कोल्हापूर : कोरोना महामारीत अनेक उद्योग, व्यवसायांना खीळ बसली. शहरातील औद्योगिक वसाहती, मुंबई - पुण्यातील कंपन्या बंद झाल्याने अनेकांवर बेरोजगाराची वेळ आली. या काळात शहरात नोकरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांना गावाकडे परतावे लागले. लॉकडाउनमध्ये आर्थिक गणित कोलमडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली.
मात्र, या बेरोजगार तरुणांनी गावाकडेच नवीन उद्योग- व्यवसायाच्या संधी शोधत प्रतिकूलतेवर जिद्दीने मात केली आहे.
दोन महिन्यांत अनलॉकनंतर काय करायचं, असा प्रश्न होता. शहरात परतावे, तर कोरोना संपला नसल्याने भीती होतीच. मग गावाकडेच राहून एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे विविध प्रयोग करत आहेत. किराणा मालाचे, कपड्याचे दुकान, चहा स्टॉल, गॅरेज, नाष्टा सेंटर, फर्निचर सेंट्रिंग, वेल्डिंग वर्क, चिकन-मटण दुकाने, मोबाईल दुरुस्ती, तसेच छोटी हॉटेल्स असे विविध उद्योग तरुण उभारत आहेत.
राधानगरी तालुक्यातील गावठाण गावचा रवी ढोकरे. रोजगारासाठी गेल्या वर्षी पुण्याला गेला. खासगी कंपनीत दिवसभर नोकरी करायची आणि रात्रीच्या वेळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम करायचे, असा उद्योग सुरू होता. लॉकडाउनमध्ये त्याला गावाकडे परतावे लागले. शहराकडची वाट धुसर झाल्याने गावाकडेच भाजी पाला डिलिव्हरीचे काम सुरू केले. जळकेवाडीचा बबन केसरकर तरुण कोल्हापुरात वेटर म्हणून राबत होता. कोरोनाने काम बंद झाले. गावी परतल्यावर छोटा धाबा उभारूया, अशी कल्पना डोक्यात आली. काही रकमेची जळवाजुळव करून अलीकडे त्याने ढाबा सुरू केला आहे. प्रतिसाद मिळत असल्याने तो यशस्वी हॉटेल व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पाहत आहे.
पुण्यात दुचाकींचा मेकॅनिक म्हणून काम करत होतो. कोरोनामुळे गावी परतलो. परत पुण्याला जायची भीती होती. काही कर्ज घेऊन गावाकडेच गॅरेज सुरू केले आहे. उदरनिर्वाहाइतके पैसे मिळतात.
- आकाश केसरकर
शहरात हॉटेलमध्ये वेटरचे काम अनेक दिवस केले. लॉकडाउनमध्ये हे काम थांबले आणि पोटाचा प्रश्न निर्माण झाला. शहरात न जाता आता मी स्वतःचेच चहा-नाष्टा सेंटर गावाकडे सुरू केले आहे.
- कुंडलिक तोरस्कर
ग्रामीण अर्थचक्राला वेग...
कपडे, होलसेल किराणा मालाची खरेदी, तसेच वाहनांच्या किरकोळ दुरुस्त्यांसाठी ग्रामीण भागातून शहराकडे लोकांना यावे लागत होते; परंतु या सुविधा गावातच झाल्याने हा ग्राहक वर्ग ग्रामीण भागातच रोखला. त्यास पसंती मिळत असल्याने अनेकांना रोजगार व व्यवसायाची संधी मिळाली. दसरा, दिवाळीत चांगली खरेदी-विक्री झाल्याने नवव्यावसायिकांना आत्मविश्वास आला आहे. गावातील पैसा गावातच राहत असल्याने ग्रामीण अर्थकारण बदलले आहे. हा उद्योग करत शेती व पशुपालनाकडे अनेकांनी लक्ष घातले आहे. यामुळे कोरोनोत्तर ग्रामीण अर्थचक्राला वेग आला आहे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.