वर्धापन दिनानिमित्त (Sakal Kolhapur Anniversary) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित विशेष व्याख्यानात श्री एम यांनी वेद, उपनिषदे यातील दाखले देत ऊर्जा - ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन विषद केला.
कोल्हापूर : आपल्या सर्वांमध्ये विलक्षण ऊर्जा असते. परंतु, त्याची जाणीव नसते. स्वतः मधील आंतरिक ऊर्जा जागृत करण्यासाठी योग्य गुरुंच्या मार्गदर्शनाखाली साधनेची आवश्यकता आहे, असे सांगत परमशक्ती, ब्रह्मशक्तीची ऊर्जा समजून घेण्यासाठी आंतरिक ऊर्जा चेतविण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू, लेखक, समाजतज्ज्ञ, पद्मभूषण श्री एम (Padma Bhushan Sri M) यांनी केले.
वर्धापन दिनानिमित्त (Sakal Kolhapur Anniversary) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित विशेष व्याख्यानात श्री एम यांनी वेद, उपनिषदे यातील दाखले देत ऊर्जा - ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन विषद केला. महालक्ष्मीमुळे कोल्हापूर (Mahalaxmi Temple) हे महाऊर्जेचे, शक्तीचे केंद्र आहे, असे त्यांनी विषेतत्वाने नमूद केले. वेदकाळापासून उपनिषदांच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जेचे महत्त्व विविध स्त्रोतातून सांगितले गेले आहे, असे सांगत श्री एम म्हणाले, विशेषतः स्त्री शक्तीला ऊर्जेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदी शंकराचार्यांनीही स्त्रीला ऊर्जेचे रूप मानले आहे.
भगवान शिवाची उपासना हे शक्तीचे रूप आहे. ऋग्वेगदातील श्री सुक्तात स्त्री शक्तीचा परब्रह्म, सर्वोच्च शक्ती असा उल्लेख असून सर्व श्लोक देवीचे आहेत. चराचरात ऊर्जा सामावलेली आहे. ती घेण्याची आपली क्षमता कमी पडते. ती विकसित करण्याची आवश्यकता आहे. वेदांचा सर्व अर्थ उपनिषदांमध्ये सामावलेला आहे. भगवान श्री कृष्णांनी अनेक दृष्टांतासाठी वेदांमधील सामवेदाचे दाखले दिले आहेत. सामवेद भारतीय संगीताचे मूळ आहे. सामवेदाचे श्लोक नुसते म्हटले जात नाहीत, तर गायले जातात. त्याचे उच्चारण गाण्यासारखे आहे. कारण संगीत ही एक प्रकारची ऊर्जा आहे.
ऊर्जेची साधना केल्यावरच आपण ब्रह्माकडे जाऊ शकतो, असे सांगताना अग्नीदेव, वायूदेव आणि इंद्र यांच्यामध्ये स्वतःच्या शक्तीबद्दल निर्माण झालेला अहंकार परब्रह्माने नष्ट केल्याची सामवेदातील कथा श्री एम यांनी ऐकविली. नंतर ती परब्रह्मशक्ती पार्वतीच्या म्हणजे शिवाच्या अर्धांगिनीच्या रूपात येऊन प्रकट झाल्याचे श्री एम यांनी सांगितले. सर्वोच्च शक्तीला इशावाश्य उपनिषदात संसारातील इश्वर म्हणून संबोधले जाते. आपण त्याला परिवलीच्या भाषेत जगत् म्हणतो. जगत् म्हणायचे कारण म्हणजे ती कायम चलस्वरूपात असते. ही चलस्वरूपातील ऊर्जा वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर प्रकट होत असते. ती कमीही होत नाही आणि वाढतही नाही. जगत् प्रमाणेच आपल्या आंतरिक शक्तीचेही तसेच आहे. तिचे स्वरूप बदलत असले तरी कमी होत नाही. ऊर्जेचे वेगवेगळ्या स्वरूपात परिवर्तन होत असते, याकडे श्री एम यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
श्रीरामकृष्ण परमहंसांचा दाखला देत श्री एम म्हणाले, साधनेतून ऊर्जा मिळते, हे त्यांच्याकडून शिकावे. आपल्यातील ऊर्जा कशी हाताळावी, तिचा अनुभव कसा करावा, याचा वस्तूपाठ त्यांनी दाखविला. योग्य पद्धतीने साधना केल्यास आंतरिक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. अर्थात त्यासाठी निस्वार्थ भाव असला असल्याशिवाय ती निर्माण होत नाही. आपल्यातील शारीरिक ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणाले, आपल्यातील शक्तिदेवतेला कुंडलिनी म्हणतात. परंतु कुंडलिनी जागृतीचे तंत्र योग्य पद्धतीने शिकले पाहिजे. वेद, पुराणांपासून आतापर्यंत केवळ परब्रह्म ऊर्जाच कार्यरत आहे. योगतंत्राचा योग्य पद्धतीने अभ्यास करून ऊर्जा विकसित करता येते.
मुलाधार चक्राच्या माध्यमातून आंतरिक शांतीची ऊर्जा प्राप्त होते. अर्थात क्रियायोग आणि अन्य साधना हळूवारपणे हाताळाव्या लागतात. ते सोपे नाही. त्यासाठी योग्य गुरूंचे मार्गदर्शन पाहिजे. योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आंतरिक ऊर्जा क्रियाशील होऊ शकते. अर्थात त्यासाठी यम-नियम आणि शुद्ध जीवनाचे आचरण आवश्यक आहे. योग्य गुरूंचे मार्गदर्शन लाभल्यास परमशक्ती समजेल. आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून ऊर्जेची अनुभूती होत असते. त्यासाठी सखोल साधनेच्या माध्यमातून पंचद्रिये सिद्ध केली पाहिजेत. त्यासाठी चांगला गुरू शोधण्याची आवश्यकता आहे.
कोल्हापूरचे स्थान माहात्म्य प्रचंड आहे. या ठिकाणी साक्षात लक्ष्मी वास करत असल्याने ही भूमी ऊर्जेचे मोठे केंद्र आहे. महालक्ष्मी, राजराजेश्वरी, श्री विद्या या ऊर्जेचे परमसाध्य आहे. त्यामुळेच कोल्हापूर हे ऊर्जेचे स्थान आहे.
साक्षात भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली. ते एकप्रकारे ऊर्जेचे रूपांतरणच आहे. त्यानंतर घडलेला इतिहास सर्वज्ञात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.
आपल्यातील आंतरिक शक्ती जागृत करण्याची आवश्यकता असून त्यासाठी साधना गरजेची आहे. माझे वय आता ७५ आहे. अनेकजण मला विचारतात, या वयात तुमच्यात ऊर्जा येते कोठून. ती कोठेही बाहेरून येत नाही. त्यासाठी साधना हे साधन आहे. चांगली साधना करण्यासाठी योग्य गुरू शोधला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.