Monsoon Season : निरोगी पावसाळ्यासाठी आहारात हव्या 'या' रानभाज्या; औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण बनवेल आहार

रानभाज्यांची पारंपरिक ओळख ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आहे.
Monsoon Wild Vegetables
Monsoon Wild Vegetablesesakal
Updated on
Summary

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवून येतात. त्यांची लागवड न करता त्या उगवल्याने त्यांना खतांची आवश्यकता नाही.

-गौरव डोंगरे

कोल्हापूर : पावसाळा (Monsoon Season) म्हणजे भाज्यांची कमतरता, कडाडलेले दर, गृहिणींना सतावणारी मुलांच्या डब्यांची चिंता. यासोबतच पावसाळी वातावरणात अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. अशावेळी तुमच्या आहारातील बदलांकडेही तितक्याच सजगपणे पाहणे गरजेचे आहे. पहिल्या पावसासोबत शेतात, परसात, उद्यानांमध्ये, ओसाड माळांवर उगवणाऱ्या अनेक तणांचा ''रानभाजी'' (Wild Vegetables) म्हणून उपयोग केल्यास पैशांच्या बचतीसोबत आरोग्यदायी पावसाळा करता येईल. काही निवडक रानभाज्यांची ही ओळख...

रानभाज्यांची पारंपरिक ओळख ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आहे. तसेच दुर्गम भागातील वस्त्यांवर आजही या भाज्या आवडीने आहारात समाविष्ट केल्या जातात. परंतु, शहरी भागात राहणाऱ्या गृहीणीदेखील आपल्या परिसरात अशा रानभाज्यांचा शोध घेऊ शकतात. लाजाळू, शेवगा, आघाडा, गोकर्ण, गुळवेल अशा वनस्पतीत तुमच्या अंगणात, टेरेसवरील कुंडीमध्येही उगवणाऱ्या आहेत. त्यांच्या बहुगुणी उपयोगासोबत तुमची स्वयंपाकातील भाजीचा प्रश्नही निकाली लागण्यास मदत होणार आहे.

रानभाज्यांची वैशिष्ट्ये...

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवून येतात. त्यांची लागवड न करता त्या उगवल्याने त्यांना खतांची आवश्यकता नाही. किडीचा, रोगांचा प्रादुर्भाव नसल्याने आरोग्याला अत्यंत उपयुक्त ठरतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, निद्रानाश दूर करणे, पित्ताला गुणकारी, पोटाचे विकार नष्ट करणाऱ्या अशा रानभाज्या पावसाळ्यातील आहारात नक्की असाव्यात.

Monsoon Wild Vegetables
Health Tips : आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'हा' आहार आहे पोषक, पचन सुधारण्यासही होते मदत

घोळ : शेतात तण म्हणून उगवणारी ही वनस्पती काढून टाकली जाते. घोळ ही मूळव्याधासाठी गुणकारी असून रक्तशुद्धी, मूत्रपिंड, दातांतून रक्त जाण्यावर उपयोगी ठरते. चव थोडी आंबट असली तरी तिच्या सेवनाने कफ, पित्तदोष कमी होतो. घोळीची भाजी बनविता येते.

टाकळा : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माळरानावर नजरेस पडणारी रोपवर्गीय वनस्पती म्हणजे टाकळा. दोन फुटांपर्यंत वाढणाऱ्या वनस्पतीच्या बियांना कॉफीप्रमाणे वास असतो. सर्व प्रकारच्या त्वचारोगांमध्ये पानांची भाजी देणे, बियांचा लेप गुणकारी ठरतो. दात येताना लहान मुलांना येणाऱ्या तापावेळी पानांचा काढा उपयुक्त ठरतो. हृदयविकार, खोकला, श्वसनविकार, खरूज, वात, कफदोष कमी करण्यासाठी भाजी खावी.

वाघाटी : आषाढी एकादशीच्या एकाच दिवशी वाघाटीचा शोध घेतला जातो. यादिवशी वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी करतात. वाघाटी पित्तशामक असून सूतिका ज्वरामध्ये त्याचा काढा पिल्यास फायदा होतो. थायरॉईड ग्रंथी कार्यात बिघाड झाल्यास वाघाटी भाजीच्या सेवनाचा लाभ होतो.

