हाळवणकर हे आमदार असताना आवाडे यांना विरोध करीत काहीजणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता, मात्र त्यांची कोंडी झाली आहे.
इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला तरी पुढील राजकीय वाटचाल सोपी नाही. त्यांच्या पक्षप्रवेशाने सध्या तरी इचलकरंजीतील (Ichalkaranji Assembly) भाजप बळकट झाल्याचे दिसते. पण, प्रत्यक्षात ही ताकद आगामी विधानसभा निवडणुकीत दिसण्यासाठी आता आमदार आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
सध्या भाजपकडून राहुल आवाडे (Rahul Awade) यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मूळची भाजपची यंत्रणा कितपत राहणार हे अद्याप स्पष्ट नाही. नेतेमंडळी एक झाली तरी कायकर्त्यांची मने अद्याप जुळलेली दिसत नाहीत. त्यासाठी आवाडे व हाळवणकर यांना कसरत करावी लागणार आहे. तूर्तास तरी आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने कोणाचा फायदा होणार, कोणाचा तोटा होणार यावरच आता चर्चा रंगली आहे.
भाजप आणि आवाडे यांचा २५ वर्षांपासूनचा राजकीय संघर्ष सुरू आहे. गेली पंधरा वर्षे आवाडे व हाळवणकर हेच प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत. जिल्ह्यातील भाजपचे विधान सभेतील पहिले आमदार म्हणून हाळवणकर यांची ओळख आहे. त्यांनी शहर व परिसरात भाजपची बांधणी केली आहे. त्यामुळे त्यांचे पक्षात चांगले वजन आहे. साहजिकच विधानसभा निवडणुकीत त्यांनाच पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असा दावा केला जात होता. त्यानुसार मतदारसंघ प्रभारी शशिकला जोल्ले यांच्या भागाभागांत बैठका सुरू झाल्या आहेत. पण, एका दिवसात शहरातील राजकारणाची दिशाच बदलली आहे.
आवाडे विरोधकांना ही घडामोड अपेक्षित होती, तर महायुतीतील घटक पक्षांच्या इच्छुकांची गोची झाली आहे. त्यांच्यासमोर माघार अथवा बंडखोरी हा एकच पर्याय आहे. आवाडे यांची इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र ताकद आहे. संस्थांत्मक जाळे असल्यामुळे त्यांच्याशी राजकीय टक्कर देणे सोपे नाही. आता तर ते अधिकृत भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद मागे राहणार आहे. त्यामुळे विरोधकांसमोर त्यांचे कडवे आव्हान आहे. मात्र त्यासाठी आवाडे व भाजप कार्यकर्त्यांची मने जुळाली तरच ही ताकद प्रत्यक्षात दिसणार आहे. तूर्त तरी भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे.
ज्यांच्याबरोबर ईर्ष्येने संघर्ष केला त्यांच्यासोबत जावे लागणार असल्याने पुढे काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर हे कार्यकर्ते शोधत आहेत. दुसरीकडे आवाडे यांची राजकारणाची बहुतांश वाटचाल काँग्रेसमध्ये झाली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांवर आजही काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव असल्याचे दिसते. पण आता बदलत्या परिस्थितीत त्यांच्या समर्थकांनाही भाजपचा विचार स्वीकारून पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
जिल्ह्यात फक्त इचलकरंजीत भाजपचे लक्षणीय संघटन आहे. या मतदार संघातून हाळवणकर दोन वेळा ‘कमळ’ चिन्हावर विजयी झाले. आता मात्र त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आवाडे हेच भाजपमध्ये आल्यामुळे हाळवणकर यांच्या भविष्यातील राजकीय वाटचाल खडतर झाली आहे. त्यांचे पक्षाकडून कसे पुनर्वसन केले जाणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. विधान परिषदेवर त्यांना संधी दिली जाणार असल्याची सध्या तरी चर्चा सुरू आहे.
हाळवणकर हे आमदार असताना आवाडे यांना विरोध करीत काहीजणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता, मात्र त्यांची कोंडी झाली आहे. यातील एक गट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यांना रोखण्याचे आव्हान भाजप पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे. तथापि, भाजपमधील काहीजण या घडामोडींमुळे खूश झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.