बेकायदेशीर गर्भलिंग निदान केल्याच्या संशयावरून वैद्यकीय पथकाने छापा टाकला, तेव्हा गर्भपात केला जात होता काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.
कोल्हापूर : राजारामपुरीतील ‘श्री’ हॉस्पिटलमध्ये (Shree Hospital Rajarampuri) अर्धवट गर्भपाताचा संशयास्पद प्रकार झाल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. या हॉस्पिटलवर महापालिका आरोग्याधिकाऱ्यांनी १२ जूनला छापा टाकला. त्यावेळी ही महिला तेथे दाखल होती.
महापालिकेच्या (Kolhapur Municipality) वैद्यकीय पथकाने त्या महिलेला तेथून सीपीआरमध्ये दाखल केले होते. याबाबत सीपीआर (CPR) प्रशासनाकडून महापालिकेला सविस्तर अहवाल प्राप्त झालेला नाही, मात्र याबाबत १२ जूनची नोंद आज सीपीआर पोलिस (CPR Police) चौकीतील डायरीत झाली आहे.
बेकायदेशीर गर्भलिंग तपासाच्या (Pregnancy Test) संशयावरून राजारामपुरी बस रुटवरील डॉ. सोनल वालावलकर यांच्या श्री हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकला. पथकाने तेथील सोनोग्राफी मशिन सील केले. याचवेळी संपूर्ण हॉस्पिटलची तपासणी केली. त्यावेळी महिला अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय पथकाला दिसून आले. त्यामुळे त्यांनी पुढील उपचारासाठी त्या महिलेस सीपीआरमध्ये दाखल केले.
त्यानंतर काल याबाबतची नोंद सीपीआर पोलिस चौकीतील पोलिस डायरीत झाली. त्यातील नोंदीनुसार यातील संबंधित महिला पन्हाळा तालुक्यातील आहे. त्यांना त्यांच्या चुलत जाऊने श्री हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते. संबंधित महिलेचा अर्धवट गर्भपात केल्याच्या संशयावरून श्री हॉस्पिटल येथून सीपीआरमध्ये येथे दाखल केल्याची वर्दी डॉ. प्रथमेश यांनी दिली आहे, असा उल्लेख आहे.
दरम्यान, बेकायदेशीर गर्भलिंग निदान केल्याच्या संशयावरून वैद्यकीय पथकाने छापा टाकला, तेव्हा गर्भपात केला जात होता काय, असाही सवाल उपस्थित होत आहे. याबाबतचा अहवाल सीपीआर प्रशासनाकडून महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते; मात्र तो अहवाल आजही महापालिकेकडे मिळाला नाही. तो आज मिळण्याची शक्यता महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आला. संबंधितांचे जाबजबाब घेण्याचे काम सुरू आहे. संबंधित अत्यवस्थ महिलेसंदर्भातील अहवाल काल सायंकाळपर्यंत सीपीआर प्रशासनाकडून प्राप्त झालेला नाही. आज (ता.१५) मिळणार असल्याचेही महापालिका आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.