कोल्हापूर : सारथी उपकेंद्राच्या कारभाराला गती देण्यासाठी आंदोलन

सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू झाल्यापासून स्थानिक पातळीवर एकही उपक्रम नाही
sarthi organization
sarthi organizationsakal
Updated on

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कोल्हापुरातील उपकेंद्राच्या कारभाराला गती देण्यासाठी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील उपकेंद्रासमोर सोमवारी (ता. २८) वाजत गाजत आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री. कोंढरे म्हणाले, "सारथी संस्थेच्या प्रशासनाने उपकेंद्र सुरू झाल्यापासून स्थानिक पातळीवर एकही उपक्रम घेतलेला नाही. या कार्यालयात दोन कर्मचारी व एक अधिकारी नियुक्त केला आहे. संस्थेकडे १४० कोटी रुपये निधी असून तो, मार्चअखेर खर्च कसा करणार असा प्रश्न आहे. संस्थेची स्थापना झाल्यावर सात महिन्यात पंधरा प्रकल्प सुरू करून बावीस प्रकल्प शासन मान्यतेसाठी पाठवले होते. त्यातील केवळ दोनच प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे निधी असून उपक्रम नसल्याची स्थिती संस्थेची आहे. पन्नास हजार युवकांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत हालचाल झालेली नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात संस्थेचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे."

ते म्हणाले, "प्रशासनाने व्हिजन डॉक्युमेंट २०३०च्या नावाखाली नव्या सूचना मागवल्या आहेत. आज संस्थेच्या अधिकारात मंजूर असलेले उपक्रम सुरु होत नाहीत, ही शोकांतिका आहे. संस्थेचे ध्येय उद्दिष्ट, उपक्रम निर्मिती, अहवाल जुने व नवे उपक्रम यासह अनेक माहिती संस्थेने प्रशासनाकडे उपलब्ध केली आहे त्याकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी उपकेंद्रावर वाजत-गाजत आंदोलन केले जाईल. त्याची दखल न घेतल्यास येत्या पंधरा दिवसात संस्थेशी संबंधित घटकांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल."

वसंतराव मुळीक म्हणाले, 'उपकेंद्राच्या माध्यमातून काहीच झालेले नाही. प्राथमिक सुविधाही तेथे उपलब्ध झालेल्या नाहीत."पत्रकार परिषदेस शशिकांत पाटील, शैलजा भोसले, उत्‍तम जाधव, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव शेळके, सरदार पाटील, अवधूत पाटील, प्रतिकसिंह काटकर, प्रतिक साळुंखे, प्रकाश पाटील उपस्थित होते.

सारथी संस्था म्हणजे शिष्यवृत्ती देणारी, असा समज झाला आहे. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यात बेरोजगार तरुणांचे प्रमाण मोठे आहे. शेतीचे तुकडे मोठ्या प्रमाणात पडल्याने युवक-युवती संस्थेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेने विविध प्रकल्प राबवून तरुणांना दिशा द्यावी, असे श्री. कोंढरे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.