सांगली: कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे ४० टक्के कमिशनवाले सरकार आम्ही उलथून लावले. पंतप्रधान मोदींनी तळ ठोकला तरी लोकांनी भाजपला हाकलून लावले. मोदींवरचा लोकांचा विश्वास संपला.
हीच वेळ आहे, देशातील भाजपचे आणि महाराष्ट्रातील शिंदे व फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाकूया, असा घणाघात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज येथे केला. येथील नेमिनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर आयोजित काँग्रेसच्या महानिर्धार २०२४ मेळाव्यात ते बोलत होते.
कर्नाटकातील विधानसभा विजयानंतर रिचार्ज झालेल्या काँग्रेसने यानिमित्ताने महाशक्तिप्रदर्शन केले. खचाखच भरलेल्या प्रचंड सभामंडप आणि नेत्यांच्या भाषणावेळी मिळालेला उदंड प्रतिसाद काँग्रेसचे आत्मबळ वाढवणारा होता.
आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात.
कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, संयोजक आमदार विश्वजित कदम, आमदार सतेज पाटील, आमदार तथा जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, प्रणिती शिंदे, जयंत आसगावकर, माजी आमदार मोहनराव कदम.
कर्नाटकचे नेते प्रकाश हुक्केरी, बसवराज पाटील, काकासाहेब पाटील, आर. यू. देशपांडे, निरीक्षक संजय बालुगडे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्री पाटील, शैलजा पाटील आदी उपस्थित होते.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवत सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘भाजप संविधानविरोधी, जातीयवादी पक्ष आहे. सावरकर, गोळवलकरांनीही संविधानाला विरोध केला होता. आताचे त्यांचे वारसदारही तेच करतात.
त्यांना संविधान बदलायचे आणि संपवायचे आहे. या स्थितीत आपण संविधान वाचवण्याची शपथ घेतली पाहिजे. त्यासाठी बलिदान देण्याची तयारी ठेवली पाहिजे. लोकशाही धोक्यात आहे. जातिधर्मात तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न ते करतील.
आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी दुसरा स्वातंत्र्यसंग्राम उभा करू. संघ परिवार देशात अशांतता पसरवत निघाला आहे. दलित, हिंदू, अल्पसंख्याकांचे त्यांना काही देणेघेणे नाही. दंगली घडवून सत्ता मिळवायची आहे.
कर्नाटकच्या जनतेने हे ओळखून भाजपला सत्तेतून दूर फेकून दिले. त्यांनी आमदार खरेदी-विक्रीचा बाजार मांडून, ऑपरेशन लोटस् राबवून सत्ता मिळवली. ती टिकली नाही.
जसे कर्नाटकात ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, तसेच महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे भ्रष्टाचारी सरकार आहे. ते दलित, मागास, अल्पसंख्याकांचे हित पाहणार नाही. या भ्रष्ट सरकारने उखडून टाकण्याची हीच वेळ आहे.’’
सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले, ‘‘मी ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मोदींइतका खोटारडा माणूस पाहिला नाही. मोदी हे इतिहासातील सर्वांत थापाडे पंतप्रधान आहेत.
मोदींवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यांनी दाखवलेले एकही स्वप्न पूर्ण केलेले नाही. ना वर्षाला दोन कोटी रोजगार दिला, ना काळा पैसा परत आणला, ना अच्छे दिन आले. उलट महागाईचा आगडोंब उसळला आहे.
कर्नाटकच्या जनतेने त्यांना चोख उत्तर दिले. मोदी आणि अमित शहा महिनाभर तळ ठोकून होते. त्यांनी जिथे सभा घेतली, रोड शो घेतले तेथे भाजपचा उमेदवार पराभूत झाला. आम्ही लोकांना विश्वास दिला, पंचसूत्री दिली आणि ती प्रत्यक्ष राबवली जात आहे.
त्यातही ते राजकारण करताहेत. गरिबांना दहा किलो तांदूळ मोफत देण्याच्या आमच्या योजनेला तांदूळ मिळू नये, असा प्रयत्न भाजप सरकार करते आहे.’’
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, पतंगराव कदम यांचे सिद्धरामय्यांनी स्मरण केले. तोच वारसा विश्वजित कदम पुढे नेत असल्याचे कौतुक केले. मंत्री एम. बी. पाटील म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी विकसित केलेला हा भाग आहे.
