कोल्हापूर : शहरासह बालिंगा पाडळी खुर्द ते रुकडीपर्यंत नव्याने सुमारे ४० किलोमीटरची निळी आणि लाल पूररेषा (रेड ॲण्ड ब्ल्यू) निश्चित होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदी परिसरालगत असलेल्या करवीर आणि हातकणंगले तालुक्यातही रेषा निश्चित होणार आहे. यात शहरासह प्राधिकरणातील नदीकाठच्या गावांच्या हद्दींचा समावेश असेल. जुलै २०२१ मध्ये झालेल्या महापुरानंतर ही रेषा नव्याने आखली आहे. येत्या १५ दिवसांत मुंबईत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
जिल्ह्याला बसलेला महापुराचा तडाखा पाहता ‘रेड ॲण्ड ब्ल्यू लाईन’ पूररेषा निश्चित करण्याचा राज्य शासनासह प्रशासनाने निर्णय घेतला. भोगावती आणि पंचगंगा नदी परिसरातील गावांजवळही पूररेषा निश्चित करण्याचे काम महापुरानंतर सुरू झाले होते. हे काम शास्त्रोक्त पद्धतीने झाले असून ‘फ्लड फ्रिक्वेन्सी‘ पद्धतीने नोंदी झाल्या आहेत.पंचगंगा नदीची लांबी सुमारे ८१ किलोमीटरची आहे. त्यापैकी ३१ किलोमीटरवर सद्य:स्थितीत ही पूररेषा निश्चित होत आहे. भोगावती नदी ८० किलोमीटर असून, त्यापैकी ९ किलोमीटरवर ही रेषा निश्चित होणार आहे. प्रत्यक्षात शासनाकडून ही पूररेषा जाहीर केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.
शहरात पूररेषेतील बांधकामे हा महत्त्वाचा मुद्दा असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे ही रेषा निश्चित करून तेथे बांधकाम होणार नाही, ज्या ठिकाणी नियमानुसार बांधकाम होणार आहे, त्याठिकाणी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहता राहील, यासाठी उपाययोजना करावी लागते.सध्या उपनगरासह प्राधिकरणांच्या गावात मोठ्या प्रमाणात जागेचे व्यवहार होत आहेत. नव्याने ही पूररेषा निश्चित झाल्यावर तेथे बांधकाम करता येईल, की नाही यावर शिक्कामोर्तब होईल. सध्या विक्री झालेली जागा या रेषाच्या आत आल्यास तेथील बांधकामावर मर्यादा येणार आहेत.
या गावांचा समावेश शक्य
पाडळी खुर्द
बालिंगे
दोनवडे
वरणगे पाडळी
पाडळी बुद्रुक
केर्ली
रजपूतवाडी
आंबेवाडी
प्रयाग चिखली
वडणगे
निगवे दुमाला
भुये
भुयेवाडी
पुलाची शिरोली
हालोंडी
रुकडी (सर्व नदीची डावी बाजू).
उजवी बाजू
बालिंगे
हणमंतवाडी
नागदेववाडी
शिंगणापूर
कोल्हापूर शहर
गांधीनगर उचगाव
वळिवडे
चिंचवाड. (नदीच्या दोन्ही बाजूला ही रेषा निश्चित होण्याची शक्यता.)
अन्य नद्यांवरही पूररेषा होणार
पंचगंगेच्या पुढील ५० किलोमीटरचीही पूररेषा भविष्यात निश्चित होणार आहे. सध्याची पूररेषा जाहीर झाल्यावर त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यतील अन्य नद्यांवर ही पूररेषा निश्चित होणार आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी जाणार आहे. याचे नियोजन शासकीय पातळीवर सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.