विद्यापीठातील एम. ए. मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी साईसिमरन आणि जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी बिल्कीस यांना दीक्षान्त समारंभात सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षान्त सोहळा (Shivaji University Convocation Ceremony) केंद्रीय पद्धतीने सोमवारी (ता. १८) सकाळी साडेअकरा वाजता राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.
त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा प्रमुख पाहुणे आहेत. यावर्षी सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या राष्ट्रपती सुवर्णपदकाची (President's Gold Medal) मानकरी बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील साईसिमरन हिदायत घाशी (Saisimran Hidayat Ghashi), तर हिंदी विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दलचे कुलपती सुवर्णपदक मौजे आगर (जि. कोल्हापूर) मधील बिल्कीस हिदायत गवंडी हिने पटकविले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठातील एम. ए. मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी साईसिमरन आणि जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी बिल्कीस यांना दीक्षान्त समारंभात सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे. यावर्षी पदवी प्राप्त स्नातकांमध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. त्यांची टक्केवारी ५५.७८ इतकी, तर विद्यार्थ्यांची टक्केवारी ४४.२३ इतकी आहे. दीक्षान्त समारंभ आणि ग्रंथमहोत्सवाला विद्यार्थी, नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन डॉ. शिर्के यांनी केले.
दीक्षान्त समारंभ ९० मिनिटांचा असून त्यात दोन सुवर्णपदक, १६ स्नातकांना पारितोषिके प्रदान केली जातील. विद्यापीठ प्रांगणात ९६०५, पोस्टाद्वारे ३९८३३ पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ग्रंथमहोत्सवाचे समन्वयक डॉ. डी. बी. सुतार, मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव उपस्थित होते.
मूल्यमापन वेळापत्रकाचे परीक्षा मंडळाने काटेकोरपणे पालन केल्याने यंदा ६८० परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले. त्यात निकाल जाहीर करण्याचे सरासरी दिवस १४ आहेत. मागील दोन वर्ष दीक्षान्त समारंभ जानेवारी, मार्चमध्ये घ्यावा लागला होता; पण, यावर्षी कमी दिवसांत आणि वेळेत निकाल लागल्याने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात हीरक महोत्सवी दीक्षान्त समारंभ होत असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. या समारंभासाठी यंदा नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले आहेत. त्यासाठीची प्रणाली विद्यापीठाच्या संगणक केंद्र, परीक्षा मंडळाने विकसित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी व पालखी मिरवणूक उद्या (ता. १६) सकाळी साडेसात वाजता कमला कॉलेजपासून सुरू होईल. जनता बझार, राजारामपुरी मेनरोड, माऊली चौक मार्गे ती विद्यापीठात येईल. त्यानंतर तीनदिवसीय ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन होईल. महोत्सवात पुस्तके, डेटाबेस पॅकेज आदींचे ५० स्टॉल आहेत. सकाळी ९ ते रात्री ९ अशी महोत्सवाची वेळ असल्याचे डॉ. सुतार यांनी सांगितले.
विद्याशाखा मुले मुली
विज्ञान व तंत्रज्ञान १०९११ १०४९५
वाणिज्य व व्यवस्थापन ५०७१ ८७८९
मानव्यशास्त्र ४९९६ ६३०५
आंतरविद्याशाखीय ९८५ १८८६
एकूण २१९६३ २७४७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.