कोंडीचा विळखा घट्टच!

शहरातील वाहतुकीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज
permanent settlement on urban traffic kolhapur
permanent settlement on urban traffic kolhapursakal
Updated on

पर्यटकांची गर्दी, शहरात येणारी वाहने, एसटी, केएमटी, रिक्षा, अरूंद रस्ते, प्रत्येकालाच घाई यामुळे वाहतूक कोंडीचे चित्र, हीच परिस्थिती शहरातील सर्वच चौकांत पाहावयास-अनुभवण्यास मिळते. ‘गाडीपेक्षा पायीच लवकर पोहोचलो असतो, अशा प्रतिक्रिया गर्दीत अडकलेल्या चालकांच्या तोंडून ऐकावयास मिळतात. अशा गर्दीमधूनच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना दमछाक होते. शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकले आहे आणि नियोजनाअभावी हा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्‍यकता अधोरेखित होत आहे.

कोल्हापूर शहर वाढत आहे. त्याचपटीत वाहनांची संख्याही वाढत आहे; मात्र त्या तुलनेत रस्त्याचे रुंदीकरण नाही. अनेक इमारतींत पार्किंगची व्यवस्थाच नाही. अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागेवर दुकानगाळे काढले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत पार्किंगसाठी स्वतंत्र जागाच उपलब्ध नाही. रस्त्यावरच पार्किंग केल्याचे दिसून येते. बेशिस्त पार्किंगवर कारवाई केली जाते; मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे मर्यादा येतात. वाहतूक नियम पाळण्यापेक्षा ते मोडण्यात धन्यता मानली जाते आहे.

हे व्हायला हवे...

रुग्णवाहिकेसाठी रस्ता ठेवा रिकामा...

सिग्नलसह प्रत्येक चौकात रुग्णवाहिकेसाठी डाव्या बाजूची जागा रिकामी ठेवण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी प्रत्येक चौकात पट्टे मारले जावेत. ही जागा रिकामी ठेवण्याबाबत वाहनचालकांचे प्रबोधन करावे. या सूचनांचा भंग करणाऱ्यांची छायाचित्रे व्हायरल करून त्यांना शिस्त लावावी.

अवजड वाहनांना प्रवेश बंदी

शहरात सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. त्याची अंमलबाजवणी व्हावी. यासाठी शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी परिसरात पेट्रोलिंग वाढवावे. आवश्यक त्या ठिकाणी शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही आधारे कारवाईची मोहीम राबवावी.

पर्यटकांना स्वतंत्र पार्किंग...

वाढणाऱ्या पर्यटकांची संख्या विचारात घेता त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था हवी. दिवाळी व उन्हाळी सुटीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, गांधी मैदान हे पर्याय होऊ शकतात. या ठिकाणीच पर्यटकांची वाहने पार्किंग केली जातील. याचे नियोजन झाल्यास शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल.

पार्किंग व्यवस्था नसणाऱ्यांवर कारवाई व्हावी

ज्या अपार्टमेंट, व्यापारी संकुल, रुग्णालये, हॉटेल, मंगलकार्य आदी ठिकाणी शंभर टक्के पार्किंगची व्यवस्था नसेल तर संबंधितांवर नोटिसा बजावून कारवाई होणे अपेक्षित आहे.

वळणावरील पार्किंग, कोंडाळे काढावेत

वळणावरच वाहनांचे पार्किंग वाढू लागले आहे. अशा अनेक वळणांवर कोंडाळेही आहेत. वळण घेताना चालकाला कसरत तर करावीच लागते आणि अपघाताचे धोके वाढतात. वळणावरच बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांसह संबंधित कोंडाळे दूर करावेत थेट रस्त्यापर्यंत पोहोचलेल्या अतिक्रमणामुळे आधीच रुंद असलेले रस्ते आणखी अरुंद होतात व वाहतुकीच्या कोंडीत भर पडते. महापालिका प्रशासनाच्या मदतीने रस्त्याकडेला असणारी अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविल्यास रस्त्याची रुंदी वाढून कोंडीचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत मिळेल.

