माहेरवाशिणींची शिदोरी यंदा येणार नाही, का ते जाणून घ्या

 Shidori of Mahervashini will not come this year, find out why
Shidori of Mahervashini will not come this year, find out why
Updated on

राशिवडे बुद्रुक, कोल्हापूर : "यंदा कोणीही बहिणींना गौरीची शिदोरी देऊ नये' माघारनींना आणू नये. बाबानू होऽऽऽ, अशा दवंड्या आता गावागावांत दिल्या जात आहेत. कोरोनाने माहेरवाशिणींच्या हक्काचं माहेरपण बंद केलं आहे. त्याने माऊलीच्या घरची वाट अडवली आहे. परिणामी शिदोरीसाठी होणारी लाखो रुपयांच्या फराळाची उलाढालही ठप्प झाली आहे. 
कोरोनाच्या संसर्गामुळे चार महिने लॉकडाउन आहे. ना पाहुण्यांकडे ये-जा, ना छोटे-मोठे समारंभ. पावसाळ्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग थांबेल आणि हक्काच्या माहेराला गौरी- गणपतीच्या सणाला जाईन, ही आशा धरून असलेल्या माहेरवाशिणींच्या या आशेवर पाणी फिरले आहे. कोणीही माहेरची शिदोरी घेऊन बहिणीला आणायला जायचे नाही किंवा बहिणीने यायचे नाही, असे निर्णय बहुतेक सर्वच गावांतील दक्षता समितीने घेतले आहेत. 
गौरी-गणपती हा माहेरवाशिणी यांचा हक्काचा सण. जिव्हाळ्याच्या मैत्रिणी भेटायच्या. सुखदुःखाच्या कहाण्या सांगायच्या. चार दिवस राहून पुन्हा संसाराचं ओझं घेण्यासाठी सज्ज होण्याचा हा सण. कितीही सुखात असली, तरी सासरवाशीणींचे डोळे गौरीच्या शिदोरीकडे लागलेले असतात. माहेरच्या सुखाची, मायेची बरसात करून घेण्यासाठी त्यांचे चित्त सणाकडे लागलेले असते. बहीण वयाने मोठी कितीही असली तरी तिला ही हक्काची शिदोरी देण्याची रीत आजही जिल्ह्यात आहे. कोरोनाने यंदाची हक्काची शिदोरी घेऊन "भाऊराया' येणार नाही, हे आता निश्‍चित झाले आहे. 
ग्रामीण भागातही परंपरागत भाजी-भाकरी, वरणा-उसळीची शिदोरी आता बदलली आहे. वर्षाकाठी या शिदोरीसाठी लाडू, जिलेबी, खाजे हे तिचे नवे रूप आले आहे. यावर लाखो रुपयांची उलाढाल होत असते. गणपती आगमनाच्या आधी चार दिवस आता खेडोपाडी या फराळाच्या जिनसांचे शिदोरीसाठी मोठमोठे स्टॉल उभारलेले असतात. मात्र, यंदा या सगळ्या उलाढाली ठप्प झाल्या आहेत. एकट्या कोरोनाने शिदोरीची उलाढाल थांबली आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शिदोरी न देण्याचा निर्णय आम्ही गावकऱ्यांनी घेतला. तशी दवंडीही गावात दिली. आजवर संकटे आली; पण माहेरवाशीणींची शिदोरी थांबली नव्हती; पण आता भावा-बहिणींच्या कुटुंबांसाठी हा निर्णय गावात घेतला आहे. 
- धनाजी पाटील, माजी सरपंच कोदवडे (ता. राधानगरी)

- संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.