कोल्हापूर : सरत्या वर्षातील कटू आठवणींना तिलांजली देत आज रात्री कोल्हापूरकरांनी जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. एकमेकांना आरोग्यदायी शुभेच्छा देत सहकुटुंब सेलिब्रेशनवर अनेकांनी भर दिला. विविध हॉटेल्स, रिसॉर्टस् आणि फार्म हाऊसेसवरही रात्री उशिरापर्यंत गर्दी राहिली.
दरम्यान, दोन वर्षांनी कोणत्याही निर्बंधाशिवाय हा आनंदोत्सव सजला. अत्याधुनिक ध्वनी-प्रकाश योजनांसह रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साक्षीने उत्साहाला उधाण आले. मात्र, पोलिसांचा त्यावर खडा पहारा राहिला. रात्री बाराच्या सुमारास अनेक ठिकाणी आतषबाजीने नववर्षाचे स्वागत झाले. सोशल मीडियावरूनही शुभेच्छांना उधाण आले.
दुपारपासूनच ग्राहकांच्या स्वागतासाठी हॉटेल्स, रिसॉर्टस् सज्ज झाली. दुपारपासूनच हॉटेलमध्ये पार्सल बुकिंगसाठी गर्दी होऊ लागली. सायंकाळी सातनंतर तर सहभोजनासाठी आणि पार्सल नेण्यासाठीही सर्वत्र धांदल उडाली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साक्षीने स्नेहभोजनावर भर दिला गेला. मांसाहाराबरोबरच शाकाहारी खवय्यांसाठीही अनेक रेसीपीज या सेलिब्रेशनसाठी उपलब्ध होत्या. दरम्यान, उद्या (रविवारी) वर्षाचा पहिला दिवस आणि सार्वजनिक सुटी असा दुहेरी योग आल्याने यानिमित्तानेही अनेकांनी सेलिब्रेशनचा बेत आखला आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
आनंदोत्सवाच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. ५१ ब्रेथॲनालायझरची व्यवस्था करण्यात आली तर दीड हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी, शंभर होमगार्ड आणि त्यांच्यासोबत राज्य राखीव दलाची एक टीमही रात्रभर बंदोबस्तात होती.
गल्ल्या, अपार्टमेंट एकवटल्या...
गल्ली, अपार्टमेंट, कॉलनीतील लोकांनी एकत्र येऊन सहभोजनावर अनेकांनी भर दिला. विविध स्पर्धा, गीत-नृत्याचे कार्यक्रमही यानिमित्ताने रंगले. काही ठिकाणी तर महिलांनी एकत्र येऊन सहभोजनाबरोबरच विविध उपक्रमांनी आनंदोत्सव साजरा केला.
विधायकतेचीही झालर
शिवाजी पेठेतील मरगाई गल्ली मंडळासह काही मंडळांनी आज सरत्या वर्षाला निरोप देताना रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. रंकाळा वॉकर्स ग्रुपतर्फे झालेल्या ‘चाला, आरोग्यासाठी’ या उपक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला. अक्कलकोटला गेलेल्या भाविकांनी आजची रात्र भजनात तल्लीन होत घालवली. उद्या (रविवारी) दर्शन घेऊन ही मंडळी पुन्हा कोल्हापूरकडे परततील. काही संस्था व संघटनांनी रात्रभर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांसमवेत ‘कॉफी वुईथ पोलिस’ हा
उपक्रमही राबवला.
शहरातील उद्यानातील गर्दी
नववर्षाच्या आनंदोत्सवासाठी महापालिकेने शहरातील उद्याने रात्री बारा पर्यंत खुली ठेवली होती. त्यामुळे अनेकांनी या उद्यानात जाऊन सहकुटुंंब भाेजनाचा आनंद घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.