सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. हे सरकार पडेल, कोसळेल, नवे सरकार येईल, मध्यावती निवडणुका लागतील, अशी अनेक भाकिते होत गेली. पण, सरकार टिकून आहे. या सरकारबद्दल लोकांना काय वाटते, याचा ‘सकाळ’ने अंदाज घेतला. एका सर्वेक्षणाव्दारे जनमत आजमावले. पुढील विधानसभा निवडणुकीत लोकांचा कल काय असेल, हेही आजमावले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) किंवा राष्ट्रवादी-शिवसेना (NCP-Shiv Sena)आघाडी विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली तर काय, याचीही चाचपणी केली. याघडीला जिल्ह्यातील आठपैकी सहा जागा महाविकास आघाडीकडे असून दोन जागांवर भाजप आहे. जनमताचा कौल ही स्थिती अशीच राहू शकते, असा सांगणारा आहे. काही ठिकाणी भाजपची तर काही ठिकाणी काँग्रेसची चिंता वाढवणारा आहे.
जिल्ह्यातील आठपैकी सहा जागा महाविकास आघाडीकडे असून दोन जागांवर भाजप आहे. जनमताचा कौल ही स्थिती अशीच राहू शकते, असा सांगणारा आहे. काही ठिकाणी भाजपची तर काही ठिकाणी काँग्रेसची चिंता वाढवणारा आहे.
सांगली (Sangli) :
सांगली विधानसभा मतदार संघात २००९, २०१४ आणि २०१९ ला भाजपने हॅटट्रीक केली. मुख्य विरोधक काँग्रेसला १९९९ नंतर येथे संधी मिळाली नाही. २००४ ला अपक्ष मदन पाटील यांनी बाजी मारली होती. येथे राष्ट्रवादीने भाजपला छुपी रसद पुरवल्याने कमळ फुलत गेले. २०१९ ला काँग्रेसने वसंतदादा घराण्याच्या बाहेरचा नवा चेहरा दिला, त्यामुळे मतबेरीज सुधारली, मात्र विजय मिळाला नाही. भाजप जिंकले, मात्र काठावर, त्यामुळे त्यांना सावधगिरीचा इशारा मिळाला. पुढील निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होईल, त्यात महाविकास आघाडी बिघडली तर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा उमेदवार असेल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल. तिरंगी लढत झाली तरी काँग्रेस विरुद्ध भाजप असाच मुख्य संघर्ष दिसेल. भाजपची सरशी होऊ शकते, असा जनमताचा कौल दिसतोय. व्यापारी, उद्योजक, शिक्षित वर्गाचा कल भाजपकडे कायम आहे. गेल्या निवडणुकीत चाललेला जातीय समीकरणांचा अंडर करंट टाळण्यासाठी भाजप नवा चेहरा पुढे आणणार का, हाही कळीचा मुद्दा असेल. काँग्रेसकडे विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील (Vishal Patil, Prithviraj Patil, Jayshree Patil)असे तीन प्रबळ दावेदार असून अंतर्गत संघर्षाचा शाप कायम आहे.
मिरज (Miraj) :
सन २००९ पासून भाजपने सलग तीन दणदणीत विजय मिळवत मिरज (Miraj)काबीज केले. २००९ ला मिरज दंगल, २०१४ ला मोदी लाट आणि २०१९ ला अवसान गळालेले विरोधक भाजपच्या पथ्यावर पडले. या तीनही विजयात मताधिक्याची कमान मात्र खाली खाली येत गेली आणि यावेळी ती भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारी होती. पुढील निवडणूक आमदार सुरेश खाडे यांच्यासाठी सोपी नसेल, असा जनमताचा कौल आहे. तो भाजपला सावधगिरीचा इशारा देणारा आहे. येथे राष्ट्रवादीने काँग्रेसला ओव्हरटेक करण्यास सुरवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक विधानसभेची लिटमस टेस्ट असेल. तीनवेळा पराभवानंतर बाळासाहेब होनमोरे हे चौथ्यांदा मैदानात उतरतील, यावेळी जयंतनिती त्यांच्यासोबत असेल आणि ती निर्णायक ठरू शकते. शिवसेनेचा हा जुना गड राहिला आहे, त्यामुळे नव्या समीकरणांत शिवसेना पुन्हा मिरजेसाठी आग्रही राहू शकते. याघडीला भाजप थोडा वरचढ दिसत आहे, मात्र यावेळी आव्हान खडतर असणार आहे.