त्यांच्यानंतर पतंगराव कदम यांनी येथे विकास केला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम अलौकिक आहे. आता ही धुरा विश्वजित पुढे नेत आहेत. येथे विश्वजित आणि विशाल पाटील यांनी एकत्र काम करण्याची ग्वाही दिली आहे. सिद्धरामय्या यांच्या साक्षीने हे नवे पर्व सुरू होत आहे.’’
नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘‘भाजपने वारकऱ्यांवर लाठीमार करून पांडुरंगाचा अपमान केला. महाराष्ट्राच्या प्रेरणास्थानांचा अपमान केला जात आहे.
आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम आणि बजरंगबली यांची बदनामी केली आहे. कर्नाटकात बजरंगबलीने भाजपला पटकून टाकले. महाराष्ट्रात श्रीराम त्यांना जागा दाखवेल. ईडीचे असंवैधानिक सरकार लोकांच्या घामाचा पैसा जाहिरातीवर खर्च करीत आहे.’’
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘कर्नाटकच्या विजयाचे यशस्वी सूत्र महाराष्ट्रात राबवू. भाजपचे शेतकरी विरोधी सरकार उलथून टाकू. ही परिवर्तनाची नांदी आहे. महाराष्ट्रात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘सध्याचे राज्य सरकार जाहिरातींवर मोठा खर्च करून खोटेनाटे दावे करत आहे. राज्यात, देशात लोकशाही, संविधानाची गळचेपी सुरू आहे. या विरोधात काँग्रेसने आवाज उठवला आहे. सीमावासीयांच्या मनात अन्यायाची भावना येऊ नये याची काळजी घ्यावी.’’
विश्वजित कदम म्हणाले, ‘‘देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, माता-भगिनी सुरक्षित नाहीत, जाती धर्मात पेच निर्माण केला जातोय. लोकशाहीवर विश्वास ठेवणारा माणूस खचतोय. अशावेळी कर्नाटकच्या निकालाने आशेचा किरण दाखवला आहे.’
माहेरवाशिनींना एसटी मोफत द्या
कर्नाटकात महिलांना एसटी प्रवास १०० टक्के मोफत केला. तो कर्नाटकमध्ये मर्यादित आहे. या मुद्यावर बोट ठेवत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील अनेक मुली कर्नाटकात विवाह करून गेल्या आहेत. त्या माहेरी येताना त्यांनाही एसटी प्रवास मोफत मिळावा. सिद्धरामय्यासाहेबांनी तसा निर्णय घ्यावा.’’
जतला शाश्वत पाण्याची ग्वाही
कर्नाटकातील तुबची बबलेश्वर सिंचन योजनेतून जत पूर्व भागात शाश्वत स्वरूपात पाणी मिळावे, ही मागणी मेळाव्यात केंद्रस्थानी राहिली. लोकांनी फलक दाखवून सिद्धरामय्यांचे लक्ष वेधले.
सिद्धरामय्या यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची घोषणा केली. विश्वजित कदम म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुष्काळी भागाच्या भावना व्यवस्थित समजून घेऊ शकतात.
त्यांनी या प्रश्नात स्वतः पुढाकार घ्यावा.’’ आमदार विक्रम सावंत यांनी कन्नड भाषेतून हा विषय सविस्तर मांडला. ते म्हणाले, ‘‘कोयना धरणातून दरवर्षी महाराष्ट्र सरकार कर्नाटकला दोन ते तीन टीएमसी पाणी देते.
त्या बदल्यात कर्नाटकने जतला पावसाळ्यात पाणी द्यावे. सध्या मंत्री एम. बी. पाटील यांच्या सहकार्याने मानवतेच्या भावनेतून पाणी मिळते. पिण्याच्या पाण्याला सहकार्य होतेच, शिवाय २९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
हे पाणी शाश्वत स्वरूपात मिळावे. या पाणी व्यवहाराचा शाश्वत करार व्हावा.’’ मंत्री एम. बी. पाटील यांनी शाश्वत स्वरूपात पाणी देण्याचा कर्नाटकचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली. याआधी ही योजना मांडली गेली होती.
मात्र, काही कारणाने करार झाला नाही. आता महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आणा आणि करार करून शाश्वत स्वरूपात पाणी देऊ, अशी ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.