कोल्हापूर : स्वातंत्र्य चळवळीच्या काळात चळवळीचे अग्निकुंड असलेल्या व स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरच्या अस्मितेचा केंद्रबिंदू झालेल्या शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ पुतळा उभारणीस बुधवारी (ता. 13) 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा पुतळा म्हणजे स्फूर्तिस्थान तर आहेच; पण या पुतळ्याच्या परिसराला स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाची किनार लाभली आहे. अलीकडच्या काळात तर देशात मोठे काही घडले की, त्याचे पहिले पडसाद याच चौकात उमटणार, हे ठरून गेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची उभारणी हीच कोल्हापूरच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सनसनाटी घटना. या चौकात 1929 ला ब्रिटिश गव्हर्नर विल्सन याचा पुतळा उभा केला होता. शहराच्या प्रमुख चौकातच हा पुतळा असल्याने तो कोल्हापूरकरांच्या संतापाचा मुद्दा होता. 10 ऑक्टोबर 1942 ला सौ. भगिरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे या दोन स्वातंत्र्य सौदामिनींनी या पुतळ्यावर डांबर व ऍसिड फेकून पुतळा विद्रुप करून ब्रिटिश सत्तेविरोधातला असंतोष व्यक्त केला. या दोघींना 16 महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. विशेष हे की, या वेळी भगिरथीबाई तांबट या गरोदर होत्या. त्या बिंदू चौक कारागृहात शिक्षा भोगत असताना प्रसूत झाल्या.
पुतळा विद्रुप झाल्याने तो झाकून ठेवला; पण स्वातंत्र्य सैनिकांना तो ब्रिटिश पारतंत्र्याचे प्रतीक असलेला पुतळाच तेथून हटवायचा होता. त्यामुळे 13 सप्टेंबर 1943 ला शामराव लहू पाटील, शंकरराव माने, अहंमद शाबाजी मुल्ला, काका देसाई, कुंडल देसाई, व्यंकटेश ऊर्फ बाबुराव देशपांडे (सांगाव), डॉ. माधवराव कुलकर्णी, नारायण घोरपडे, नारायण जगताप, पांडुरंग बळवंत पोवार, महादेव भाऊ घाटगे (वडणगे), आबू जाधव, वसंत बळवंत तावडे या स्वातंत्र्य सैनिकांनी पुतळा स्वच्छ करण्याचे निमित्त केले व हा पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला. मुळात डांबर ऍसिड टाकल्याने विद्रुप झालेला व त्यानंतर घणाचे घाव घालून फोडण्याचा प्रयत्न झालेला हा पुतळा त्या चौथऱ्यावर काढून ठेवावा लागला.
विल्सनचा हा पुतळा काढल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी पुढाकार घेऊन शिव स्मारक समिती तयार केली. व्ही. टी. पाटील त्याचे अध्यक्ष होते. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी पुतळा तयार केला. आणि 13 मे 1945 ला म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच ब्रिटिश गव्हर्नर विल्सन याचा पुतळा हटवून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा इतिहास कोल्हापुरात घडला. माधवराव बागवे, शेठ माणिकचंद चुनीलाल यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाले. ब्रिटिश गव्हर्नरचा पुतळा हटवून त्याच्या छाताडावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कोल्हापूरकरांचे स्वप्न साकारले गेले.
18 दिवसांत पुतळा पूर्ण
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 18 दिवसांत कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी घडवला. पुतळ्याचे काम उद्घाटनाच्या दिवसापर्यंत पूर्ण नव्हते. त्यामुळे 13 मे 1945 ला सकाळी 10 वाजता होणारा हा कार्यक्रम त्यादिवशी सायंकाळी सहा वाजता करावा लागला. पुतळ्याच्या जोडणीचे काम कसबा बावड्यात शुगर मिल्समध्ये झाले. शिवाजी टेक्निकल स्कूल, शुगरमिल वर्कशॉप, राजाराम रायफल्स व उद्यमनगरातील स्थानिक कारागिरांनी 18 दिवांत पुतळा पूर्ण होण्यास हातभार लावला.
धगधगता इतिहास
नव्या पिढीसमोर यावा
या चौकाचे सुशोभीकरण करताना त्या ठिकाणी पुतळा उभारणीचा इतिहास भावी पिढीसमोर आणला जाणार होता; पण सुशोभीकरणातही पुतळा उभारणीमागचा धगधगता इतिहास दडलाच गेला. त्यामुळे पुतळा उभारणीचा इतिहास 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तरी नव्या पिढीसमोर आणावा, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.