडहिंग्लजमधून मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा निर्धार समाजाच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आला.
आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी मराठा बोर्डिंगच्या आवारात ही बैठक झाली. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण कदम अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुधीर उर्फ आप्पा शिवणे यांनी ही बैठक निमंत्रित केली होती. या आंदोलनाला राज्यभरातील मराठा समाजबांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
आंदोलनात सक्रीय सहभागासाठी समाजबांधव मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यात गडहिंग्लजकरांनीही मागे रहायचे नाही, असा निर्धार करून मोठ्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर धडक मारण्याचा निर्णय घेतला. यावेळी चंद्रकांत सावंत, संजय पाटील, एल. डी. पवार, शिवाजी कुराडे, उत्तम देसाई, युवराज बरगे यांनी विविध सूचना मांडल्या.
बैठकीला अमर पोटे, शैलेश इंगवले, संदीप सावरतकर, संतोष चौगुले, सतीश हळदकर, विश्वास खोत, शंकर सावंत, विजय केसरकर, बाबासाहेब पाटील, धनंजय मोरबाळे, अशोक खोत आदींसह मराठा बांधव उपस्थित होते. शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता पुढील नियोजनासाठी मराठा बोर्डिंगमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.