सलग दोन दिवस मुसळधार पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला झोडपून काढले आहे.
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा (Koyna Dam Rain) जोर कायम आहे. आज पाणलोट क्षेत्रात सरासरी १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी धरणाच्या पाणीसाठ्यात साडेतीन टीएमसीने वाढ झाली. धरणाच्या पाणीसाठ्याने आज ५० टक्के क्षमता पूर्ण केली आहे. एकूण पाणीसाठा ५२.१५ टीएमसी झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा १५ टीएमसीने जास्त झाला आहे.
सलग दोन दिवस मुसळधार पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १२२, नवजाला ११९ आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) १४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
गेल्या वर्षीच्या पाणीसाठा आणि पावसाचा विचार केला, तर २० जुलै रोजी धरण पाणलोट क्षेत्रात कोयनानगर येथे १५६० मिलिमीटर, नवजाला २२३६ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला २२२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती जलाशयात ३७.३६ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी आजपर्यंत कोयनानगर येथे २३४२, नवजा २७८४ आणि महाबळेश्वरला २१६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी संपूर्ण जून महिना व जुलै महिन्यातील दोन आठवडे मॉन्सूनच्या पावसाच्या प्रतीक्षेत गेले होते. १५ जुलैनंतर गेल्या वर्षी २० जुलै रोजी ढगफुटीसारखा पाऊस पडला होता. त्यावेळी जलाशयात प्रतिसेकंद ७४ हजार ५६९ क्युसेक्स पाण्याची आवक होत होती. यावर्षी जादा असलेला पाणीसाठा पुढील काळात दक्षता घ्यावी लागणार हे सूचित करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.