निवडणूक गावची, कसोटी नेत्यांची ; गटातटासाठी जोर

special article on gram panchayat election by avdhut gaikwad in gadhinglaj kolahpur
special article on gram panchayat election by avdhut gaikwad in gadhinglaj kolahpur
Updated on

गडहिंग्लज (कोल्हापूर) : गावावर राजकीय वर्चस्व कोणाचे, हे ठरविणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक गावची असली तरी कसोटी तालुकास्तरीय नेत्यांची लागली आहे. अनेक गावांत एकाच राजकीय पक्षातील गटांच्या परस्परविरोधी आघाड्या आकाराला येत आहेत. या गटांना सांभाळताना तालुकास्तरावरील नेत्यांना कसरत करावी लागत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहा महिने लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. ऐन थंडीत गावागावांतील राजकीय वातावरण तापले आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रभाग आरक्षणानुसार उमेदवार अंतिम करण्यात गावपातळीवर नेतेमंडळी गुंतली आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे ऐनवेळी कोणाकडून दगाफटका होईल का? याची चाचपणी सुरू आहे. दगाफटका झालाच तर त्यातून मार्ग कसा काढायचा? याचा खल सुरू आहे.

ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर फारच क्वचितच लढविल्या जातात. स्थानिक संदर्भाना अधिक महत्त्व असल्याने आघाड्या करूनच निवडणूक लढविली जाते. गाव म्हटले की पक्ष आणि पक्ष तिथे गट हेच सध्याच्या राजकारणाचे सूत्र आहे. याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. त्यामुळे एकाच पक्षाचे दोन तर काही मोठ्या गावात तीन-तीन गट आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक गावात राजकीय पक्षांच्या गटांनी सोईनुसार भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

स्थानिक राजकारण, वैयक्तिक हेवेदावे, पक्षांतर्गत वर्चस्ववाद असे अनेक संदर्भ आहेत. त्यातून परस्परविरोधी आघाड्या आकाराला येत आहेत. स्थानिक राजकारणासाठी या आघाड्या सोईच्या असल्या तरी तालुकास्तरीय नेत्यांसाठी ही बाब अडचणीची ठरत आहे. नेत्यांकडे गावपातळीवरील गटप्रमुखाकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे. ही अपेक्षा करणेही स्वाभाविक आहे. कारण, नेत्यांसाठी खस्ता खालेले हे सारे गटप्रमुख, त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण, मदत कोणाला करायची हा प्रश्‍न नेत्यांना भेडसावत आहे. त्यामुळे या टप्प्यात तरी स्थानिक गटांची दुभंगलेली मने सांधण्यावर नेत्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. गटतट एकत्र राहण्यासाठी त्यांच्याकडून जोर लावला जात आहे. 

स्वत:च्या निवडणुकीवरही डोळा...

तालुकास्तरावरील नेत्यांचा एक डोळा ग्रामपंचायत निवडणुकांवर असला तरी दुसरा डोळा भविष्यात होणाऱ्या स्वत:च्या निवडणुकीवरही आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, तालुका-जिल्हास्तरावरील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मदतीसाठी सारेच उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शक्‍यतो कोण दुखावणार नाही, याची काळजी घेत मार्ग काढण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.