Video - खोबरेल तेलाच्या धारेएवढं पाणी येतं, पाण्यापाई घरच विकायचं का?

शिंगणापूर परिसरातील महिलांचा सवाल; नदी जवळ असूनही पाण्यासाठी वणवण
Video - खोबरेल तेलाच्या धारेएवढं पाणी येतं, पाण्यापाई घरच विकायचं का?
Updated on

कोल्हापूर : पैसे साठवून, कर्ज काढून घर घेतलं. अगदी नदीजवळ घेतलं. शहर जवळच आहे; पण रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण मात्र वर्षानुवर्षे सुरू आहे. प्राधिकरणवाले पाणी वेळेत देत नाही आणि महापालिकावाले शहराची गरज भागल्याशिवाय पाणी नाही म्हणतात. दोघेही आमच्या गरजेवेळी पाणी वेळेत देत नाहीत. घराजवळ नदी असून उपयोग नाही, पाणी योजना असून उपयोग नाही. आमच्या टाक्‍या कोरड्या त्या कोरड्याच. गळकं पाणी कधीतरी येते. म्हणून या पाण्यापाई घरच विकायचं आणि दुसरीकडे भाडेकरू म्हणून राहायला जायच, असा उदिग्न भाव शिंगणापुरातील इंदूबाई काशीद यांनी व्यक्त केला.

असे बोल, फक्त काशीद ताईंनीच बोलून दाखवले नाही तर या परिसरातील शंभर दीडशे कुटुंबे तहानलेलीच आहेत. शिंगणापूर परिसरातील काही कॉलन्यांत महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो. सकाळी साडेपाच ते सहा ही पाणी येण्याची वेळ. तीही एक दिवस आड. जे पाणी येत ते खोबरेल तेलाच्या धारेएवढं. अवघ्या अर्ध्या तासात नेमकं किती पाणी भरायच? असा प्रश्‍न या महिलांसमोर असतो. सकाळची वेळ घाईगडबडीची.

मुलांचे शाळेच डबे, नोकरीला जाण्यासाठीची गडबड. अशाच वेळी येणारे पाणी महिलांच्या मनस्तापाचे एक मुख्य कारण बनलं आहे. केसाएवढ्या पडणाऱ्या पाण्याने एक घागर भरायला दहा मिनिटे लागतात. शिवाय हे पाणी फक्त पिण्यापुरतेच मिळाले तर खर्चाच्या पाण्यासाठी पुन्हा वणवण करायची. पाणी भरायचं म्हंटल की दोन अडीच तास आधीच त्याची तयारी करायची. घरात कोणी पाहुणे राहायला यायचे म्हटले तरी अंगावर काटा येतो. आलेल्या पाहुण्याला पिण्यासाठी तांब्याभर पाणी देता येईल; पण त्याला अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी नदीवर जावा, असं म्हणायचं का?, असा प्रश्‍न येथील महिला संतप्त होऊन विचारतात.

जिने चढून कंबरदुखी, गुढघेदुखी

शहरापासून जवळ आणि ग्रामीण वातावरणात म्हणून शिंगणापुरात घरे घेतली. प्रत्येकाच्या टेरेसवर पाचशे, हजार लिटरची पाण्याची टाकी आहे; मात्र केसाएवढे पाणी नळालाच येत नाही तर टेरेसवरच्या टाकीत कसे पडणार. किचनमधील सिंक आणि बाथरूममध्ये वापरासाठी पाणी हवे, म्हणून ही टाकी तेथील नळाला जोडली आहे; परंतु या टाकीत पाणी पडत नाही. म्हणून या महिला पट्टी व्हॉल्व्हमधून पडणारे पाणी टपात साठवतात. ते घागरीत भरतात आणि या घागरी टाकीत नेऊन ओततात. जिने चढउतारामुळे काही ज्येष्ठ महिलांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झालाय. काहींना कंबरदुखीने ग्रासलंय.

नदी उशाला तरीही...

शहरातील ई वॉर्डसाठी शिंगणापूर पाणी योजनेतून पुरवठा केला जातो. शिंगणापूरपासून नदीही जवळच आहे. हे वास्तव असताना या परिसरातील कुटुंबाना मात्र पाण्याची टंचाई सहन करावी लागते. एकतर नदी हाकेच्या अंतरावर. येथूनच शहराला पाणीपुरवठा होतो. शहराला पाणीपुरवठा आणि घशाला मात्र कोरड अशी खंत या महिलांनी व्यक्त केली.

"महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो. शिंगणापूर गावात पेयजल योजना आहे. तेथे गावासाठीच पाणी पुरत नाही तर तुम्हाला कोठे देऊ, असे उत्तर ग्रामपंचायतीकडून दिले जाते. तर महापालिकेकडे विचारणा केल्यास आधी शहराचा विचार करतो मग ग्रामीण भागाचा, असे उत्तर दिले जाते. दोन्हींकडूनही प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही दाद मागायची कोठे?"

- नाझिया जमादार

"आम्ही बटुकेश्‍वर कॉलनीत राहतो. कमी दाबाने पाणी तेही काही मिनिटेच. पाणी भरण्यासाठी जागरण तर होतेच. शिवाय मनस्तापही सहन करावा लागतो. ग्रामपंचायतीकडे विचारणा केल्यास पाण्याची लेवल नाही, असे उत्तर दिले जाते."

- तृप्ती मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()