इस्लामपूर (Islampur) :
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या गडात त्यांच्याविरोधात लढणार कोण, हे ठरवतानाच विरोधकांची पुरेवाट होत आली आहे. एकास एकचा प्रयोग करावा, असे ठरत येते तोवर कुणीतरी बंड करतो आणि जयंतरावांची वाट सुकर होत जाते. गेल्या निवडणुकीत जयंतरावांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातून बंड करून भाजपमध्ये गेलेल्या निशिकांत पाटील यांनी कडवी लढत उभी केली होती. भाजपने निशिकांत यांना ताकद दिलीय खरी, मात्र आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांचे सख्य राहिलेले नाही. त्यामुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. जयंतरावांचे पारंपारिक विरोधक महाडिक आहेत, त्यांनी शिराळ्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे जयंतरावांचा विरोधक कोण, हाच इथे कळीचा मुद्दा आहे. सध्या तरी जयंतरावांचा पासंग बराच वरचढ दिसतोय, असे जनमताला कौल सांगतो.
शिराळा (Shirala) :
नागभूमी शिराळ्याचा विधानसभेचा आखाडा नेहमीच रंजक राहिला आहे. पारंपारिक विरोधक आमदार मानसिंगराव नाईक विरुद्ध माजी आमदार शिवाजीराव नाईक हा संघर्ष होत आला आहे. आधी काँग्रेसच्या सत्यजीत देशमुख यांची मदत मानसिंगरावांबरोबर राहिली होती. आता ती शिवाजीरावांसोबत आहे. यावेळी स्वतः सत्यजीत देशमुख इच्छुक असणार आहेत. शिवाय, भाजपकडूनच सम्राट महाडिक हे उमेदवारीच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असतील. मानसिंगराव विरुद्ध कोण? हे ठरल्यानंतर आखाडा रंजक होईल. मानसिंगरावांकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आले तर ते जनसंपर्कात आघाडी घेतील. डोंगरी भागाचा विकास, चाकरमाण्यांचे प्रश्न, शिराळ्याची नागपंचमी असे महत्वाचे विषय येथे निकाल ठरवत असतात. रणधीर नाईक, विराज नाईक, सम्राट महाडिक या पुढच्या पिढीने जनसंपर्काची कमान हाती घेतल्याने समीकरणेही नव्याने आखली जातील. जनमताचा कौल यावेळी काठावरची कसरत सांगणाराच आहे. मतदारांना गृहीत धरू नका, असाच संदेश शिराळा देत आला आहे.
तासगाव (Tasgaon) :
दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यामुळे राज्यात लक्षवेधी असलेला हा मतदार संघ. पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांची आधीच घोषणा झाली आहे. आबांची पत्नी श्रीमती सुमन पाटील सध्या आमदार आहेत. येथे भाजप खासदार संजय पाटील मुख्य विरोधक आहेत. त्यांनी सध्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतलेले आहे. भाजपमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे. शिवसेनेचे अजितराव घोरपडे दोनवेळा पराभूत झाल्याने ते तिसऱ्यांदा मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असतील का? असले तरी शिवसेनेला जागा मिळणार का? ऐनवेळी ते भाजपचा पर्याय निवडतील का? असे अनेक प्रश्न असतील. संजयकाकांचे धोरण काय, हे जोवर निश्चित होत नाही तोवर तासगावच्या आखाड्याबद्दल अंदाज बांधता येत नाही. आमचा खासदार, आमचाच आमदार, असे तासगाव तालुक्याचे धोरण राहिले आहे. या मतदार संघाची सहानुभुती आबा गटासोबत राहिली आहे. या घडीला तरी रोहित यांच्यासमोर पर्याय कोण, हाच मुद्दा असेल. जनमताचा कौल राष्ट्रवादीला झुकते माप देणारा आहे.
