Rahul Gandhi : आरक्षण मर्यादा वाढवणारच! कोल्हापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

‘रा.स्व.संघ आणि भारतीय जनता पक्ष यांना राज्यघटना बदलायची आहे कारण त्यांना देशातील ९० टक्के लोकांना मागे ठेवायचे आहे.
Rahul gandhi
Rahul gandhisakal
Updated on

कोल्हापूर - ‘रा.स्व.संघ आणि भारतीय जनता पक्ष यांना राज्यघटना बदलायची आहे कारण त्यांना देशातील ९० टक्के लोकांना मागे ठेवायचे आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरला असून आम्ही हा कायदा करून घेणारच आहोत. काँग्रेस सत्तेत आल्यावर पहिल्यांदा आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेईल,’ असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज केले. सयाजी हॉटेलमध्ये आज झालेल्या ‘संविधान सन्मान’ संमेलनात ते बोलत होते.

यावेळी राहुल गांधी यांचा विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा उपदेश केला. यातील शिक्षणाला फार महत्त्व आहे. यातील शिक्षणाचा अर्थ केवळ शालेय शिक्षण नाही.

तर आपल्या अवती भवती जे चालू आहे त्याचे निरीक्षण केले पाहिजे. त्यानंतर आपल्याला संघटित होण्याची आणि संघर्ष करण्याची आवश्यकता वाटेल. शिक्षण व्यवस्था विशिष्ट शक्तींच्या हातात आहे. त्यामुळे आपल्या इतिहासाच्या पुस्तकात दलित, आदिवासी यांचा उल्लेख नाही. संघ आणि भाजपला हेच करायचे आहे. राज्यघटनेचे रक्षण करायचे असल्यास आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या पुढे नेले पाहिजे.

प्रत्येकाला प्रगतीची समान संधी दिली पाहिजे. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे? हे समोर येईल. तसेच देशातील एकूण संपत्तीपैकी त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याचीही माहिती कळेल.

हे सत्य समोर येऊ नये म्हणून भाजप आणि संघाला जातीनिहाय जनगणना करायची नाही. कारण ते सत्याला घाबरतात. सध्या केवळ ५ टक्के लोक देश चालवितात. न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे यामध्ये दलित, आदिवासी यांचा टक्का सर्वांत कमी आहे. राज्यघटनेच्या रक्षणासाठी संघर्ष करावा लागेल.’’

म्हणून ते राज्यघटनेला हात लावू शकत नाहीत

या संमेलनाचे प्रास्ताविक खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. ते म्हणाले, ‘देशाला गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. मात्र नंतरच्या काळात समाज वेगळ्या दिशेला गेला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. शाहू महाराजांनी १९०२ साली आरक्षण दिले. त्यापूर्वी संस्थानामध्ये ९० टक्के लोक विशिष्ट समाजाचे होते.

आता राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने आता ते राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाला हात लावू शकत नाहीत. आपण राज्यघटनेच्या रक्षणासाठी सिद्ध असले पाहिजे.’ यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सतेज पाटील, भाई जगताप, उल्हास पवार, खासदार प्रणिती शिंदे, आमदार जयश्री जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

स्वप्नील कुंभार यांचे अभिनंदन

राहुल गांधी यांना देण्यात आलेली विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती कदमवाडी येथील मूर्तिकार स्वप्नील कुंभार यांनी बनविली आहे. राहुल गांधी यांनी त्यांना भाषणा दरम्यान बोलावून घेतले आणि त्यांचे अभिनंदन केले. काळजी घ्या असा सल्लाही दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.