कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (ता. ११) होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेऊन निकाल राखून ठेवला असता तरी चालले असते. गेली अनेक वर्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत यामुळे नाराजी असल्याचे यासंदर्भात संबंधित तरुणांशी चर्चा केल्यानंतर पुढे आले.
सलग चौथ्यांदा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे कारण देत परीक्षा लांबणीवर टाकण्याची घोषणा केली.
या निर्णयानंतर उमेदवारांमध्ये कहीं खुशी कहीं गमची स्थिती आहे. कोरोनामुळे एप्रिलमध्ये होणारी ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये आली. ११ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना मिळाली होती. जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षेची तयारी पूर्ण झाली होती. तसा संदेशही आयोगाकडून आज मिळाला होता; परंतु परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर उमेदवारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
समन्वयाचा अभाव
परीक्षा लांबल्याने विद्यार्थी अस्वस्थ आहेत. निदान पूर्वपरीक्षा घेऊन आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत निकाल राखून ठेवता आला असता. परीक्षा झाली असती तर मुख्य परीक्षेला वेळ मिळाला असता असे मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. आयोगाने एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरून घेतले आहेत; पण पुढील निवडीबाबत स्पष्टता नव्हती त्यामुळे शासन आणि आयोगात समन्वय नसल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
विद्यार्थ्यांनी करायचं काय ?
कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरला. अनेकांनी अभ्यासही बंद केला; परंतु परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर परत अभ्यासाला सुरवात केली. अनेकांनी शहरे गाठली परंतु परत परीक्षा रद्द झाल्याने आता काय करायचं हा प्रश्न आहे. दैनंदिन खर्च कसा भागवायचा, तसेच वाढत चाललेले वय ही वेगळीच समस्या निर्माण होत आहे.
परीक्षा होणे गरजेचे होते. वर्षभरापासून अभ्यास करत आहोत. सतत परीक्षा रद्द होत असल्याने मनोधैर्य खचत आहे. शासनाने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून परीक्षा घ्याव्यात.
- दिग्विजय भोसले, परीक्षार्थी
सध्या कोरोनाचा संसर्ग कायम आहे. परीक्षेला बसलेले बरेच उमेदवार बाधित आहेत. त्यामुळे ते या परीक्षेला मुकले असते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तसेच आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर परीक्षा घ्याव्यात.
- श्रीराम शेळके, विद्यार्थी
मराठा उमेदवारांना आरक्षण मिळणे जरुरी आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने या परीक्षेनंतर निकाल कसा लावायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. त्यापेक्षा परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय योग्य आहे.
- पूजा चौगले, विद्यार्थिनी
कोणत्याच परीक्षा होत नसल्याने नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्याची परीक्षा होणे महत्त्वाचे होते. कारण पुढील अभ्यासाला संधी मिळाली असती. पण पूर्व परीक्षाच होत नसेल तर पुढे काय करावे?
- गणेश माळी, विद्यार्थी
संपादन -अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.