कोल्हापूर : चटणी तयार करताना अन्य मसाल्याबरोबर एक पदार्थ लक्ष वेधून घेतो. हा पदार्थ म्हणजे, दगडफुल. चटणीला खमंग मसालेदार वास येण्यासाठी दगडफुल चटणी तयार करताना टाकले जाते. हे दडगफुल जेव्हा तेलात परतले जाते, तेव्हा तर आणखी खमंग वास सुटतो. असे हे दगडफुल दगडांवर, वृक्षाच्या बुंध्यांवर येते. अलिकडच्या काळात मात्र कोल्हापूर परिसरात दगडफुल मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशी दगडफुले तळ-कोकणात सर्वाधिक आढळतात. हे दगडफुल चटणीला खमंग वास प्रदान करते. अन्नाला चविष्ठ वास देत तृप्तही करते.
अशी दगडफुले जोतीबा डोंगर, कडेकपारी, कातळकडे, दगडांच्या खाणी आढळतात. सहज फिरायला गेले की, ते नजरेत येतात; पण मसाल्यात हीच दगडफुले वापरली जातात, हे मात्र माहिती नसते. आज मोठ्या दगडी शिळा, दगडे घर बांधण्यासाठी वापरली गेली. रस्ते निर्मितीत दगडांचा वापर होतो. प्रदुषण वाढल्याने ही दगडफुले अलिकडे दिसत नाहीत. तुरळक कुठेतरी दिसतात. दगडफुल म्हणजे, युगायुगांच्या सहजीवनाची ही कथा आहे. दगडफुल तयार होण्याआधी कवक (बुरशी), शैवाल एकत्र येते. मग ते पाणी, प्रकाश, हवा, माती, सेंद्रीय पदार्थ, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, मूलद्रव्ये घटक घेऊन मग दगडफुल तयार होते. यातील शैवालामध्ये हरितद्रव्य असते. या हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून ते अन्न तयार करते. शैवाल खाली बाजूस तर बुरशी वरील बाजूस असते. जेव्हा दगडफुल वरुन पाहिले जाते, तेव्हा ते धुरकट पांढऱ्या रंगाचे दिसते. यातील वरील बाजू ही बुरशीची असते. हे दोघेही एकत्रितपणे येऊन दगडफुलाला जन्म देतात. याआधी ही दगडावर किंवा झाडाच्या बुंध्यावरील बुरशी आहे, असे समजले जायचे; पण जसजसे विज्ञान उत्क्रांत होत गेले तशी बुरशी, शैवालाचे एकत्रित नाते लक्षात आले. अशा दगडफुलाला "लायकेन' गट म्हणतात. या गटामध्ये दगडफुलांच्या, बुरशी, शैवालांच्या खूप प्रजाती आहेत.
बुरशीबरोबर असलेल्या शैवालात हिरवा, मोरपिशी, पिवळा, केशरी, काळा असे अनेक रंगही दिसतात. दगडफुलाच्या धाग्यासारख्या रचनेत बाहेरचे आवरण बुरशीच्या धाग्यांचे असते.
यामुळे आतील ओलावा धरुन ठेवला जातो. त्याआत शैवालाच्या पेशी असतात. त्या तिथे अन्न निर्माण करतात. तसेच वरील थरामुळे त्यांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. त्याच्याही आत आधार म्हणून बुरशीचा एक धागा असतो. दगडफुलाची रचना ही गुंतागुंतीची असते. ही बुरशी अन् शैवाल जगात कुठेही तग धरु शकते. अगदी अंटाक्ट्रिका खंड, हिमालयात 18 हजार फुटांवर, बर्फाळ प्रदेशातील टुंट्रा प्रदेश, नामिबीयाच्या वाळवंटात दगडफुले आढळते. केवळ एक चौरस सेंमी वाढ व्हायला दगडफूलाला 50 ते 60 वर्षे लागू शकतात. काही दगडफूले हवेतील प्रदूषणाला तोंड देऊ शकत नाहीत. त्याची वाढ खुंटते. जिथे प्रदुषण नाही, तिथी ती वेगाने वाढतात. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफुले वापरतात.
दगडफुल असेही
दगड निवडताना दगडफुले चोखंदळ असतात. ज्या दगडांचा उपयोग पक्षी विसावा घेण्यासाठी करतात. तिथे पक्ष्यांच्या विष्ठेतून मिळणारी मूलद्रव्ये त्यांच्यासाठी महत्वाची असतात. तिथे ती अधिक जोमाने तरारुन येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.