माझ्या वाईटाला कोणी जाऊ नये ः पालकमंत्री सतेज पाटील

bawada.png
bawada.png
Updated on

कोल्हापूर,  "मी कोणाचे वाईट केलेले नाही आणि माझ्या वाईटाला कोणी जाऊ नये. पडद्यामागून मी वार करत नाही. समोरून वार करतो. तीर कोठे लावायचा, हे मला चांगले माहीत आहे, अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढवायची की स्वबळावर याचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या बावड्यातील पाण्याची टाकीची चिंता शिरोलीकरांना होती, त्यांनाही आम्ही पाणी पाजले, असेही त्यांनी आगामी राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर टोला लगावला. 
कसबा बावडा येथील विविध विकासकामांचे उद्‌घाटन व नूतन आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या सत्कारानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. 
दरम्यान, मेपर्यंत थेट पाईपलाईनचे पाणी निश्‍चितपणे शहरात आणू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार प्रा. संजय मंडलिक, डॉ. संजय डी. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, अशोक जाधव, सुभाष बुचडे, माधुरी लाड, स्वाती यवलुजे. डॉ. संदीप नेजदार, श्रावण फडतारे, धनाजी गोडसे, मोहन सालपे आदी उपस्थित होते. 
मंत्री पाटील म्हणाले, ""बावड्यातील टाकीचा प्रश्‍न खूप दिवसापासून चर्चेत होता. त्याची चिंता ज्या शिरोलीकरांना होती. त्यांनाही आम्ही पाणी पाजले. पुढे राजाराम कारखान्याची निवडणूक आहे. त्यामुळे पाणी कसे पाजावे, हे बावडेकरांना चांगले ठाऊक आहे. भाजप सरकारच्या काळात अपेक्षेप्रमाणे निधी मिळाला नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर कोरोनाचे संकट उभे राहिले. तरीही आम्ही 47 कोटींचा निधी आणला. शहरातील शंभर टक्के सिग्नल आम्ही सुरू केले. बिंदू चौकातील पार्किंगसाठी पैसे दिले. संपूर्ण शहराचा कचरा बावड्यात येतो. त्याचे बायोमायनिंग सुरू केले. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी बावड्याने सांभाळली. ज्यांना बावडा भकास आहे, असे वाटते. त्यानी माझे बोट धरून बावड्यातून फेरी मारावी.'' 
"मी कधीही पडद्यामागून वार केला नाही. मी नेहमी समोरून वार करतो. शिवधनुष्यातील तीर कुठे मारायचा, हे मला चांगले ठाऊक आहे. मी कुणाचेही वाईट केले नाही. माझ्याही वाईटाला कुणी जावू नये. कसबा बावड्यामध्ये येत्या 31 मार्चअखेर साडेसहा कोटींची कामे आणखी होणार आहेत. त्यात बिरंजे पाणंद चॅनेल, पॅव्हेलियन ग्राऊड फ्लडलाईट तसेच पाण्याच्या टाकीचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले. 
ते म्हणाले, ""माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढवेल, असे सांगितले तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सर्व जागा लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे माझी पंचाईत झाली. त्यामुळे मी ही स्वबळावर लढण्याचे सांगितले. तरीही तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून निश्‍चितपणे मार्ग काढू. तिन्ही पक्षांचा शत्रू निश्‍चित आहे. त्याला पुढे येवू द्यायचे नाही, हे ठरवू. पाच-दहा प्रभागामध्ये तडजोड करता येते का पाहू, बावड्यातील इच्छुकांनीही कोणतीही घाई गडबड करू नये. त्यामुळे कोण इकडे तिकडे गेला तर त्याचा कार्यक्रम ठरला.'' 
आमदार ऋतूराज पाटील यांनी बावडा ही कर्मभूमी असून पाटील कुटुंबीयांशी बावड्याने नेहमी ऋणानुबंध जपला आहे. बावडा एक रोल मॉडेल म्हणून विकसित करू, असे सांगितले. 
खासदार संजय मंडलिक यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आजच सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून एकत्रित लढायचे की स्वतंत्र याचा निर्णय घेण्याचे सांगितले असल्याचे सांगितले. शिवसेनेला सोबत घेणार आहात की नाही, असा सवालही त्यांनी सतेज पाटील यांना केला. वेगवेगळ्या दिशेने आपण गेलो तर आपलेच नुकसान होणार असल्याचे ते म्हणाले. आमदार जयंत आसगावकर यांनी सतेज पाटील यांच्यामुळेच आपला विजय सुकर झाला असून सतेज पाटील यांचा उमेदवार अशीच ओळख विधीमंडळात असल्याचे सांगितले. 

- संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.