Hasan Mushrif : कारखान्यांचे अध्यक्ष, संचालकांना घेऊन कोल्हापूरच्या बिंदू चौकात या; हसन मुश्रीफांना 'स्वाभिमानी'चे चॅलेंज
दरवर्षी कारखानदारी तोट्यात असल्याचा बागलबुवा करून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदा सुरू आहे.
जयसिंगपूर : ‘जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि सी.ए. घेऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना ऊस आणि साखरेचा हिशेब सांगून गतवर्षी तुटलेल्या उसाचे प्रतिटन चारशे रुपये देणे कसे शक्य आहे, हे सांगेल,’ असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी दिले.
जयसिंगपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘गतवर्षी तुटलेल्या उसाचे प्रतिटन चारशे रुपये शेतकऱ्यांना मिळावेत आणि वजन काटे ऑनलाइन करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आग्रही आहे, मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना सी.ए. घेऊन यावे, हिशेब समजावून सांगू, असे सांगत चारशे रुपये देणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रा. पाटील यांनी मुश्रीफ यांचे आव्हान स्वीकारत प्रतिआव्हान दिले.’
ते म्हणाले, ‘खते, पाणी, वीज, डिझेल, मजुरी यामध्ये गेल्या काही वर्षांत दुपटीने, तिपटीने वाढ झाली आहे, मात्र त्या प्रमाणात उसाला दर मिळाला नाही. एकाच जिल्ह्यातील कारखान्याची रिकव्हरी वेगवेगळी कशी याचाही खुलासा कारखानदारांनी केला पाहिजे. आरएसएफ सूत्रानुसार कारखान्यांकडील नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली जात नाही. दरवर्षी कारखानदारी तोट्यात असल्याचा बागलबुवा करून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदा सुरू आहे. शेती व्यवसाय आता परवडत नसल्याने शेतकऱ्यांची मुले आता शेती व्यवसायापासून बाजूला होत आहेत. असे असतानाही कारखानदार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाहीत, हे दुर्दैव आहे.’
द्विस्तरीय साखर विक्री धोरणासाठी आग्रही
तयार होणाऱ्या साखरेतील ४० टक्के साखर हॉटेल आणि बेकरी व्यवसायाला वापरली जाते. २४ टक्के शीतपेयांकरिता वापरात येते. अन्य व्यवसायातही साखरेचा व्यावसायिक वापर होतो. केवळ १७ टक्के साखर घरगुती खाण्यासाठी वापरली जाते. असे असताना सर्वांना समान दर कशासाठी? व्यावसायिक साखरेचे दर वाढविण्याची गरज आहे, तरच उसाला अधिक भाव मिळण्याचा कारखान्यांना आणखी एक आर्थिक स्त्रोत निर्माण होईल, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.