खानापूर (Khanapur) :
सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक राजकीय गोंधळ असलेला हा मतदार संघ आहे. येथे शिवसेनेचे अनिल बाबर दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील मुख्य विरोधक आहेत. खानापूर आणि आटपाडी दोन तालुक्यांचा हा मतदार संघ, त्यात तासगाव तालुक्यातील वीस गावांचा समावेश आहे. यावेळी आटपाडीचा आमदार हवा, असेही वारे वाहू लागले आहे. दुष्काळ, टेंभू योजना, डाळींब शेती असे इथले कळीचे मुद्दे आहेत. विटा शहरावर पाटील यांचे तर खानापूर तालुक्यावर बाबर यांचे प्रभूत्व आहे. आटपाडी तालुक्यात भाजपकडे राजेंद्रअण्णा देशमुख, अमर देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर असे तगडे नेते आहेत. तेथे बाबर समर्थक तानाजी पाटील यांचा पासंग त्यांच्याशी तुल्यबळ आहे. महाविकास आघाडी राहिली तरी आणि आघाडीत बिघाडी झाली तरी बाबर की पाटील... एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने हा किचकट विषय आहे. भाजपची उमेदवारी आटपाडीतून असेल, असेच चित्र आहे. याघडीला बाबर यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्यासाठी अनुकुलता आहे, असाच जनमताचा कौल सांगतो आहे.
जत (Jat) :
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी असून भाजप मुख्य विरोधक आहे. जतमध्ये सगळेच वेगळे आहे. इथे राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी आहे. जिल्हा बँकेला या आघाडीने काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांना धक्का दिला. सावंत पराभूत झालेच, शिवाय भविष्यातील राजकारणात हा पॅटर्न काँग्रेसची डोकेदुखी ठरेल, असे संकेतही मिळाले. माजी आमदार विलासराव जगताप भाजपमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहे. गेल्या विधानसभेला भाजपच्या बंडखोरीमुळे काँग्रेसचे गणित जमले. महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली तर कदाचित जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतील. भाजपला पर्याय निवडावा लागेल. डॉ. रवींद्र आरळी, तम्मनगौडा रविपाटील अशी इच्छुकांची यादी मोठी आहे. जतचे गणित सरळ आणि काँग्रेस विरुद्ध सर्व असा पॅटर्न तेथे राबवला जाऊ शकतो. तिरंगी लढत झाली तर ती अधिक रंजक असेल. काँग्रेसला इथे राष्ट्रवादी अधिक भाजप या बेरजेपेक्षा स्वतःची ताकद वाढवावी लागेल. प्रदेशच्या नेत्यांनी इथे हात टेकले आहेत. दुष्काळ, पाणीप्रश्न, मागासलेपण या प्रश्नांइतकाच इथला राजकीय संघर्षही ज्वलंत आहे.
पलूस-कडेगाव (Palus-Kadegaon) :
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मोदी लाटेतही तो मजबुतीने उभा ठाकला. आधी डॉ. पतंगराव कदम आणि आता राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी काँग्रेसची पकड मजबूत ठेवली आहे. पुढील निवडणुकीत चित्र रंजक असेल, असा जनमताचा कौल सांगतोय. गेल्या विधानसभेला भाजपकडून पक्की तयारी केलेल्या संग्रामसिंह देशमुख यांना ऐनवेळी आखाडा सोडावा लागला, कारण जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. तेथून संजय विभुते अपेक्षित लढत देऊ शकले नाहीत. यावेळी भाजप हमखास लढेल आणि देशमुखांचे आव्हान कदम यांना पेलावे लागेल. या सरळ समीकरणांत एक तिरका बाणही चालू शकतो. काँग्रेस स्वतंत्र लढली आणि राष्ट्रवादी, शिवसेनेची युती झाली तर इथे राष्ट्रवादीकडून आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड उमेदवार असू शकतील. या तिरंगी लढतीत कसोटी कठीण होत जाईल. याआधी देशमुख अधिक लाड असे समीकरण होते. आता लाड अधिक कदम असे आहे. ते विखुरले तर जनमताचा काटा कसा बदलेल, हे पाहणे रंजक असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.