प्रेम, वात्सल्याने फुलली  आयुष्याची "दुसरी इनिंग' 

 The "second inning" of love, love blossomed
The "second inning" of love, love blossomed
Updated on

कोल्हापूर : आयुष्याच्या वाटेवर शासकीय नोकरी सांभाळत विवाह, दोन मुलांचे शिक्षण, त्यांचे विवाह आणि पुन्हा सुना, नातवंडे असे एकापाठोपाठ एक सुखाचे वेल रमेश मैंदर्गीकर यांच्या संसारवेलीवर फुलत होते. सुख आणि समाधान घरात नांदू लागलं. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अगदी आकस्मिकपणे या कुटुंबावर आघात झाला. श्री. मैंदर्गीकर यांच्या घरातील गृहलक्ष्मीनेच अगदी अनपेक्षितपणे आयुष्यातून एक्‍झिट घेतली. पत्नीच्या अचानक मृत्यूमुळे श्री. मैंदर्गीकर खचून गेले. बापाची झालेली दयनीय अवस्था मुलांना पाहावली नाही. अखेर त्यांनीच वडिलांकडे हट्ट केला आणि दुसऱ्या लग्नासाठी संमती मिळवली. सात वर्षे मैंदर्गीकरांच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली आणि आता पुन्हा हा परिवार आनंदाने नांदू लागला आहे. 
प्रियदर्शनी, प्रमोद व कपिल अशी मैंदर्गीकर यांना तीन मुले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मुलांच्या पाठिशी बाप खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळेच ही मुलं चांगले शिक्षण घेवून स्थिरस्थावर झाली. नोकरी करुन कुटुंबाची जबाबदारी पेलण्यास समर्थ झाली. नोकरीत स्थिरस्थावर झाल्याने दोनाचे चार हात झाले. सुना आणि नातवंडे असा सारा गोतावळा म्हणजे "गोकुळ'च. मात्र, सर्व चांगल्या-वाईट प्रसंगात या परिवाराला बांधून ठेवलेल्या श्री. मैंदर्गीकर यांच्या पत्नीच्या अनपेक्षित निधनाने सारेच कुटुंब कोलमडून पडले. मात्र, या प्रसंगातूनही काही दिवसातच पुन्हा नव्याने हे कुटुंब मुलांनी उभारले. त्यांनी वडिलांसाठी शासकीय महिला वसतिगृहातून योग्य सहचारिणीचा शोध घेतला. सर्वांच्या संमतीने या विवाहास मान्यता घेतली. मुलांनीही मोठ्या थाटामाटात बाबांची पत्नी आणि आपली आई,म्हणून नंदिनीताईंचे स्वागत केले. शासकीय नोकरीची उरलीसुरली पाच-सहा वर्षे सुना- नातवांचे कोडकौतूक करताना कशी संपून गेली, हे समजलेच नाही. दरम्यान, मैंदर्गीकर यांना मधुमेहाचा आणि नंदिनीताईंना कमी रक्‍तदाबाचा त्रास सुरु झाला. मात्र खचून न जाता दोघांनीही एकमेकाची काळजी घेत वेळोवेळी औषधोपचार, योग्य आहाराचे नियोजन केले. एकमेकांनी कधी उतारवयातील सोय इतकेच मतलबी नाते न समजता एकमेकासाठी सर्वस्व दिले. मैंदर्गीकर यांनी नवीन फ्लॅट घेत वारस म्हणून नंदिनीताईंचं नावं दिल. रेशन कार्डवर ही रीतसर पत्नी म्हणून नोंद घेतली. सेवासमाप्तीनंतरही पेन्शन आणि इतर शासकीय सुविधांत नंदिनीताई यांचीच वारसदार म्हणून नोंदणी केली आहे. 

खरा व्हॅलेंटाईन... 
दुसऱ्या इनिंगमध्ये दोघांनीही तरुणपणात गमावलेला निवांत सहवास पुन्हा मिळवला आहे. वेळोवेळी देशभर निसर्ग भ्रंमती करुन आयुष्याचा उत्तरार्ध त्यांनी अधिक रंगतदार बनवला आहे. दिवसेंदिवस आत्मकेंद्री आणि इंटरनेटच्या आभासी प्रेम जगतात रमणाऱ्या आजच्या तरुणाईला रमेश मैंदर्गीकर यांनी "व्हॅलेंटाईन डे'चा खरा अर्थ जगून दाखवला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.