२०१४ पूर्वी परजिल्ह्यातून केवळ ‘एनओसी’ वरून वाहन खरेदी केले आहे त्यांना आता वाहनातील बदलासाठी धावाधाव करावी लागत आहे.
कोल्हापूर : जुने वाहन खरेदी करताना केवळ ‘एनओसी’ नको, मूळ नोंदणीतील टॅक्स पावती घ्या, अन्यथा विक्री किंवा नूतनीकरण करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. २०१४ पासून राज्यात ‘वाहन’ ही ऑनलाईन सिस्टीम सुरू झाली. तत्पूर्वी परजिल्ह्यातील वाहन खरेदी केवळ एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) घेऊन वाहन ट्रान्स्फर (हस्तांतर) होत होते; मात्र सध्या त्या वेळची म्हणजेच ज्या ठिकाणी मूळ वाहन खरेदी केले आहे, अशा शहरातील टॅक्स भरलेली पावती आवश्यक आहे. जोपर्यंत ही पावती मिळत नाही, तोपर्यंत तुमचे वाहन विक्री करता येत नाही. तसेच तुमच्या वाहनाचे नूतनीकरण करता येत नाही.
स्क्रॅप पॉलिसी लागू झाल्यामुळे कमर्शिअल वाहन १५, तर खासगी २० वर्षांनंतर कायमचे निकामी करावे लागणार आहे. जुन्या वाहनातील कागदपत्रांत बदल करताना तुमच्याकडे ज्या ठिकाणी वाहन मूळ खरेदी (रजिस्टर) झाले आहे, त्या ठिकाणाची टॅक्स भरलेली पावती लागतेच. कारण सध्या ‘वाहन’ या ऑनलाईन सिस्टीममध्ये नवीन नोंदणी करताना टॅक्स हा कॉलम भरल्याशिवाय त्याची प्रक्रियाच पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्यांनी २०१४ पूर्वी परजिल्ह्यातून केवळ ‘एनओसी’ वरून वाहन खरेदी केले आहे त्यांना आता वाहनातील बदलासाठी धावाधाव करावी लागत आहे.
अनेक वेळा मुंबई, पुण्यासह कोकणातील वाहने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात खरेदी केली जातात. एखाद्या एजंटाकडून असे व्यवहार होतात. येथील मालकाला वाहनाचा मूळ मालक कोण हे प्रत्यक्षात माहितीही नसते. केवळ एनओसीमुळे असे व्यवहार होतात. प्रत्यक्षात असे व्यवहार केलेल्या वाहन मालकांना आता वाहन विक्री करताना मूळ टॅक्स पावती आणणे जिकिरीचे ठरत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकाऱ्यांकडून संबंधित कार्यालयाकडे (मूळ वाहन जेथे नोंद आहे) पत्रव्यवहार (ईमेल) केला जातो. काही वेळा मालकालाच यासाठी धडपड करावी लागते.
वाहन या ऑनलाईन सिस्टीममुळे २०१४ पूर्वीच्या वाहनांची टॅक्स पावती आवश्यक आहे. त्याशिवाय नवीन नोंदी होत नाहीत. अशा वेळी आमच्या कार्यालयातून ईमेलद्वारे माहिती मागविली जाते; मात्र ती केव्हा देणे हे समोरील कार्यालयावर अवलंबून असते. त्यामुळे स्वतः मालकांनीही टॅक्स पावती आणली तरीही आम्ही ग्राह्य मानतो. त्यामुळे २०१४ पूर्वीचे वाहन खरेदी-विक्री करताना मूळ टॅक्स पावती आवश्यक आहे.
- रोहित काटकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.