कारवाईबरोबर प्रबोधनही करा

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता वाहतूक पोलिसांनी संबंधित चालकाचे प्रबोधन करून त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे.

पार्किंगमधील मक्तेदारी मोडून काढा...

पार्किंगमध्ये तासन्‌तास वाहन लावण्याची आणि आपल्या दारात माझेच वाहन दिवसभर राहणार ही मक्तेदारी मोडून काढली गेली पाहिजे. तरच संबंधित जागा सर्वसामान्यांच्या वाहनांसाठी उपलब्ध होईल.

बेवारस वाहने हटवा

शहराच्या मुख्य भागासह उपनगराच्या गल्ली-बोळात बेवारस वाहनांची संख्या वाढू लागली आहे. अशी बेवारस, नादुरुस्त, आयुर्मान संपलेली वाहने थेट रस्त्यावरच उभी असल्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे, अशी वाहने हटवावीत.

सम, विषम पार्किंगची गरज

शहरात बिंदू चौक ते भाऊसिंगजी रोड या एकाच मार्गावर सम,विषम पार्किंग दिसते. अशी उपाययोजना शहरातील रहदारीसह सर्वच मुख्य चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत मिळू शकेल.

वाहतूक कोंडीची ठिकाणे

  • ताराराणी चौक दाभोळकर चौक

  • असेंब्ली चौक व्हिनस कॉर्नर

  • कोंडा ओळ-फोर्ड कॉर्नर चौक

  • सीपीआर चौक

  • माळकर चौक मटण मार्केट

  • मिलन हॉटेल चौक बिंदू चौक

  • उमा टॉकीज चौक बागल चौक

  • गोखले कॉलेज चौक पार्वती चित्रमंदिर चौक

  • मिरजकर तिकटी पापाची तिकटी

  • गंगावेस, रंकाळा स्टँड रंकाळा टॉवर

  • छत्रपती शिवाजी पूल कसबा बावडा मेन रोड

  • सरस्वती टॉकीज् चौक तटाकडील तालीम चौक

  • बिनखांबी गणेश मंदिर चौक

दृष्‍टिक्षेपात

  • कोल्हापूर मिळकती १,५०,०००

  • शहरातील रस्ते ८९४.९२ कि.मी.

  • सिग्नल ३४

  • एकेरी मार्ग २९

  • वाहतूक पोलिस ११३

  • क्रेन ३

  • स्पीड गन मशिन १

  • जिल्ह्यातील वाहने १५ लाख ४६ हजार

शहरातील एकेरी मार्ग...

  • राजारामपुरी बस रूट ते माऊली पुतळा

  • माऊलीचा पुतळा ते जनता बाजार चौक

  • माळकर चौक ते मिलन हॉटेल चौक

  • महाराणा प्रताप चौक ते महापालिका

  • बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी

  • बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी

  • खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर

  • छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पापाची तिकटी

  • गुजरी ते महाद्वार रोड

  • महाद्वार रोड ते जोतिबा रोड

  • भवानी मंडप ते सबजेल कमान

  • रंकाळा स्टँड ते ताराबाई रोड

  • वटेश्‍वर मंदिर ते ट्रॅफिक चौक

शहरातील रस्ते अरुंद असल्याने अपघात होतात. त्यातही रस्त्यात खड्डे असल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढते. वाहन चालवायचे कसे, असा त्यांना प्रश्‍न पडतो. महापालिका प्रशासनाने रस्त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

- नितीन मर्दाने.

वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न दिवसाच नव्हे तर रात्रीही उद्‌भवतो. गाड्या लावण्यासाठी जागा नसल्याने थेट रस्त्यावरच गाड्यांचे पार्किंग केले जाते. त्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही.

- सारिका चव्हाण

महागाईमुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात रस्ते अरुंद असून, वाहनांचीही संख्या वाढली आहे. वाढत्या रहदारीमुळे नजरचुकीने वाहतुकीचा नियम मोडला जाण्याची शक्यता असते. मात्र, त्यासंबंधीचा होणारा दंड सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. आधी सुविधा द्या, मग दंड आकारा.

- आकांक्षा आरसेकर, विद्यार्थिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()