रुकडी (कोल्हापूर) : येथील समृद्धी प्रकाश पाटील हिने दिव्यंगत्वावर मात करीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या महाराष्ट्र गट- क परीक्षा-२०१९ लिपिक टंकलेखक (मंत्रालय क्लार्क) या पदावर महाराष्ट्रात ११८ व्या क्रमांकाने समृद्धीची निवड झाली.
१९९८ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी पाठीच्या मणक्याला म्हशीने जोरात धडक दिल्याने अपघाताने तिच्या नशिबी दिव्यंगत्व आले. तिला भूल न देताच शस्त्रक्रिया करावी लागली होती. यावेळी समृद्धी दोन-तीन वर्षे सतत झोपून राहिल्याने पाठीत जखमा झाल्या होत्या. घरातील गरिबीसोबत आयुष्यभरासाठी चिकटलेली चाकाची खुर्ची. त्यातच अचानक वडिलांचे हरपलेले छत्र अन् आईच्या शिवण कामावर गुजराण करणारे घर. अशा बिकट परिस्थितीत अपंगत्वामुळे चालत्याफिरत्या समृद्धीचे जीवनच अंधारमय बनलेले. या परिस्थितीवर मात करून स्वतःला तिने सावरले. व्हीलचेअरच्या आधारे तिने पुन्हा बाहेरील जग पहायला सुरुवात केली. मात्र, नियतीला ते मान्य नसावं की काय? फेब्रुवारी २०१५ मध्ये पुन्हा अपघात झाला आणि पुन्हा त्याच वेदनेच्या उजळण्या समृद्धीच्या आयुष्यात चालू झाल्या.
अपंगत्वावर मात करीत तिने शिक्षणाची कास सोडली नाही. मोठ्या अपघातानंतर पायांची हालचाल होत नव्हती, हातांची हालचाल होत नव्हती, साधा पेनही हातात धरता येत नव्हता. तेव्हा तिने पुन्हा शिकण्याचा निर्धार केला. अथक परिश्रमाने तिने २००९ मध्ये पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असताना इच्छाशक्तीच्या जोरावर समृद्धीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या वेळी तिला आचार्यश्री प. पू. १०८ चंद्रप्रभसागरजी मुनी महाराजजींचे मार्गदर्शन मिळाले. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देऊन आचार्यश्री मदत करतात, त्याप्रमाणे तिची सर्व जबाबदारी उचलली. विद्या सन्मतीदास सेवा संस्थेच्या माध्यमातून तिला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला पाठवले. जून २०१५ मध्ये पुण्यात दाखल झाली. चार वर्षांत राज्यसेवा मुख्य परीक्षेपर्यंत धडक मारली; पण पदरी अपयश आणि निराशा आली.
आई व छोट्या बहिणीची साथ, आचार्यश्रींच्या प्रेरणेने आणि वीराचार्य ॲकॅडमीचे मार्गदर्शक सुहास कोरेगावे, ओमकार शेंडुरे आणि प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशाचे व जिद्दीचे रुकडीसह परिसरात कौतुक होत आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.