यादव आघाडीतच रंगणार धुमशान; आघाडीच्या विजयाचे तीन शिलेदार काळाच्या पडद्याआड 

Peth Vadgaon municipal corporation election atmosfear political marathi news
Peth Vadgaon municipal corporation election atmosfear political marathi news
Updated on

पेठवडगाव (कोल्हापूर) : नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. पक्षपातळीवर निवडणूक न होता पारंपरिक पद्धतीने युवक क्रांती महाआघाडी विरोधात यादव आघाडी अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीतील समीकरणे बदलली असून युवक क्रांती आघाडीच्या विजयाचे तीन शिलेदार काळाच्या पडद्याआड गेले. यामुळे मार्गदर्शकांच्या अभावामुळे वाटचाल खडतर बनण्याची चिन्हे आहेत.

फ्लॅशबॅक
जिल्ह्यातील सर्वात जुनी राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेली वडगाव नगरपालिका आहे. या पालिकेत सर्वाधिक सत्ता स्वर्गीय विजयसिंह यादव यांच्या यादव गटाची राहिली. स्वर्गीय शिवाजीराव सालपे यांच्या युवक क्रांती आघाडीने यादव आघाडीला पराभूत करून १९९१ ला सत्तांतर केले. यानंतर दोन्ही गटात अालटून- पालटून सत्ता राहिली. याला अपवाद म्हणून २००६ ते २०१६ अशी दहा वर्षे यादव आघाडीची सत्ता राहिली. यानंतरच्या कालावधीत यादव आघाडीतील कार्यकर्त्यांचा मोठा गट बाजूला गेला. यातील ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील, विश्रांत माने, अजय थोरात व त्यांची टीम बाजूला जाऊन महाआघाडीत सहभागी झाली. या यादव आघाडीच्या पडझडीचा परिणाम त्या निवडणुकीवर होऊन यादव आघाडीला पराभवास सामोरे जावे लागले. गेल्या निवडणुकीतील युवक क्रांतीचे यश मोठे मानले जात होते. परंतु, गेल्या चार वर्षात घडलेल्या अनेक घटनांचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होणार आहे.

सद्यस्थिती
युवक क्रांती महाआघाडीचे प्रमुख नेते दिलीपसिंह यादव, आर. डी. पाटील, विश्रांत माने यांचे निधन झाले. ते युवक क्रांती आघाडीस मार्गदर्शन करून सत्ता स्थिर ठेवण्यात यशस्वी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी गटनेत्या प्रविता सालपे यांच्याकडे आली. याशिवाय नगराध्यक्ष मोहनलाल माळी, अजय थोरात ही कारभारी मंडळी कायम चर्चेत राहिली आहेत. या आघाडीने विकासकामे केली; परंतु त्यांच्या दर्जाबाबत गटातून प्रश्‍न विचारले जात आहेत.

नगरसेवक संदीप पाटील यांनी कामाच्या दर्जावरून सभात्याग केल्याची घटना ताजी आहे. अनेक प्रमुख मार्गदर्शकांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. युवक क्रांती आघाडीचे सत्ताकेंद्र फिरते राहिलेले आहे. ही गोष्ट अनेक कट्टर कार्यकर्त्यांना खटकत असल्याची चर्चा आहे. आघाडीतील रंगराव पाटील-बावडेकर, सुकुमार पाटील राजकीय घडामोडीपासून अलिप्त असल्याचे चित्र आहे. गुरुप्रसाद यादव यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. 

याविरुद्ध यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ यांची व्यूहरचना सुरू आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, रुसवे-फुगवे काढण्याचे काम सुरू केले आहे. कार्यकर्त्यांशी संपर्क सुरु केला आहे. महाआघाडीच्या नाराजीचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारणे व या निवडणुकीत जोमाने टक्कर देण्यासाठीची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे; परंतु त्यांच्यापुढेही आव्हाने आहेत. सत्ता नसतानाही अनेक कामे करुन त्या प्रवाहात राहिल्या आहेत. तिसरा गट असलेल्या डॉ. अशोक चौगुले यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

पुढे काय?
पूर्वीपासून वडगावची निवडणूक पक्षपातळीवर झालेली नाही. यापुढेही ती होण्याची शक्‍यता सध्या तरी दिसत नाही. दोन्ही आघाडीत सर्वच पक्षांतील कार्यकर्ते आहेत. स्थानिक पातळीवर वेगळा विचार व आमदार, खासदार निवडणुकीत वेगळा विचार अशी परंपरा आहे. पक्षातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न काही जणांनी केला; परंतु त्यांना फारसे यश आलेले नाही. यामुळे आगामी निवडणुकीत काय होणार याचीच उत्सुकता आहे.

घडलं-बिघडलं
 रस्ते, गटारी, संभाजी उद्यानाचे काम
 छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा
 विकास करताना सर्व प्रभागांत समतोल नाही
 एकाच प्रभागात काम अधिक झाल्याचा अरोप 
 नगरसेवक संदीप पाटील यांचे भ्रष्टाचाराचे आरोप
 सत्ताधारी नगरसेवकांनी सभात्याग 
   करण्याची दोनवेळा नामुष्की

पक्षीय बलाबल
 एकूण प्रभाग     ८
 युवक कांती 
   महाआघाडी     १३
 यादव आघाडी     ४
 स्वीकृत सदस्य    २
 नगराध्यक्ष : युवक क्रांती          आघाडी

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.