Rajarshi Shahu Jayanti : देशभरात जातीय दंगली पेटल्या तरी कोल्हापुरात मात्र शांतता नांदायची, याचे कारण होते शाहू महाराज

राजसत्ता ही धर्म, जात, वंश, सीमा, भाषेच्या राजकारणावर आधारलेली असते. हे वेळोवेळी दिसून येतं.
Chhatrapati Shahu Maharaj
Chhatrapati Shahu MaharajSakal
Updated on

मतीन शेख

राजसत्ता ही धर्म, जात, वंश, सीमा, भाषेच्या राजकारणावर आधारलेली असते. हे वेळोवेळी दिसून येतं. परंतु या उदाहरणाच्या पलीकडे एका राजाची 'राजसत्ता' नव्हे तर 'लोकसत्ता' अस्तित्वात होती. ही लोकसत्ता म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाची आदर्श लोकसत्ता. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती जमातींना एकत्र घेत रयतेचे स्वराज्य निर्माण केले; त्याच पावलावर पाऊल टाकत शाहू महाराजांनी राजेशाहीत लोकशाही रुजवून कल्याणकारी राज्य निर्माण केले.

जसे छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे राजे नव्हते तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे ते राजे होते. सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या भल्याचे स्वराज्य त्यांनी उभारले. त्याच स्वराज्याची रेषा छत्रपती शाहू मी पुढे लांबवली. दीन दलितांना, अल्पसंख्यांकांना, सर्व जाती धर्मीयांना शाहू महाराजांनी आपलं मानलं. मुस्लिम समाजाविषयी त्यांनी विशेष आस्था दाखवल्याचे दिसून येते. हिंदू आणि मुस्लिम हे एकाच राष्ट्राचे भिन्नभिन्न अवयव आहेत. असे शाहू महाराज व्यक्त होत. हिंदू व मुस्लिम समाजात परस्परांविषयी विश्वासाची व समंजस्याची भावना रहावी. अशी शाहू महाराजांची इच्छा कायम होती. जाहीर भाषणात देखील त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यावर भाष्य केलेली आहेत.

बहुजनांच्या मुलांनी शिक्षण घेतले तरच ते मूळ प्रवाहात येतील व स्वतः समाजातील दारिद्र्य दूर करतील. असा विचार शाहू महाराजांनी वेळोवेळी मांडला. संस्थानातील विविध जाती समूहामध्ये शिक्षणासंबंधी गोडी निर्माण व्हावी असा त्यांचा प्रयत्न असायचा. 1902 साली महाराज इंग्लंडच्या दौऱ्यावरून सुखरूप परतल्याच्या आनंद प्रीत्यर्थ कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी एक समारंभ आयोजित केला होता. या समारंभाच्या निमित्ताने मुस्लिम पुढार्‍यांनी आपल्या समाजाच्या शिक्षणासाठी जनजागृती चळवळ उभारावी शैक्षणिक संस्था स्थापन कराव्यात या कामासाठी दरबाराकडून त्यांना पूर्ण सहाय्यता मिळेल असे आश्वासन शाहू महाराजांनी दिले होते. पण या काळात मुस्लिम समाजात शिक्षणा विषयी कमालीची अनास्था होती. त्यामुळे महाराजांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. परंतू महाराज शांत बसले नाहीत.

मुस्लिम समाजातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये प्रवेश देऊन संस्थानातील मुस्लिमांच्या शिक्षणाची सुरुवात केली. या विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटकातील अथणी गावच्या शेख महंमद युनुस अब्दुल्ला हा एक विद्यार्थी होता. हा पुढे राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाल्यावर त्यास महाराजांनी आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले. मुस्लिम समाजात शिक्षणाची गोडी लावण्याचे काम हे त्याच्यांवर सोपवण्यात आले.

1906 साली शाहूमहाराजांनी पुढाकार घेत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मंडळींची सभा बोलावली व मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. स्वतः महाराज या संस्थेचे अध्यक्ष बनले आणि आणि युसूफ अब्दुल्लांना कार्यवाह बनवले.

शाहू महाराजांनी विविध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह स्थापन केली. पण कोणत्याही वस्तीगृह संस्थेचे ते पदाधिकारी बनले नव्हते. मुस्लिम समाजाबद्दल मात्र त्यांनी अपवाद केला. त्यांच्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष पद त्यांनी स्वीकारले. मुस्लिम समाजात शिक्षणाची जनजागृती व्हावी आणि त्यांच्यातील मागासलेपण दूर व्हावे.

ही खरी तळमळ महाराजांच्या कृतीत होती. या तळमळीतून मुस्लिम बोर्डिंग सुरू करण्यात आले. संस्थानातील मुस्लिम देवस्थानाचे उत्पन्न या बोर्डिंगच्या संस्थेला जोडण्यात आले. बोर्डिंग ची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून महाराजांनी हुकूम काढला की हातकणंगले, कसबा, रूकडी येथील दर्ग्यांचे उत्पन्न एज्युकेश सोसायटीकडे जमा करावे. अशाच प्रकारे कोल्हापूर शहरातील बाराईमाम, निहाल मशीद, बाबुजमाल देवस्थानाचे उत्पन्नही मुस्लिम बोर्डिंगकडे वळवण्यात आले.