शेवगा : शेवग्याची पाने, शेंगा, बिया, मूळ, फुले या सर्वातच औषधी गुणधर्म आहेत. दुधापेक्षा चौपट कॅल्शियम, तीन केळांइतके पोटॅशियम, सहा संत्र्यांइतके 'क' जीवनसत्त्‍व आढळून येते. शेवग्याने मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या आजारात फायदा होतो. पाचनशक्ती वाढविणे, आतड्यांना उत्तेजन व शौचास साफ होते. मुळांचा रस, सालींचा काढा दमा, संधिवात, यकृतवृद्धीसह मूतखड्यात प्रभावी ठरतो. मृग नक्षत्राच्या आगमनालाच शेवगा न खाता वर्षभर तो आहारात समाविष्ट करावा, असे आहारतज्‍ज्ञ सांगतात.

Monsoon Wild Vegetables
राजापुरातील 'हे' चारही धबधबे झाले प्रवाहित; हिरव्यागार शालू पांघरलेल्या डोंगरकपारीतून कोसळणाऱ्‍या धबधब्यांकडे वळू लागले पर्यटक

मायाळू : लाल व नाजूक देठ, जांभळट, करडी, हिरवट पाने, पानांच्या बेचक्यातून उगवणारी अशा मायाळूचा वेल तुमच्या घराशेजारी परसात, कुंडीत उगवू शकतो. अंगावर पित्त उठल्यास याची पाने चोळतात. कफकारक, पौष्‍टिक व ज्वरनाशक अशी ही वनस्पती आहे. पानांची भाजी, पातळ भाजी करून खातात.

आघाडा : श्री गणरायाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वांसोबत आघाडाही घातला जातो. रोपवर्गीय आघाडा जंगलात, पडीक जमिनीवर, रस्त्याकडेला मुबलक प्रमाणात पावसाळ्यात मिळतो. तिची मुळे, पाने, फुले, फळे औषधी आहेत. आम्लतानाशक, रक्तवर्धक, पित्तसारक गुणधर्माचा आघाडा अंगातील चरबी करण्यासाठीही उपयुक्त आहे. आघाड्याची भाजी, भजी, काढा करून सेवन करता येते.

Monsoon Wild Vegetables
बेळगाव: एक महिन्याच्या बाळाच्या अपहरणामुळे डॉक्टरचं बिंग फुटलं; चौकशीत उघड झालं गर्भपाताचं रॅकेट

केना : नाजूक खोड व जमिनीवर परसत वाढणारा केना पावसाळ्यात मुबलक मिळतो. केनाच्या कोवळ्या पानांची भाजी बनविता येते. पचनास हलकी असल्याने मलावरोधाचा त्रास कमी करतात. त्वचाविकार, सूज कमी करण्यासाठी उपयुक्त, भाजीच्या सेवनाने लघवी साफ होण्यास मदत होते. केन्याची भाजी, भजी करून आहारात घेऊ शकता. यासोबतच भारंगी, कुरडू, हादगा, पानांचा ओवा, चुका, काटेमाठ, मोहोर, पाथरी, दिंडा, मोरशेंड, भोकर, तांदूळजा, अंबाडा, पिंपळ, उंबर, सुरण, करवंद, अळू, राजगिरा, शतावरी, चिवळ, रानमेथी, वायवर्णासारख्या रानभाज्या यंदाच्या पावसाळ्यात नक्की खाव्यात.

पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या वनस्पतींचा आहारातील वापर फायदेशीर ठरतो. बदलत्या वातावरणात या वनस्पती रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. गुळवेल, गोकर्ण, मायाळूसारख्या वनस्पती आपल्या घरातील कुंडीमध्येही वाढविता येतात. ग्रामीण भागात अशा रानभाज्यांच्या अनेक पाककृती आजही उपलब्ध आहेत. रानभाज्यांचा आहारातील वापर वाढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

-अनिल चौगुले, निसर्गमित्र परिवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.