गॅलरीतून उठलेले आगीचे लोट छतापर्यंत पोहोचू लागले. त्याने छताचा भाग जळण्यास सुरुवात झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करताच आगीचे लोळ बाहेर आले.
कोल्हापूर : कोल्हापूरचा मानबिंदू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत (Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire) बेचिराख झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आज (ता. ९) असताना आज झालेल्या या दुर्घटनेने नाट्यरसिकांसह तमाम कोल्हापूरकर हळहळले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत नाट्यगृहाचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाले. घटनास्थळी आलेल्या अनेक कलाकारांसह करवीरवासीयांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाट्यगृहाची पुन्हा उभारणी करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. साडेनऊच्या सुमारास खासबाग मैदानाकडून लागलेली आग अवघ्या अर्धा तासात प्रेक्षक गॅलरीकडून पसरत गेली. आगीचे लोट छतापर्यंत पोहोचून सर्व छत क्षणार्धात कोसळले.
यासोबतच दोन्ही बाजूच्या भिंतींना तडे गेले. जनरेटरचा स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) सर्व विभागांचे बंब घटनास्थळी बोलाविण्यात आले. विमानतळावरील फायर फायटरनाही पाचारण करण्यात आले. लाकडी साहित्य, आसने, रंगमंचाने पेट घेतल्याने आगीचे लोट हवेत उंचावर पोहोचले होते.
ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरताच चारही रस्ते गर्दीने भरून गेले. परिणामी अग्निशमन दलाच्या कामात अडथळे आले. पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवावा लागत होता. राज्य शासनातर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. ९) सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत या कार्यक्रमाची तयारी महापालिका प्रशासन व नाट्यगृह कर्मचाऱ्यांकडून सुरू होती. साडेआठच्या सुमारास मंचावरील सर्व तयारी झाल्याने कर्मचारी बाहेर पडले होते.
रात्री साडेनऊच्या सुमारास शाहू खासबाग मैदानाच्या बाजूचे जनरेटर खोलीजवळ स्फोट झाल्याचा आवाज झाल्याचे खाऊ गल्लीतील तरुण धावत खासबाग मैदानाकडे आले. त्यांना खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग नाट्यगृहाच्या गॅलरीपर्यंत पोहोचल्याचे दिसले. आरडाओरडा करत त्यांनी बाहेरील नागरिकांना बोलावले. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पहिला बंब पोहोचेपर्यंत पंधरा मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग नाट्यगृहाच्या प्रेक्षक गॅलरीत पसरली होती. येथील आसनांसह शाहूकालीन खासबाग मैदानाचा मंचही पेटला.
आग पाठीमागील बाजूने रंगमंचाकडे पसरत आली. आगीची माहिती मिळाल्याने नाट्यगृहाकडील कर्मचारी तातडीने घरातून घटनास्थळी आहे. समोरील दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले. रंगमंचामागील दरवाजा उघडून येथील काही खुर्च्या, साहित्य वाचविण्यासाठी खिडकीतून आत प्रवेश केला. हे साहित्य बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू होती.
गॅलरीतून उठलेले आगीचे लोट छतापर्यंत पोहोचू लागले. त्याने छताचा भाग जळण्यास सुरुवात झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करताच आगीचे लोळ बाहेर आले. आग सभागृहात पसरल्याचे लक्षात येताच जवानांनी वरिष्ठांना माहिती कळवली. दहाच्या सुमारास पाठीमागील प्रेक्षक गॅलरीचे छत कोसळून आगीचे लोळ आकाशाच्या दिशेने बाहेर पडले. बाजूच्या खिडक्यांमधून आगीसह धूर बाहेर पडू लागला होता.
गॅलरीतील आग खालच्या मजल्यावर पसरली. आत जाणारा दरवाजा बंद असल्याने जवानांनी ते तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण आग पसरल्याने दरवाजातून आगीसह धूर बाहेर येत होता. ही धग वीस ते पंचवीस फुटांपर्यंत जाणवत होती. काही जवानांनी रंगमंचाच्या बाजूने आत प्रवेश केला. आत पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली; परंतु धुराचे लोट पसरल्याने अडथळा निर्माण झाला.
नाट्यगृहाच्या पिछाडीस असणारे खासबाग कुस्ती मैदानाचा मंच व गॅलरीही आगीच्या लपेट्यात आली. याचे उभे खांब एका पाठोपाठ जळून कोसळल्याने येथील कमान व गॅलरी कोसळली. मोतीबाग तालमीसह परिसरात मोठ्या संख्येने जमलेले पैलवान यावेळी पुढे जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांना विनवणी करत होते. ''साहेब आमच्याकडे पाण्याचा पाईप द्या, आमची दौलत वाचवा'' असे बोलत अनेकजण रडत होते.
सभागृहात पसरलेली आग छतापर्यंत पोहोचून छत कोसळताच दोन वेळा स्फोटाचा आवाज झाला. सुरुवातीला नाट्यगृहाच्या आवारात आलेल्या बघ्यांची यावेळी धावपळ उडाली. पोलिसही तातडीने आल्याने त्यांना आगीचे रौद्ररूप पाहून परिसरातून सर्वांना हटकण्यास सुरुवात केली. या पाठोपाठ एसीसह आतील काही सिलिंडरचेही स्फोट झाल्याने भिंतींनाही तडे गेले.
प्रथम किरकोळ वाटणाऱ्या आगीने रौद्ररूप धारण केल्याचे समजताच अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे या प्रमुख अधिकाऱ्यांसह नाट्यगृहात काम करणारे सारे तसेच परिसरात राहणारे महापालिकेतीलही अनेक कर्मचारी घटनास्थळी जी काही मदत लागेल ते करत होते. पाण्याचे टॅंकर योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी सारे धावाधाव करत होते.
आगीची बातमी शहरभर पसरल्याने नाट्यगृहाजवळ गर्दी झाली. स्थानिक पोलिस ठाण्यासह मुख्यालयाकडील अतिरिक्त पोलिस फौजफाटा बोलाविण्यात आला. बालगोपाल तालीम परिसर, प्रायव्हेट हायस्कूल परिसर, देवल क्लब तसेच दूध कट्टा परिसरात गर्दी होती. या गर्दीतून अग्निशमन दलाचे बंब येण्यासही अडथळा आल्याने पोलिसांना बघ्यांच्या गर्दीवर सौम्य लाठीमार करावा लागला. हुल्लडबाजांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.