शिरोली दुमाला (कोल्हापूर) : कोरोना महामारीत सततच्या लॉकडाउनमुळे व्यवसाय आणि अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले असताना मंदीतही हार न मानता मोत्यांची शेती करून युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे, सडोली दुमाला (ता. करवीर) येथील दिलीप कांबळे या युवा शेतकऱ्याने. घरातच मोत्यांची शेती करून व्यवसायाची अनोखी वाट धुंडाळली आहे.
मोत्यांची शेती नेमकी कशी असते, हे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मोत्यांच्या शेतीसाठी मोठी जमीन लागत नाही. नदीतून शिंपले आणल्यानंतर त्यांच्यावर लहानशी न्यूक्लिअस शस्त्रक्रिया केली जाते. त्यापैकी काही शिंपले मरण पावतात, तर काही त्या बिजांना स्वीकारतात. तशा शिंपल्यांना काढून मोठ्या टॅंकमध्ये ठेवले जाते. त्यानंतर पाण्यात शिंपल्यांसाठी खाद्य टाकणे, पाण्याचे तापमान ठरावीक पातळीवर मर्यादित ठेवणे, मृत शिंपले दूर करणे, अशी काळजी घ्यावी लागते. मोती बनण्याचा कालखंड आठ ते दहा महिन्यांचा असतो.
काही शिंपल्यांत साचे टाकून हव्या त्या आकाराचे, विविध डिझाइनचे मोती बनवता येतात. तयार झालेले मोती शंभर रुपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत विकले जातात. आतापर्यंत महापुरुषांच्या व देवतांच्या प्रतिमा असलेले विविध आकाराचे मोती बनवले आहेत.’’
दरम्यान, सुरवातीला त्यांनी काही शिंपल्यांचे संगोपन केले; पण त्यांना अपयश आले. यानंतर त्यांनी ओडिशामधील शिपा या ठिकाणी प्रशिक्षण घेतले. यात त्यांनी २५ ते ३० हजारांची गुंतवणूक केली असून, दहा हजार शिंपल्यांचे संगोपन केले आहे. यातून त्यांना चार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. दिल्ली, ओडिशा या ठिकाणी ते विक्री करतात. बेरोजगारांनी अशाप्रकारे व्यवसाय करावा, यासाठी त्यांचा प्रयत्न असून ते स्वतः याचे मोफत प्रशिक्षण देतात.
कमीतकमी गुंतवणूक करून मोत्यांची शेती करता येते. सुरवातीला यात थोडे नुकसान झाले; पण चिकाटी सोडली नाही. यातील तज्ज्ञ लोकांकडून याचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे आम्हाला यातून चांगला नफा मिळत आहे.
- दिलीप कांबळे, सडोली दुमाला, करवीर.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.