कोल्हापूर: पृथ्वीच्या जन्मापासून पाण्याची निर्मिती झाली तो काळ आणि मानवी वास्तव्य असलेल्या काळापासून आजपर्यंत मानवाने पाण्याचा वापर केला. कोल्हापूरला मानवी वास्तव्याचा काळ खूप दीर्घ आहे. त्यापैकी ज्ञात इतिहास आणि त्या काळाच्या आधी काय स्थिती असावी? आणि यापुढे काय बदल झाले? जलसमृद्धी कायम कशी टिकली? त्यात कोणती स्थित्यंतरे झाली आणि ही जलसमृद्धी कायम कशी टिकून राहील? ही चर्चा करणे आवश्यक आहे. धर्मशास्त्र, पुराण, इतिहास, संस्कृती, पर्यावरण, जलाभियांत्रिकी, विज्ञान, वारसा आणि समाजशास्त्रीय आधाराच्या जलसमृद्धीबद्दल वेध घेण्याचा हा प्रयत्न आजपासून....
लाखो वर्षांचा मागोवा घेतला तर पाण्याची उपलब्धता जिथे आहे त्याच भागात नागरी वसाहती झाल्या असे दिसून येते. कोल्हापूरच्या बाबतीत नेमकं काय झालं असेल, याचा धांडोळा घ्यावयाचा झाला तर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या ब्रह्मपुरी टेकडीवर इसवी सन पूर्व दोनशे म्हणजेच आजपासून जवळपास बाविसशे वर्षांपूर्वीची वसाहत होती, एवढाच जुना इतिहास आपल्याला माहीत आहे. नदीच्या काठावर असलेल्या या वसाहतीला पाण्याची उपलब्धता अर्थातच पंचगंगा नदीतून झाली असेल यात शंका नाही. तेव्हापासून जल व्यवस्थापनाची कोणकोणती स्थित्यंतरे झाली याचा अंदाज घेत, पुरावे शोधत अगदी सध्या ज्या योजनेचे काम सुरू असलेल्या काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा करणारी योजनाही पाहावी लागेल.
ब्रह्मपुरी उत्खननाचा कालखंड विचारात घेतला तर त्या आधी या परिसरात ब्रह्मपुरीखेरीज इतर मानवी वस्ती असल्याचे तसे पुरावे दिसत नाहीत; मात्र त्या आधी कोल्हापूर परिसरात मानवी वस्ती होती की नाही, हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. यासाठी नैसर्गिक घटक, म्हणजेच खडक, माती, वाळू, तिथल्या वनस्पती आणि नदीशी असलेली नाती कशी होती, हे खोलवर जाऊन शोधावे लागते.
लिखित असा कोणताही पुरावा नसलेला काळ म्हणजे प्रागैतिहास कालखंड. यामध्ये अश्मयुग, ताम्रपाषणयुग, लोहयुग असे तीन भाग पडतात. अश्मयुगात मानव दगडाची हत्यारे वापरत होता. त्या कालखंडाचे पुन्हा उपभाग आहेत. पुराश्म, मध्याश्म व नवाश्म युग असे ते तीन भाग पडतात. पैकी पहिल्या पुराश्म युगाच्या काळातील काही स्थळे कृष्णा खोऱ्यात आढळली, तर पाच स्थळे घटप्रभा, हिरण्यकेशी, वेदगंगा या नद्यांच्या खोऱ्यादरम्यान आढळली आहेत. शिरगुप्पीजवळ येडूरवाडी येथे त्याही आधीचे म्हणजे पूर्व पुराश्मयुगीन असा साधारण तीन लाख पन्नास हजार वर्षांपूर्वीचा पुरावा आढळला. गारगोटीजवळ पाल येथे मध्यश्मयुगीन पुरावे सापडले.
मध्याश्मयुग हा पुराश्म व नवश्म यामधील म्हणजेच एक लाख वीस हजार वर्षांपूर्वीपासून, चार हजार वर्षांपूर्वीपर्यंतचा काळ आहे. या काळात माणूस फार प्रगत झाला नसला तरी निवास, आहार, शिकार व हत्यार यात तुलनेने प्रगत झाला होता. दगडी हत्यार कुऱ्हाड कंदमुळे काढायला आणि मांस तोडायला वापरत असावे. फरशीसारखे हत्यार झाड तोडायला वापरत असावे. नृसिंहवाडी, अर्जुनवाड, हरिपूर, पन्हाळा पठार , विशाळगड, गगनगड अशा अनेक ठिकाणी म्हणजेच पंचगंगेच्या खोऱ्यात मानवी अस्तित्व असणारे काही पुरावे आढळले.
हे पुरावे फक्त दगडी हत्याराच्या स्वरूपातील असून, अनेकदा नदीपात्रात वाळूच्या खालच्या थरात घट्ट रुतलेली मिळाली. अद्याप याबाबतचा सविस्तर अभ्यास झालेला नाही. तो होणे आवश्यक आहे. त्यानंतर अनेक मुद्दे समोर येतीलच. या सर्व मुद्यांचा विचार केला तर साडेतीन लाख वर्षांपूर्वीपासून चार हजार वर्षांपूर्वीपर्यंत या परिसरात मानवाचे अस्तित्व पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. या आधारेच इथे मानवी जीवन होते, पाणी वापर होत होता आणि त्यांची ठिकाणे, पद्धती ही लोकजीवनाशी पाच लाख वर्षांपासून जोडलेली होती. अर्थातच या दगडी हत्यारांनी खोल विहीर खोदणे त्या काळात शक्य नव्हते. त्यानंतर अनेक तंत्रे विकसित झाली. तत्कालीन काळात मात्र लोकजीवनासाठी भूपृष्ठावरील म्हणजेच फक्त जमिनीवर उपलब्ध होणाऱ्या नदीसारख्याच जलस्रोतांचा पहिला पर्याय वापरला होता.
Edited By- Archana Banage
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.