Success Story: सेंद्रियचा गोडवा पोहचला लंडनच्या दारात; वयाच्या ७२ व्या वर्षी आणले यश खेचून

Success Story: सेंद्रियचा गोडवा पोहचला लंडनच्या दारात; वयाच्या ७२ व्या वर्षी आणले यश खेचून
Updated on

गडहिंग्लज (कोल्हापूर) : ती जमीन पूर्णत: खडकाळ. पाण्याचा एकही स्रोत नाही. रोपे लावण्यासाठी चार फूट खड्डा काढण्यासही जेसीबीला नाकीनऊ आले. या खड्ड्यांमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर दहा वर्षांपूर्वी आंबा रोपे लावली. पहिल्या वर्षी डोक्यावरून आणि हातगाड्यावरून घागरीने पाणी घातले. तीन वर्षांनी रोपांना फळे लागली. यंदा आठव्या वर्षी पहिल्यांदाच हा आंबा आता सातासमुद्रापार लंडनला पोहचला. येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील निवृत्त मुख्याध्यापक बी. डी. बिरंजे यांनी ही कमाल केली आहे. आज वयाच्या ७२ व्या वर्षीही ते या बागेची काळजी घेत आहेत.

success story in gadhinglaj farmer kolhapur agriculture marathi news

येणेचवंडी हे पूर्व भागातील छोटेसे कोरडवाहू गाव. बिरंजे यांनी निवृत्त झाल्यानंतर २००९ मध्ये फळबाग करण्याचे ठरविले. एम.एस्सी. (ॲग्रि.) झालेला मुलगा प्रदीप यांनीही त्यांना साथ दिली. जेसीबीने काढलेले खड्डे, ओढ्यातील गाळ काळ्या व लाल मातीने भरून घेत पावसाळ्यात देवगडवरून आणलेल्या हापूस, केशर, पायरी, तोतापुरी आंब्यांची १०० रोपे १८ गुंठे क्षेत्रात लावली. पावसाळ्यानंतर रोपांना पाण्याची भासणारी गरज त्यांनी स्वत: डोक्यावरून आणून भागविली. दुसऱ्या वर्षी त्यांनी या क्षेत्रात बोअर मारून पाण्याची उपलब्धता केली. दरवर्षी ते झाडांना सेंद्रिय खते देतात. तिसऱ्या वर्षी रोपांना फळे लागली. दरम्यान, मुलगा प्रदीप यांना बॅंकेत नोकरी लागली. ते सध्या मुंबईला आहेत. यावर्षी बागेतील झाडांना सहा हजारांहून अधिक आंबे लागले आहेत.

हेही वाचा- मराठा आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रदीप यांनी आंबा निर्यात करण्याचे ठरवून अपेडाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश आले. येणेचवंडीतून सहा ते सात क्विंटल केशर व हापूस आंबे निर्यातीसाठी तयार केले गेले. बिरंजे यांनी आंबे विशिष्ट कॅरेटमधून पॅकिंग करून येणेचवंडीतून मुंबईला पाठविले. त्यानंतर मुंबईतून त्याची प्रतवारी होऊन आंबे लंडनला पोहचले आहेत. निर्यात आंब्यासाठी लागणारी विशिष्ट फ्रूट बॅग चीनहून मागवून घेतली. प्रति किलो १०० ते ११० रुपये दराप्रमाणे या निर्यातीमधून त्यांना ६० ते ७० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

लंडनला आणखीन आंब्याची मागणी असली तरी लॉकडाउन असल्याने येणेचवंडी ते मुंबई वाहतुकीची अडचण येत आहे. निर्यातीचे काही आंबे मुंबईत शिल्लक असून ते जपानला पाठवण्याचे नियोजन असल्याचे प्रदीप बिरंजे यांनी सांगितले. बिरंजे यांना मंगेश गलांडे, अपेडाचे अभिमन्यू माने, सेंद्रिय शेतीचे अभ्यासक अरुण देसाई, आप्पासाहेब पाटील, रामा गुरव यांच्यासह तालुका कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. निवृत्तीनंतर काय करायचे हा प्रश्‍न होता. त्यामुळे प्रयोग म्हणून फळबाग लागवड केली. निर्यातीचा विचारही केला नव्हता. मुलगा उच्चशिक्षित असल्याने यावर्षी निर्यातीसाठी प्रयत्न केले. शंभर टक्के सेंद्रिय व गोडवा चांगला असल्याने आंबा निर्यातीला यश मिळाले.

उसापेक्षा कितीतरी पटीने चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी फळबागेचा प्रयोग करावा.

- बी. डी. बिरंजे, येणेचवंडी.

लाखाचे उत्पन्न...

गतवर्षी बागेतून बिरंजे यांना नऊ हजार आंबे मिळाले. कोणतेही मार्केटिंग नसताना घरात येऊन ग्राहकांनी आंबे खरेदी केले. त्यातून त्यांना एक लाखाचे उत्पन्न मिळाले. यंदा आंब्यांचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे पाऊण लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. याशिवाय आंतरपीक म्हणून ते वर्षभर भाजीपाला घेतात. जवारी केळी, पपई, लिंबू व चिक्कूची झाडेही आहेत. खडकाळ जमिनीतून वर्षाला लाखाचे उत्पन्न घेणाऱ्या बिरंजे यांची प्रेरणा घ्यावी, अशीच आहे.

success story in gadhinglaj farmer kolhapur agriculture marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.