आक्रमक राहूनच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा एकमेव पर्याय
जयसिंगपूर : आक्रमक राहूनच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा एकमेव पर्याय आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे असणार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेतील घटक पक्ष राहूनही अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नसल्याने सत्तेबाहेर पडलेली ‘स्वाभिमानी’ आता मूळ ट्रॅकवर आली. मात्र, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वाभिमानीच्या वाट्याला संघर्ष अटळ असून, संघटनेची नव्याने बांधणी करून दुरावलेल्यांना पुन्हा बरोबर घेत नव्या ताकदीने वाटचाल करावी लागणार आहे.
महाविकास आघाडीत घुसमटणारी स्वाभिमानी अपेक्षेप्रमाणे सत्तेतून बाहेर पडली. मात्र, तितकाच कठीण काळही या निर्णयानंतर सुरू झाला आहे. सत्तेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, असे म्हणत भाजप, महाविकास आघाडीबरोबर राहिलेल्या ‘स्वाभिमानी’ बेदखल राहिली. दुसरीकडे माजी आमदार उल्हास पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, ‘स्वाभिमानी’चे एकमेव आमदार देवेंद्र भुयार संघटनेबाहेर गेल्याने याची किंमतही काही प्रमाणात मोजावी लागली. स्वाभिमानी सत्तेत असली तरी ताकदीचे नेते बाहेर पडल्याने संघटनेला काहीशी उतरती कळा लागली. त्याच ताकदीचे नेते ‘स्वाभिमानी’मध्ये तयार झाले नाहीत, ही खंतही आहे.
सत्तेत गुरफटलेल्या ‘स्वाभिमानी’ला सत्ताधाऱ्यांनी केवळ झुलवत ठेवले. कोणत्याही पक्षावर आता ‘स्वाभिमानी’चा विश्वास राहिला नाही; तर दुसरीकडे ‘स्वाभिमानी’च्या वेळोवेळी बदलत गेलेल्या राजकीय भूमिकांमुळे निष्ठावंत शेतकरी आणि कार्यकर्ते दुरावले गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सरकारशी संघर्ष करावा लागणार आहे.
शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी दबाव गट तयार करण्याची वेळ आता ‘स्वाभिमानी’वर आली आहे. यासाठी हरवलेले ताकदीचे नेते पुन्हा नव्याने तयार करावे लागतील. येणाऱ्या काळात आघाडीसाठी पुन्हा ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांची मनधरणी होणार आहे. मात्र, त्यावेळी ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय असणार, हे ‘स्वाभिमानी’च्या भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
आत्मचिंतनाची गरज
सातत्याने राजकीय भूमिका बदलणे ‘स्वाभिमानी’साठी घातक ठरू शकते. ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी पक्षातील चढ-उतारांचे आत्मचिंतन करून संघटना एकसंघ आणि आक्रमक राखण्यासाठी कोणता करिष्मा दाखविणार, हे काळच ठरवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.