ओ आया नही , लाया गया है .... ! सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल

खा. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर सोशल मिडियातील पोस्टमुळे सर्वसामान्यांत चर्चेला ऊत
Dhananjay Mahadik And Sanjay Mandlik
Dhananjay Mahadik And Sanjay MandlikSakal
Updated on

बिद्री - राज्यसभा निवडणूकीच्या अनपेक्षित निकालामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. यात सोशल मिडियाही मागे नसून, विविध अर्थाने पोस्ट केल्या जाणाऱ्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. खा. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर ' ओ आया नही , लाया गया है .... ! ' या व अशा अनेक कमेंटमुळे सर्वसामान्यांत चर्चेला ऊत आला असून त्यामुळे भविष्यातील जिल्ह्याच्या राजकारणाबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच राज्यात आणि देशात कोल्हापूर जिल्हा सातत्याने चर्चेत राहिला. सुरवातीला संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरुन सुरु असलेला सावळागोंधळ थांबतो न थांबतो तोच शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय पवार यांची अचानक उमेदवारी जाहीर करुन सर्वांनाच अचंबित केले. त्यापाठोपाठ भाजपनेही माजी खा. धनंजय महाडिक यांना मैदानात उतरवुन निवडणूकीत रंगत आणली. यावेळीच कोल्हापुरला तिसरा खासदार मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते.

या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल शनिवारी पहाटे जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार खा. धनंजय महाडिक आणि पराभूत शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. कार्यकर्ते आपआपल्यापरीने या निवडणूक निकालाचा अर्थ लावत असून भविष्यातील राजकारणाबाबत आता पासूनच नानाप्रकारे तर्क आणि अंदाज लावले जात आहेत. यातील काही पोस्ट बोलक्या असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे एकीकडे मनोरंजन होत असले तरी, त्यातील नेमका मतितार्थ शोधण्याचे काम राजकीय जाणकार करत आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी धनंजय महाडिक तयारी करित असताना त्यांच्या अनपेक्षित राज्यसभा सदस्यपदी झालेल्या निवडीमुळे लोकसभेला भाजपचा उमेदवार कोण असेल असा प्रश्न आतापासुनच विचारला जात आहे. त्यांच्याऐवजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आ. अमल महाडिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची नावे आता चर्चेत आली आहेत. या निवडणूकीसाठी अजून दोन वर्षांचा कालावधी असून तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देणार असला तरी आतापासूनच कार्यकर्ते विविध आडाखे बांधण्यात मग्न आहेत.

खा. संजय मंडलिक यांचा प्रतिस्पर्धी कोण ?

राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे लढवतील असे सध्यातरी चित्र आहे. त्यासाठी कोल्हापूर मतदारसंघातून विद्यमान खा. संजय मंडलिक यांची शिवसेनेतून उमेदवारी महाविकास आघाडीच्यावतीने निश्चित मानली जाते. खा. धनंजय महाडिक यांच्या राज्यसभा निवडीमुळे खा. संजय मंडलिक यांचा प्रतिस्पर्धी कोण ? असा प्रश्न आतापासूनच विचारला जात आहे.

कोणी आणले, कोणासाठी ?

खा. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर ' ओ आया नही , लाया गया है .... ! ' ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून, त्यामागे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. खा. महाडिक यांच्या राज्यसभा निवडीमुळे विद्यमान खा. संजय मंडलिक यांना लोकसभेला भाजप ' बाय ' देणार, खा. मंडलिक यांची बिनविरोध निवड होणार अशीही खुमासदार चर्चा सोशल मिडियात सुरु आहे. त्यानुसार जर खरेच घडले असेल तर खा. धनंजय महाडिक यांना कोणी मदत केली व त्याचा पुढील निवडणूकीवर काय परिणाम होणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.