कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या स्टुडिओमध्ये रवींद्र मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले.
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार संजय तडसरकर (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी तडसर (ता. कऱ्हाड) येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे पत्नी, वडील, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १०) आहे.
कला विश्व महाविद्यालय (सांगली), दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट आणि त्यानंतर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (मुंबई) येथे त्यांनी (Senior Sculptor Sanjay Tadsarkar) कलेचे शिक्षण घेतले. ‘कलादीप’ या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील स्टुडंट असोसिएशनचा कलामेळा असो, ‘रंगबहार’ (कोल्हापूर) किंवा ‘कलापुष्प’ (सांगली) असे चित्र-शिल्पविषयक कार्यक्रम असोत, तडसरकर मनापासून व तळमळीने या सर्व उपक्रमांत झोकून देऊन काम करत.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या स्टुडिओमध्ये रवींद्र मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले. (कै) गणपतराव वडणगेकर यांचे ते नात जावई. त्यामुळे कुमावत सेवा संघाच्या कला मंदिर कला महाविद्यालयात (कै) टी. के. वडणगेकर, (कै) डी. व्ही. वडणगेकर, जी. एस. माजगावकर यांच्याबरोबरीने त्यांनी विद्यार्थी घडवले. कोल्हापुरातील चित्रशिल्प कलाक्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तडसरकर यांना आदरांजली वाहिली.
व्यावसायिक कामे बंधनात्मक नियोजनात करावी लागतात. त्यातही त्यांनी कलात्मक वैशिष्ट्ये जपली. त्यांनी ब्रॉन्झ, फायबर, ग्लास अशा माध्यमांत पूर्णाकृती व अर्ध-व्यक्तिशिल्पे साकारली. पंत अमात्य बावडेकर (कोल्हापूर), बालगंधर्व (मिरज), कागल येथील राजर्षी श्री शाहू महाराज यांचे ब्रॉन्झमधील पूर्णाकृती पुतळा, डॉ. बापूजी साळुंखे, एम. आर. देसाई यांची कोल्हापुरातील शिल्पे, लाल महाल येथील बालशिवाजी, जिजाऊ व दादोजी कोंडदेव यांचे समूह शिल्प, राजर्षी शाहू स्मारक भवनातील राजर्षींचा अर्धपुतळा, जिल्हा परिषदेत नुकताच उभारलेला यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा, गोकुळ हॉटेल परिसरातील श्रीपतराव शिंदे यांचा पूर्णाकृती पुतळा आदी कलाकृती तडसरकर यांनी साकारल्या.
हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड या संस्थेसाठीचे ‘फ्लाइंग विंग्ज’ हे फायबर ग्लासमधील शिल्प विशेष उल्लेखनीय ठरले. अलीकडच्या काळात व्यावसायिक कामे व स्मारक शिल्पांसोबतच निसर्ग व मानव जीवनातील होणाऱ्या घडामोडीतील ‘ताण’ या विषयावर स्वतःच्या आनंदासाठी ते शिल्पनिर्मिती करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.