बांबवडे (कोल्हापूर) - बांबवडे (ता. शाहुवाडी) मुख्य बाजारपेठ येथे अज्ञात शिवसैनिकांनी गनीम कावा युक्तीचा वापर करुन मध्यरात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. अचानक उभारलेल्या या पुतळ्यामुळे शाहुवाडी प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र अनधिकृत व विनापरवाना पुतळा उभारला असल्याचे कारण दाखवत प्रशासनाने हा पुतळा सुरक्षित ठिकाणी स्थालांतरीत केला.
अवघ्या हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असून समोरच अज्ञातांनी हा पुतळा उभारल्याने पोलिस प्रशासन ही अवाक झाले. आज बांबवडे येथे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढू देणार नाही, अशी भूमिका घेत दिवसभर ठिय्या मांडून होते. परंतु, प्रसासनाने मांडलेली बाजू शिवप्रेमींना मान्य नसल्याने माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह २५ ते ३० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शाहुवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
त्यानंतर तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन केले. पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून व विधिवत पुजन करुन पुतळा काढण्याचे काम सुरु केले आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पुतळा हालवण्यात आला. सुमारे दोन टन वजनाच्या शिळावरती छत्रपतींचा पुतळा बसवल्यामुळे त्यास मोठी मजबूती मिळाली होती. एका रात्री हा पुतळा बसविल्याने असल्याने मोठा चर्चेचा विषय झाला होता.
दरम्यान, पोलिस उपाधिक्षक प्रशांत अमृतकर यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांची भेट घेतली व पुतळ्याची रितसर परवानगी घेऊन प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन केले.
यावेळी प्रांत अधिकारी अमित माळी यांनी सांगितले की, बांबवडे ग्रामपंचायतीच्यावतीने अज्ञात व्यक्ती विरोधात शाहुवाडी पोलिसांत तक्रार आल्याने कोणतीही परवानगी न घेता अज्ञातांनी पुतळा बसवला होता. या पुतळ्याचे स्थलांतरित करून सुरक्षितपणे पुतळा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
हे पण वाचा - अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम चोप
दरम्यान बांबवडे बस स्थानकाच्या परिसरात छावणीचे स्वरूप आले होते. रॅपिड पोलीस फोर्स पथकाने संपूर्ण परिसरात बंदोबस्त दिला होता. काही तरूणांनी छुप्या पद्धतीने मोबाईलवर चित्रीकरण केल्याने त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तर काही अज्ञात शिवप्रेमींनी दगडफेक केल्याने वातावरण तणावपुर्ण झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार गुरु बिराजदार, पोलीस निरीक्षक प्रविण चौगुले, ए.डी. फडतरे, सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, माजी आमदार सत्यजित पाटील, जि.प. सदस्य व सभापती हंबीरराव पाटील, विजय बोरगे, उपसभापती विजय खोत, दिलीप पाटील, शिवसेना जिल्हाउप्रमुख नामदेव गिरी, सचिन मुडशिंगकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.