मध्यरात्रीच दोघांनी त्या खोलीतील लोखंडी अँगलला एकाच नायलॉन दोरीने गळफास लावून घेऊन जीवनयात्रा संपवली.
नागाव : ‘मिस यू जान’ असा स्टेटस् सोशल मीडियावर ठेवत आंतरधर्मीय (Inter Caste Marriage) अल्पवयीन प्रेमी युगुलाने एकत्रितपणे जीवन संपवले. दोघांच्याही कुटुंबांतून प्रेमाला तीव्र विरोध होऊ लागल्याने त्यांनी प्रियकराच्या (Boyfriend) घरात एकाच दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे काल सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यात खळबळ माजली.
मिळालेली प्राथमिक माहिती अशी, पुलाची शिरोली येथील सतरा वर्षांचा मुलगा व मुलगी एकमेकांच्या शेजारी राहतात. दोन्हीही कुटुंबीयांचे चांगले संबंध होते. संबंधित मुलगा व मुलगी हे दोघेही गतर्षीपर्यंत गावातील एकाच शाळेत शिकत होते. शालेय शिक्षण सुरू असताना या दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबध जुळले होते.
सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती दोघांच्या घरात समजली. दोघेही अल्पवयीन असल्याने घरच्यांनी दोघांनाही समज दिली होती. त्यानंतर दोन्हीही कुटुंबांचे एकमेकांशी बोलणे बंद झाले होते. यापैकी मुलगी ही ११ वीत शिकत होती, तर मुलगा हा बोअरवेलवर काम करत होता.
दोन्हीही कुटुंब आंतरधर्मीय असल्याने प्रेमास विरोध होत होता. आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी (ता. १) मध्यरात्री मुलगी घरातून बाहेर पडली. ती लघुशंकेसाठी बाहेर गेली असावी, असा घरच्यांचा समज झाला; पण सुमारे तासभरानंतरही ती आली न आल्याने तिच्या नातेवाइकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही.
शेजारी प्रियकर मुलाच्या दुमजली घरात सर्वजण तळमजल्यात राहतात, तर त्याच घराला बाहेरून स्वतंत्र जिना असल्याने टेरेसवरील खोलीत मुलाची बेडरूम होती. रात्रीत घराबाहेर पडलेली प्रेयसी थेट जिन्यावरून मुलाच्या खोलीत गेली; पण ते घरच्या कोणाच्याही लक्षात आले नाही. मध्यरात्रीच दोघांनी त्या खोलीतील लोखंडी अँगलला एकाच नायलॉन दोरीने गळफास लावून घेऊन जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येपूर्वी प्रियकराने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर ‘मिस यू जान’ असा स्टेट्स लावला होता. पहाटेपर्यंत शोधाशोध करून मुलगी न सापडल्याने प्रेयसीच्या अस्वस्थ कुटंबाला शंका आली, त्यांनी प्रियकाराचे टेरेसवरील खोलीचा दरवाजा मोडून काढला असता हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेने पुलाची शिरोली परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट घेऊन सूचना दिल्या. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी घटनास्थळी पंचनामा करून घेतला व दोन्ही मृतदेहांचे कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दोघेही अल्पवयीन व आंतरधर्मीय असल्याने त्यांच्या प्रेम प्रकरणाला दोन्ही कुटुंबांचा विरोध होता; पण १५ दिवसांपूर्वी प्रियकराने आपल्या सोशल मीडियावर, ‘ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा, प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असा स्टेटस् लावला होता. याबाबत त्याला काही मित्रांनी विचारणाही केली होती. त्यानंतर अखेर आज दोघांनीही एकत्रित जीवनयात्रा संपवताना ‘मिस यू जान’ असा स्टेटस् लावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.