कोल्हापूर : गांधी मैदानात त्यावेळी महायज्ञ सुरू होता. त्या विरोधात पुरोगामी कार्यकर्त्यात संतापाची भावना होती. त्यातूनच मोर्चा शिवाजी पेठेतील गांधी मैदानाच्या दिशेने निघाला. प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, गोविंद पानसरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पापाची तिकटीजवळ मोर्चा पोलिसांनी अचानक रोखला. त्यानंतर शांत बसतील ते एन. डी. कसले. ज्या पोलिस अधिकाऱ्याने मोर्चा रोखला त्याच्यावर एन.डीं.ची. तोफ दणाणलीच, ‘मिस्टर पाटील तुमचे जेवढे आता वय आहे तेवढी माझी सार्वजनिक जीवनात गेली आहेत. मोर्चा का रोखलात, आम्ही काय तुम्हाला चोर वाटलो की दरोडेखोर, असे शब्द बाहेर पडताच संबंधित पोलिस अधिकारीही हादरला आणि मोर्चाला वाट मोकळी झाली.
एन. डीं.च्या रोखठोकपणाची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील हे एक दुर्मिळ. गांधी मैदानातील त्या यज्ञाची सुरुवातीला दाहकता जाणवली नाही. नंतर यज्ञाची श्रीमंती पाहता अनेकांचे डोळे उघडले. त्या विरोधात कोणीतरी आवाज उठविण्याची तयारी सुरू झाली. पण नेमकी भूमिका घेणार कोण? असा प्रश्न होता. कोल्हापुरात एखाद्या सार्वजनिक प्रश्नावर आंदोलन करायचे म्हंटले तर एन. डी. मंडलिक आणि पानसरे ही माणसे ठरलेली असायची. यज्ञाच्या विरोधात मोर्चा काढणे सोपी बाब नव्हती. तिघांच्या हाकेला प्रतिसाद देणारे अनेक कार्यकर्ते होते. त्यांची मोट बांधली गेली आणि अखेर मोर्चा निश्चित झाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा गांधी मैदानाकडे कूच करू लागला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. गांधी मैदानाजवळ मोर्चा पोहचला आणि त्यातून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसही मोठ्या प्रमाणावर तैनात होते. नेमका पापाची तिकटीजवळ मोर्चा रोखला. अचानक घडामोड झाल्याने एन.डी.ही चांगलेच संतापले.
जे पोलिस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत होते त्यांना सर्वांसमोरच उद्देशून एन.डी. बोलत होते. त्यावेळी वातावरण काही काळ शांत झाले. एन.डी. यांचा आवाज खणखणीत की त्यांना माईकची गरज कधी लागली नाही. त्या अधिकाऱ्याचे वय आणि अनुभवावर बोट ठेवत ‘मिस्टर पाटील तुमचे जेवढे वय आहे तेवढी माझी हयात सार्वजनिक जीवनात गेली आहे. मोर्चा का अडविला आम्ही चोर आहोत की दरोडेखोर असे म्हणताच संबंधित अधिकारी निरूत्तर झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.