Jaysingpur : आंबेडकर पुतळ्याचा वाद विकोपाला; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, 150 जणांवर गुन्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (Babasaheb Ambedkar Statue) उभारणीचा वाद विकोपाला गेला आहे.
Jaysingpur Municipality for Babasaheb Ambedkar statue
Jaysingpur Municipality for Babasaheb Ambedkar statueesakal
Updated on
Summary

शाईफेकप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांच्यासह १५० जणांवर जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले.

जयसिंगपूर : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (Babasaheb Ambedkar Statue) उभारणीचा वाद विकोपाला गेला आहे. सि.स.नं. १२६६ ऐवजी १२५१ मध्ये पुतळ्याची कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी सोमवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीने पालिकेवर मोर्चा नेला.

सक्षम अधिकारी नसल्याने संतप्त मोर्चेकऱ्यांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांनी रोखला. यानंतरही सक्षम अधिकारी मोर्चासमोर येत नसल्याने आंदोलकांनी थेट कोल्हापूर-सांगली महामार्गावरील क्रांती चौकात रास्ता रोको करत ठिय्या मारला. तेथे बराच वेळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते; मात्र, अधिकारी नसल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्पळ ठरले.

मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी मोर्चेकरांसमोर आल्यानंतर सि.स.नं. १२६६ च्या प्रस्तावावरून आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्याचवेळी मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर आंदोलकांची पांगापांग झाली. दरम्यान, शाईफेकप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांच्यासह १५० जणांवर जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले.

जुन्या न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा, अशी सकल बहुजन समाज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीची मागणी आहे. अनेक दिवसांपासून यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. आज याच मागणीसाठी आंबेडकरवादी कार्यकर्ते सकाळी बौद्ध विहारात जमले. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. क्रांती चौक येथे मोर्चा आला. तेथे बसस्थानकात लावलेला डिजिटल फलक वादाचे कारण बनला.

कार्यकर्त्यांनी आधी हा फलक हटवावा, अशी मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली. आंदोलकांचा संताप पाहून पोलिसांनी तातडीने फलक हटविला. यानंतर हा मोर्चा पुढे रेल्वेस्टेशनमार्गे पालिकेसमोर आला. पालिकेसमोर मोर्चा आल्यानंतर मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी पालिकेत अनुपस्थित होते. ही बाब मोर्चेकऱ्यांना समजताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. मुख्याधिकारी नसतील, तर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांना मोर्चासमोर यावे लागेल, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

यावरून पालिकेसमोर सुमारे दोन तास घोषणाबाजी सुरू होती. त्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे चौकाच्या चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागून राहिल्या. कॉलेज विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह प्रवासी वर्गाचे हाल झाले.

दिवसभर शहरातील सर्वच व्यवसाय बंद राहिल्याने लोकांना पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागली. सुमारे तीन तास वाहने जागच्या जागी उभी होती. वाहने पुढे सोडण्यावरून आंदोलक आणि वाहनधारकांमध्येही किरकोळ वाद झाले. मुख्याधिकारी आंदोलनस्थळी आल्यानंतर बसस्थानकातील पुतळ्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा आग्रह धरण्यात आला.

Jaysingpur Municipality for Babasaheb Ambedkar statue
Success Story : जिद्द असावी तर अशी! अंथरुणाला खिळलेल्या पवनकुमारनं 'या' परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

यावेळी आंदोलकांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने गर्दीतील एकाने थेट मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक केली. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने क्रांती चौकात पोलिस व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. यामुळे मार्गावरील प्रवाशांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Jaysingpur Municipality for Babasaheb Ambedkar statue
Solapur : यल्लम्मा, नाऊ यान पाप माडीद्याऊ..; आईच्या टाहोनं गहिवरलं गाव, एकाच चितेवर चौघांवर अंत्यसंस्कार

मुख्याधिकाऱ्यांना बसविले रस्त्यावर

सुमारे तीन ते चार तास आंदोलनकर्त्यांना हुलकावणी दिलेले मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी क्रांती चौकात आंदोलकांसमोर आले. त्यांनी रस्त्यावर बसूनच चर्चा करावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांचा संताप लक्षात घेऊन मुख्याधिकारी कोल्हापूर-सांगली महामार्गावर चर्चेसाठी बसले होते.

त्यांच्यावर कारवाई का नाही?

उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे आंदोलकांसमोर आले. त्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. बसस्थानकाच्या आवारात पुतळ्याचे बेकायदेशीर भूमिपूजन करणाऱ्यांवर कारवाई का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.

Jaysingpur Municipality for Babasaheb Ambedkar statue
Balu Dhanorkar : खासदारांची प्रकृती गंभीर होती अन् काँग्रेसला लागलेली पदाची चिंता

१५० जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, शाईफेकप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांच्यासह १५० जणांवर जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. याबाबतची फिर्याद जयसिंगपूर पालिकेचे मुख्याधिकारी तैमुर गफूर मुलाणी यांनी दिली. त्यानुसार विश्वजित कांबळे, शांताराम कांबळे, अमित वाघवेकर, विकास कांबळे, दिगबर संकट, आदम मुजावर, सुशांत कांबळे, सुरज कुरणे, मनीषा कांबळे, किरण कांबळे, संतोष कांबळे, प्रमोद कांबळे, सुरेश भाटिया, अंकुश कुंभार, मिलिंद कांबळे यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.