Chhatrapati Shahu Maharaj
Pune Crime : कामावरून मध्यरात्री घरी निघालेल्या कर्मचाऱ्यांना लुबाडले

चौफाळ्याच्या माळावर मराठा बोर्डिंग जवळ मुस्लिम बोर्डिंग साठी जागा देण्यात आली. तसेच इमारतीसाठी साडेपाच हजार रुपयांची देणगी महाराजांनी दिली. मराठा बोर्डिंग पेक्षा अधिक दान मुस्लिम बोर्डिंग साठी महाराजांनी दिले. मुस्लिम हा मागास समाज सुधारणाक्षम व्हावा हाच उद्देश या मागे होता.

धर्म बाजूला ठेवला तर मुसलमान हे बहुजनांना पेक्षा विशेषता मराठ्यांना पेक्षा वेगळे नाहीत असे महाराजांचे मत होते. मुस्लिम समाज कोणी परका नसून तो आपल्याच समाजाचा एक भाग आहे. हे रुजवण्याचा प्रयत्न शाहू महाराज करताना दिसून येतात. 'कुराण' या मुस्लिमांच्या पवित्र धर्मग्रंथाचे मराठी भाषांतर करून घेण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केला. यासाठी कोल्हापूर दरबाराकडून पंचवीस हजार रुपये खर्ची घालण्यात आले. धर्मग्रंथातील उपदेशाचे आकलन सामान्य मराठी मुस्लिमांना व्हावे व धर्मसुधारणा व्हावी. हा दृष्टिकोन महाराजांच्या या कृतीतून दिसुन येतो. महाराजांनी वसवलेल्या शाहूपुरी या पेठेत मुस्लिम बांधवांना प्रार्थना करण्यासाठी त्यांनी मशिद बांधून दिली.

Chhatrapati Shahu Maharaj
Pune School News : विद्यार्थ्यांचा प्रश्न; सांगा आम्ही कसे शिकायचे?

शाहू महाराजांनी संस्थानातील मुस्लिम जनतेवर प्रेम तर केलेच परंतु देशभरातील मुस्लिम प्रतिभावंतांना राजाश्रय देखील दिला. यामध्ये शाहीर हैदर, चित्रकार आबालाल रहिमान, ख्यातनाम गायक अल्लादिया खाँसाहेब तसेच महाराजांना मल्लविद्येचे धडे देणारे बालेखान वस्ताद हे प्रमुख होते. महाराजांनी अल्लादिया खाँसाहेब यांचे पुत्र भूजींखाँ यांची अंबाबाई मंदिरात गायनासाठी नेमणूक केली होती. भूजींखाँ सारख्या गायकाची अंबाबाई मंदिरात केलेली नेमणूक हा केवळ कलेच्या क्षेत्रातील प्रयोग नव्हता तर सामाजिक क्षेत्रातील हिंदु - मुस्लीम सद्भावना वाढविण्याच्या दिशेने महाराजांनी जाणिवपुर्वक टाकलेले एक पाऊल होते.

शाहू महाराज मल्लविद्येचे टोकाचे चाहते होते. ते स्वतः एक कसलेले मल्ल होते. कुस्तीवर त्यांनी अफाट प्रेम केले. आखाडे, तालमी त्यांनी उभारल्या. देशभरातील हिंदु मल्लांसह अनेक मुस्लिम मल्लांना त्यांनी आपल्या संस्थानात राजाश्रय दिला होता. या मल्लांच्या खुराकाची व्यवस्था ते स्वत: पाहायचे. मल्लांची जात धर्म लक्षात येऊ नये म्हणुन अनेक मल्लांचे महाराजांनी नामांतर केले होते.

देशभरात कुठेही जातीय दंगली पेटल्या तरी करवीर संस्थान मात्र शांततेत नांदायचे. गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण एकाच वेळी येत, तेव्हा कोल्हापुरात तालीम यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्ती व मोहरमचे पंजे एकत्र बसवले जात असत. हीच परंपरा आजही कायम आहे. कोल्हापुरने हिंदू-मुस्लिम सद्भावनेचा आदर्श टिकवून धरला याचे श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जाते.

अलीकडे हिंदू – मुस्लिम सलोखा बिघडवण्याची सध्या होत असलेली कृती शाहू विचारांना छेद देणारी आहे. धर्म, जातीवरून पसरवल्या जाणाऱ्या द्वेषाला रोखण्याचे काम शाहू महाराजांचा विचारच करू शकतो. धर्म व जाती भेदाच्या कलुषित राजकारणावर शाहू महाराजांचे कार्य, भूमिकाच रामबाण औषध ठरू शकते याची जाणीव आज पावलोपावली होत आहे.

 ( लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे संशोधक आहेत )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.