इस्लामपूर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात निघालेले अटक वॉरंट त्यांच्या गैरहजेरीत रद्द करून त्यांना जामीन मंजूर करावा, असा अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी पूर्ण झाली. आता शुक्रवारी (ता. १७) सुनावणी होणार आहे. १४ वर्षांपूर्वी मराठी तरुणांना रेल्वेत नोकरी मिळावी म्हणून मनसेने आंदोलन केले होते. कोकरूड पोलिस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
सुनावणी येथील न्यायालयात सुरू होती. सुनावणीस गैरहजर राहिल्याने न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने गैरहजेरीतही अटक वॉरंट रद्द करावे. त्यांना जामीन मंजूर करावा, असा अर्ज वकिलांनी दिला होता. अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात राज ठाकरे यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करून त्यांना जामीन मंजूर करावा, असा अर्ज दाखल केला होता.
या याचिकेवर सोमवारी न्यायाधीश जयश्री परदेशी यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲड. रणजित पाटील यांनी हा खटला खूप जुना आहे. तो निकाली निघणे गरजेचे आहे. मात्र ठाकरे सुनावणीस हजर राहत नसल्याने तो लांबत चालला आहे. ते हजर राहिल्याशिवाय हे कामकाज पुढे सरकणार नाही. जारी केलेले वॉरंट योग्यच आहे, असा युक्तिवाद केला. ठाकरे यांच्या बाजूने ॲड. विजय खरात, सतीश कदम, ॲड. आनंद चव्हाण यांनी युक्तिवाद केला.
ते म्हणाले,‘‘आंदोलनात ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तेव्हा या खटल्यातून त्यांचे नाव वगळावे. सध्या त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ते सुनावणीस हजर राहू शकत नाहीत. राज्य शासनाने जनहितासाठी झालेल्या आंदोलनांसंदर्भातील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अटक वॉरंट रद्द करून ठाकरे यांना जामीन मंजूर करावा.’’ दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारपर्यंत निर्णय राखून ठेवला. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.